संत प्रबोधन
Rashtrasant Tukdoji Maharaj : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या राष्ट्रालाच देव मानले होते. राष्ट्र समृद्ध करण्यासाठी गाव समृद्ध झाले पाहिजे, असा महान विचार त्यांनी ग्रामगीतेतून मांडला. ‘ग्रामगीता’ म्हणजे ग्रामविकासाची संजीवनीच आहे. गावाची सेवा केली, गावात वैभव नांदले, गाव स्वच्छ झाले आणि गावाला जर संपन्नता आली तरच देश संपन्न होऊ शकतो. हाच ग्राम विकासाचा मूलमंत्र आपल्या देशभक्तीतून मांडला आहे.
गावा गावाशी जगवा | भेदभाव हा समूह मिटवा ॥
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा | दास तुकड्या म्हणे ॥
हा ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सांगणारे ग्राम चळवळीला खर्या अर्थाने अध्यात्म, ग्राम शिक्षण व ग्रामोद्योग या तत्त्वत्रयींद्वारा ग्राम स्वराज्य आणणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जगामध्ये भारतवर्षाला सर्वोच्च स्थानावर पोहोचविण्यासाठी भारतीय नररत्नांनी कर्म, वाणी व निश्चयाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यापैकी विदर्भातील एक महत्त्वाचे संत होत. आपल्या मन, कर्म व वचनांद्वारे त्यांनी देश प्रगतिपथावर राहण्यासाठी ग्रामगीतेतून ग्रामविकासाचा अलौकिक संदेश भारतीय समाजमनाला दिला आहे. वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामसुधारणा, ग्रामरक्षण, जीवन रक्षण मूलमंत्र, मूलोद्योगी शिक्षण, राष्ट्रभावना, मानवता, जीवनमूल्य, शोध, देदीप्यमान विचार, तेजस्वी संस्कृती, या मूल्यांना ग्राम जीवनामध्ये रुजविण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
गाव हा विश्वाचा नकाशा | गावावरून देशाची परीक्षा ॥
गावची भंगता| येईल अवदशा देशा ॥
Rashtrasant Tukdoji Maharaj : आपल्या दिव्य भजन रचनांच्या स्फूर्तीने भारतीय युवक व सैनिकांना मौलिक राष्ट्रवादाचा संदेश त्यांनी दिला आहे. भारताला शानदार होण्यासाठी राष्ट्रसंतांनी राष्ट्रवंदनेतून जो विकासात्मक आशावाद व्यक्त केला तो
तन मन धन से सदा सुखी हो| भारत देश हमारा |
सभी धर्म अरू पंथ पक्ष को | दिलसे रहे पियारा ॥१॥
विजयी हो विजयी हो | भारत देश हमारा |
माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट ते वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा त्यांचा जीवनप्रवास सर्व भारतीयांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांनी राष्ट्रप्रेरणा जागृतीसाठी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक कार्यासाठी झोकून दिले. देशकार्याची मशाल पेटवून त्यांनी स्वतःला १९४२ च्या स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले. अनेक राष्ट्रीय संस्थांना भेटी देऊन त्यांनी, ‘जाग उठो बालबिरो तुम | अब तुम्हारी बारी है |’ हा युवकांना महत्त्वाचा राष्ट्रीय संदेश देऊन त्यांचा प्रशिक्षण वर्ग घेतला. राष्ट्रधर्माला आल्यामुळे युवक वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंतांनी प्रभावी भाषण व देशभक्तीच्या भजनरचनेद्वारा प्रखर राष्ट्रीयतेचा दिव्य संदेश दिलेला आहे.
झाडझडुले शस्त्र बनेंगे | भक्त बनेंगी सेना |
पत्थर सारे बॉम्ब बनेंगे | नाव लगेगी किनारे ॥
वंदनीय राष्ट्रसंतांचा प्रखर तेजस्वी राष्ट्रवाद
भारतीय जनतेस ब्रिटिश सत्तेविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देत आहे. जुलमी सत्तेविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रखर राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. त्यामुळेच त्यांना इंग्रज सरकारने नागपूर, रायपूर येथील तुरुंगात चार महिने डांबले. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी १९४६ मध्ये वरखेड येथे अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी लढा उभारला. भारतामध्ये जनता दुष्काळी परिस्थितीने होरपळून निघत असताना जनतेमध्ये मानवता जागविण्याचे महत्त्वाचे कार्य
निर्वाणीचा इशारा
१९४७ मध्ये ब्रिटिशांना निर्वाणीचा इशारा देताना ते म्हणतात,
चेत रहा है भारत दुख से | आग बुझाना मुश्किल है ॥
उठा तिरंगा बढावे छाती | अब बहलाना मुश्किल है ॥
राष्ट्र उभारणीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण मानून त्यासाठी युवकांनी बलवान, राष्ट्रभक्त व नीतिमान होण्यासाठी चहा, चिवडा व चिरूटाचे न होता शिक्षणासोबतच शीलवान होण्याचा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. गावचा पुढारी हा फक्त गावचाच पुढारी नाही तर तो राष्ट्राचे भवितव्य घडवित असतो. म्हणून तरुण मतदारांनी जागरूक राहावे. युवकांनी प्रारब्धवादी न बनता निश्चयी व प्रयत्नवादी बनावे, असा वर ते परमेश्वराला मागतात.
