- केंद्रात प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल
नवी दिल्ली,
Amit Singh Negi : केंद्र सरकारने प्रशासकीय पातळीवर केलेल्या उच्चस्तरीय फेरबदलाचा भाग म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी अमितसिंह नेगी यांची पंतप्रधान कार्यालयाच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमितसिंह नेगी १९९९ मधील तुकडीचे उत्तराखंड कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय अर्थ व्यय विभागात सहसचिव आहेत. त्यांची पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. १९९८ च्या तुकडीतील भारतीय महसूल सेवेचे (आयकर) अधिकारी समीर अश्विन वकील यांची केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत गंभीर फसवणूक तपास कार्यालयात (एसएफआयओ) पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
गर्ग, संजयकुमार आणि अजित कुमार यांची भारत निवडणूक आयोगात उपनिवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयांतर्गत महासंचालक मनीष सक्सेना आता कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव असतील. सक्सेना यांच्याकडून संस्कृती मंत्रालयातील सहसचिव मुग्धा सिन्हा या महासंचालक (पर्यटन) पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आशुतोष अग्निहोत्री आणि नीरजकुमार बनसोड गृह मंत्रालयात अनुक्रमे अतिरिक्त सचिव आणि संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Amit Singh Negi: गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी अजय भादू यांची केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर अमनदीप गर्ग हे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात अतिरिक्त सचिव असतील. अशोककुमार सिंह यांची श्रम आणि रोजगार मंत्रालयांतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सल्य सक्सेना यांना केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. निधी छिब्बर या नीती आयोगात अतिरिक्त सचिव असतील. टी. के. अनिलकुमार यांची केंद्रीय विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ग्रामीण विकास विभागात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धीरज साहू यांना कृषी आणि शेतकरी कल्याण विभागातील स्मॉल फार्मर्स अॅग्रीबिझनेस कन्सोर्टियमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.