हानिया, शुकर, देफच्या खात्म्याने होणार उलथापालथ

    दिनांक :03-Aug-2024
Total Views |
वेध
- अभिजित लिखिते
Hania-Shukar : इस्रायलने हमासचा प्रमुख हानिया, उपप्रमुख शुकरचा खात्मा केल्यानंतर लगेच देफलाही संपवले. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या नृशंस हल्ल्यानंतर हा देश प्रचंड संहार करणार असल्याचे निश्चित झाले होते. इस्रायलचा पूर्व इतिहास पाहता, हे होणारच होते. इस्रायल शत्रूला लोळवण्यासाठी पाताळापर्यंत त्याचा माग काढू शकतो. पण, त्यानंतर सुरू झालेल्या हमास व इस्रायलमधील गाझापट्टीतील युद्धामुळे जगभरात वाढला. रशिया व युक्रेनमधील युद्धाचा चटका अगोदरच लागला असताना गाझापट्टीत युद्धाची आग भडकली. आता इस्रायलने लेबनॉन आणि इराणमध्ये कारवाई करीत देशाच्या शत्रूंना यमसदनी धाडले. त्यामुळे या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याने सूड घेण्यासाठी इस्रायलवर हल्ला करण्याचा आदेश दिला. त्यामुळे इराण आणि लेबनॉनही यात उतरणार स्पष्ट झाले. त्यात तुर्कीची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. व्याप्ती वाढलेल्या या युद्धाचा भीषण परिणाम जगावर विशेषतः आशियावर होणार आहे.
 
 
haniya-shukar
 
Hania-Shukar : गाझामधील पेटलेल्या युद्धामुळे अगोदरच गुंतवणूकदार चिंतेत आहेत. या घटनेचा आशियातील बाजारांवर होणार्‍या परिणामांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आशियातील देश सुरू करतील. जागतिक घडामोडी विशेषतः कोणताही भू-राजकीय तणाव आर्थिक बाजारपेठेत उलथापालथ करण्यात भूमिका पार पाडतो. यामुळे गाझातील युद्धाने गुंतवणूकदारांना निश्चितपणे जागतिक परस्परावलंबनांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यांची आठवण करून दिली आहे. अशा तणावांचे तत्काळ व दीर्घकालीन परिणाम होत असतात. जागतिक तेल पुरवठ्यात मध्यपूर्वेचा वाटा मोठा आहे. युद्धाची व्याप्ती वाढली, तर याचा सर्वांत भीषण परिणाम भारतावर होईल तसेच आशियातील इतर देशांवरही तो होणार आहे. तेलाच्या व्यत्यय आल्यास तेलाच्या किमती वाढतील. त्यामुळे जागतिक चलनवाढीचा दर आणि व्यापारातील संतुलन प्रभावित होईल. हे संतुलन तसेही युद्ध सुरू झाल्यानंतर बिघडले आहे. भूराजकीय तणावाच्या काळात गुंतवणूकदार सोने, जपानी चलन आणि इतर सुरक्षित गुंतवणुकींकडे वळतात. सध्याचा तणाव वाढल्यास नवीन सुरक्षित गुंतवणुकीचा शोध गुंतवणूकदारांकडून घेतला जाईल, हे निश्चित आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारांवरही निश्चितपणे होणार आहे. हा परिणाम युद्ध करणार्‍या देशांशी जवळचे संबंध असलेल्या किंवा तेल आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या देशांमधील शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. तिथे अस्थिरता येते. मात्र, अलिकडील काळात भारतीय शेअर बाजाराने लवचीकता दाखवली आहे. संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचा गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. यामुळे उच्च आयातीत चलनवाढ होऊ शकते. उद्योगांच्या उत्पादन खर्चावर याचा परिणाम होऊ शकतो. इराणने युद्धात उडी घेतल्यास होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणार्‍या मालवाहू जहाजांचा मार्ग धोक्यात येण्याची शक्यता आहे. इराणने याआधीही अशी धमकी दिली होती. असे झाल्यास आशियातील देश मोठ्या प्रमाणात पोळून निघतील. इराणने उडी घेतल्यास सागरी मार्गांवर परिणाम होईल. त्यामुळे मालवाहतूक व विमा खर्च वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा बाधित झाल्यास प्रमुख आयातदार असलेले अमेरिका, भारत, चीनमधील उच्च आयातीत निश्चितपणे चलनवाढ होऊ शकते.
 
 
Hania-Shukar : या युद्धाचे भूराजकीय परिणामही निश्चित आहेत. यामुळे मध्यपूर्वेची स्थिती कठीण असेल. अलिकडच्या घडामोडी पाहिल्या असता अमेरिकेचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसत आहे. एकीकडे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत असताना, दुसरीकडे या देशाला इस्रायलचा विषयही कठीण होत असल्याचे दिसत आहे. या मुद्यावर अमेरिका नेमकी कोणती भूमिका घेईल याची उत्सुकता आहे. अमेरिकेचा प्रभाव कमी होण्यामागे अमेरिकेतील झालेला ९/११ हल्ला २०१०-११ दरम्यान अरब स्प्रिंग उठावदेखील कारणीभूत ठरले आहेत. त्यानंतर अमेरिकेने या भागातील लष्करी बांधिलकी कमी केली. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण चीनला रोखण्यासाठी भारत-प्रशांतकडे वळले आहे. या युद्धाचा फायदा घेत चीन स्वतःचे सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
- ९०२८०५५१४१