हा जातिभेद विसरूनिया एक हो आम्ही |
अस्पृश्यता समूळ हो जगातूनी ॥
खळ निंदका मनीही सत्य न्याय वसू दे |
दे वरची असा दे ॥
ग्राम सुधारणा मूलमंत्र
Rashtrasant Tukdoji Maharaj : संपन्न भारताची जडणघडण करण्यासाठी ग्राम सुधारणेचा मूलमंत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व समाजाला दिला. राष्ट्रसंतांच्या रोमारोमात राष्ट्रभक्ती भरलेली आहे. त्यांचा राष्ट्राभिमानही किती उच्च पातळीवरचा होता, हे त्यांच्या असंख्य भजनांवरून विदित होते. राष्ट्र उभारणीची अभिनव संकल्पना त्यांनी मांडली. गाव जगला, गावाचे भरण पोषण योग्य झाले तरच राष्ट्र उभारणी योग्य पद्धतीने होऊ शकते. राष्ट्रसंतांचा हा विचार सर्वसामान्य माणसाला जगविणारा असून खेड्यातील दारिद्र्य, उपासमार, गरिबी संपून सर्वत्र स्वावलंबन, स्वयंपूर्णता आली पाहिजे. गावातील लोकांना रोजगार गावातच मिळावा. गावातील पैसा गावातच राहिला पाहिजे, असा ग्राम विचार त्यांचा होता. ग्रामविकासासाठी सर्वांनी एकत्र झटले पाहिजे. मेहनत, परिश्रम करून स्वतःच्या विकासाचा मार्ग स्वतःच शोधावा. त्यामुळे गाव, खेडे विकसित होऊन देश स्वयंपूर्ण बनेल. भारत सर्व जगामध्ये शानदार होऊन आपल्या अलौकिक तेजाने तळपत राहील, अशी ग्रामनिर्माण कला राष्ट्रसंतांनी भारतीय खेड्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
कष्ट करुनी महाल बांधशी
झोपडीही नसे नेटकिसी ॥
स्वातंत्र्याकरिता उडी घेशील |
परी मजा भोगती इतरची ॥
भूषण तुझे ग्रामनाथा॥
शानदार भारताची स्वप्न पाहणारे राष्ट्रसंत हे एक द्रष्टे राष्ट्र प्रचारक असून त्यांनी धार्मिक शिक्षण व नीतिमत्ता यासोबतच सर्व देशाने सदैव जागृत राहून भारतमातेचे रक्षण करण्यासाठी युवकांच्या भूमिकेचा एका सच्चा सैनिकांच्या भूमिकेत प्रवेश केला युवकांनी ही जबाबदारी एक सेवक म्हणून पार पाडावी, म्हणजेच सैनिक व सेवक ही भूमिका वठवावी, असेही त्यांनी आपल्या भजनातून सांगितले आहे.
भारत शानदार हो मेरा | भारत शानदार हो मेरा ॥
मै सेवक बलवान सिपाही | रहू देश को प्यारा ॥१॥
शुद्ध चरित्र लीनता ममता | यही मेरा निर्धारा
हिन्दू, इसाई, बुद्ध, पारसी | मुस्लिम जीन गुरुद्वारा ॥२॥
राष्ट्रसंतांची विश्वबंधुत्वाची संकल्पना
राष्ट्रसंतांनी सर्व जगाला सांगितली. मानवता, विश्वबंधुत्व या मूल्यांद्वारा भारताचे नाव सर्व जगाला उंचावून सांगणारे संत ज्ञानेश्वरांपासून वैराग्यमूर्ती गाडगे महाराजापर्यंत सर्व संत हे क्रांतदर्शी विचारवंत आहेत. ‘हा देशची माझा देव’ हा भाव त्यांच्या ठायी असल्याने त्यांनी सेवा, भक्ती, तत्परता व नीतिमत्ता यांची रुजवणूक भारतीय समाजमनाच्या सुपीक जमिनीमध्ये केली. त्याद्वारा त्यांनी भारतीय अस्मितेची जागृती केली आहे. उद्योगी भारताने प्रगतीची नवक्षितिजे गाठून शौर्य, मित्रता व सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून रामराज्य निर्माण होईल, असा आशावाद त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात मोठ्या आदर व विश्वास निर्माण केला आहे.
सदा रहू उद्योगी तनसे | व्यायाम पियारा ॥
नित्य करू प्रार्थना सामूहिक | लेकर जण-गण सारा ॥१॥
सुंदर गांव बनाए बहादू | मित्र प्रेम की धारा ॥
तुकड्यादास कहे घर घर | करू रामराज्य पियारा ॥२॥
Rashtrasant Tukdoji Maharaj : भारत देशामध्ये सर्व खेडे व गावांचा विकास होऊन रामराज्याच्या निर्मितीचे स्वप्न पाहणार्या वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारताला संपन्न ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सर्वांनी स्वीकारणे गरजेचे आहे, असा पुरोगामी विचार मांडला आहे. भारत देशात शिक्षण व्यवस्था व खेड्यांचा विकास या दोन गोष्टींचा अंगीकार करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. भारत हा खेड्यांपासून बनलेला असल्याने खेड्यांचा विकास हाच देशाचा विकास आहे. राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी युवक व महिलांनी राष्ट्रकार्यात सहभागी होण्याची आवश्यकता असे त्यांचे परखड मत होते.
‘देश हा देव असे माझा’ अशी राष्ट्रवादाची परंपरा आपली असल्याने सर्वांनी त्यागाची भावना व तेजाची भावना जोपासण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रसंतांच्या विविध ग्रंथातून त्यांचा विचार ‘ग्रामगीता’; वंदनीय राष्ट्रसंत, प्रकाशन विभाग गुरुकुंज आश्रम मोझरी व ‘श्री गुरुदेव मासिक’; गुरुकुंज आश्रम मोझरी. ‘राष्ट्रसंतांचे विचारविश्व’, ‘लहर की बरखा’ सर्व ग्रंथांच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचा देशाला देवत्व प्राप्त करून देण्याचा विचार आजही समाज मनामध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न करीत असते.
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
- ७५८८५६६४००