अकोला - खांडवा रेल्वे मार्ग सेंट्रल रेल्वेकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचालींना वेग

    दिनांक :06-Aug-2024
Total Views |
वाशीम, 
Akola - Khandwa Railway Line : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागा अंतर्गत येत असलेला अकोला ते खांडवा हा रेल्वे मार्ग आणि अकोला रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्राचा भाग सेंट्रल रेल्वेकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचालीला वेग आला असून, दक्षिण मध्य रेल्वे व मध्ये रेल्वे महाप्रबंधकामध्ये या मुद्यावर सहमती झाल्याचे चित्र समोर आले आहे.
 
 
yugj
 
दक्षिण मध्य रेल्वेचे झोनल महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी नवी दिल्ली येथील रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत पत्र लिहून दोन्ही झोनमध्ये अकोला खांडवा हा २०३ किमी चा रेल्वेमार्ग व अकोला स्टेशनचा उत्तरेकडील मार्ग सेंट्रल रेल्वेकडे हस्तांतरीत करण्या संदर्भात पत्र दिले आहे, हे विशेष. अकोला खांडवा या रेल्वे मार्गाचे विभागीय कार्यालय नांदेड जरी असले तरी झोन चे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे. त्यामुळे या झोनमधील मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील प्रवाशावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना या भागात आहे. त्यामुळे नांदेड विभाग हा सेंट्रल विभागाला जोडला जावा अशी मागणी या भागातील लोकांकडून सातत्याने होत असते. नांदेड विभाग जरी आता सेंट्रल विभागाला जोडला जात नसला तरी त्या विभागा अंतर्गत येत असलेला अकोला खांडवा हा रेल्वे मार्ग आणि अकोला रेल्वे स्टेशनचा उत्तरेकडील भाग सेंट्रल रेल्वेला जोडला जाणार आहे.
 
 
अकोला खांडवा हा रेल्वेमार्ग सेंट्रल रेल्वेला जोडल्या गेल्यास अकोला खांडवा मार्गाच्या गेज परिवर्तन कार्यक्रमाला गती येईल, एवढेच नव्हे तर विद्युतीकरण व दुहेरीकरण सारख्या कामाला मंजुरात मिळेल. अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, अमरावती या जिल्ह्यातील लोकांना त्यामुळे इंदौर जवळ होईल.