दिल्ली वार्तापत्र
- श्यामकांत जहागीरदार
Maharashtra election : येत्या दोन-तीन महिन्यांत हरयाणा आणि झारखंडसोबत महाराष्ट्र विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. हरयाणा आणि झारखंड विधानसभेच्या जवळपास तिप्पट जागा महाराष्ट्र विधानसभेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीला वेगळे राजकीय महत्त्व आहे. हरयाणा आणि झारखंडमधील निवडणुकीच्या निकालाचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार नाही, त्याच्या कितीतरी पट परिणाम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला अपेक्षित यश मिळू न शकल्याने यावेळची विधानसभा निवडणूक भाजपाने आपल्यासाठी प्रतिष्ठेची केली आहे. ‘करो वा मरो’ म्हणून भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला आहेत. निवडणूक होणार असलेल्या प्रत्येक राज्यासाठी भाजपातर्फे निवडणूक प्रभारी नियुक्त केला जात असतो.
त्याप्रमाणे भाजपाने हरयाणा, झारखंडसोबत महाराष्ट्रासाठीही निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, तर दुसरे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सहप्रभारी आहेत. मुळात भूपेंद्र यादव आपल्या संघटन कौशल्यासाठी ओळखले जातात. सनदी राहिल्यामुळे अश्विनी वैष्णव यांना संघटनेच्या कामाचा फारसा अनुभव नसला, तरी गेल्या काही वर्षांत भाजपाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी संघटनशास्त्राचा चांगला अभ्यास केला. यादव आणि वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा बारीक अभ्यास केला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांताची आणि मतदारसंघाची माहिती या दोघांनी करून घेतली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि मतदारसंघात जाण्याचे नियोजन आणि वैष्णव यांनी केले आहे. विशेष म्हणजे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव पुढील तीन महिने महाराष्ट्रातच तळ ठोकणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला सत्तारूढ करूनच दिल्लीत परतणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारचे शैथिल्य आले आहे. हे शैथिल्य दूर करून कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह करून त्यांना जिद्दीने कामाला लावण्याचे मोठे आव्हान या दोघांसमोर आहे.
Maharashtra election : महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही वर्षांत आघाड्यांचे राजकारण झाले आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यातील चार प्रमुख पक्ष आहेत. हे चार पक्ष दोन आघाड्यांत विभागले गेले आहेत. भाजपा आणि शिवसेना यांची हिंदुत्ववादी आघाडी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची धर्मनिरपेक्ष आघाडी. गेल्या कित्येक वर्षांत या चार पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अपवाद म्हणून असा प्रयोग काही प्रमाणात झाला होता. भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीचा दोन्ही पक्षांना चांगला फायदा झाला. आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मोठा भाऊ तर भाजपा लहान भाऊ होता. आता मात्र परिस्थिती आहे. भाजपा मोठा भाऊ झाला तर शिवसेना लहान भाऊ. त्यातच लहान भावाच्या म्हणजे शिवसेनेच्या घरात भाऊबंदकी उफाळून आली. एका घराची दोन घरं झाली. शिवसेनेत एका घराची दोन घरं होण्याची ही पहिली घटना नाही तर याआधीही राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत आपली वेगळी चूल मांडली होती. पण राज ठाकरेंची महाराष्ट्राच्या वेगळी चूल पेटू शकली नाही. त्यामुळे त्यांना सत्तेची पोळी वा भाकरी आपल्या चुलीवर शेकता आली नाही. भाऊबंंदकीच्या लागणीतून धर्मनिरपेक्ष आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसही वाचू शकली झाली. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या पुतण्याने वेगळा मार्ग पत्करला. सार्या जगाला कात्रजचा घाट दाखवणार्या आपल्या काकाला म्हणजे शरद पवारांना अजित पवार यांनी कात्रजचा दाखवला. त्यामुळे यावेळची महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक दोन आघाड्यांमध्ये होणार असली तरी आघाड्यातील राजकीय पक्षांची संख्या चारवरून सहावर गेली आहे. हिंदुत्ववादी आघाडीत भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध काँग्रेस, शिवसेना उबाठा गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात होणार आहे. या दोन प्रमुख आघाड्यांशिवाय छोट्या-मोठ्या आघाड्याही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत.
Maharashtra election : मराठा आरक्षणासाठी लढणार्या मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली तरी त्याचा महायुतीवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही तर त्यांची मतं महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात त्यांनी निवडणूक लढवली तर त्यांची मते महाविकास आघाडीकडे न जाता त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांकडे जातील. म्हणजे जरांगे पाटील यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा फटका महायुतीला नाही तर महाविकास आघाडीला बसणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत २८८ मतदारसंघांतही आपले उमेदवार उभे करायला हरकत नाही. उलट त्यांनी निवडणूक न निर्णय घेतला तर त्यांचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला तसा पुन्हा एकदा महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे महाविकास आघाडीचे मनोबल काही प्रमाणात उंचावले असले, तरी आता महायुतीही लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून बर्यापैकी सावरली आहे. याचे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल. राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे दोन उपमुख्यमंत्री असले, तरी या तिघांमधील ऐक्य अफलातून आहे. या तिन्ही नेत्यांची तोंडं एकाच दिशेला आहे. याउलट महाविकास आघाडीत तिन्ही पक्षाच्या नेत्यांची तोंडं तीन दिशांना आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक भाजपाला कोणत्याही स्थितीत जिंकायची आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शाह जातीने लक्ष ठेवून आहेत. हरयाणा, झारखंड आणि महाराष्ट्र येथील तिन्ही विधानसभा निवडणुका भाजपाला जिंकायच्या आहेत. किमान या तीनपैकी दोन राज्यं तरी भाजपाला जिंकावी लागणार आहेत. पण महाराष्ट्र वगळून हरयाणा आणि झारखंड जिंकून फार काही साध्य होणार नाही, भाजपासाठी महाराष्ट्र जिंकणे आवश्यक आहे. त्यासाठी युद्धपातळीवर भाजपा कामाला लागला आहे.
- ९८८१७१७८१७