काँग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंना काहीच मिळाले नाही

    दिनांक :09-Aug-2024
Total Views |
- भाजपाचा घणाघात
मुंबई,
मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी तीन दिवस दिल्लीत मुक्काम करणार्‍या उद्धव ठाकरे यांना हुजरेगिरी करूनही हाती कोरडे चिपाडच लागले. तीन दिवस बैठका, भेटी घेऊनही रिकामे हात परत यावे लागले, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते Keshav Upadhyay केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रपरिषदेत ते बोलत होते. उबाठाच्या दिल्लीवारीतून महाराष्ट्राच्या वाट्याला तर सोडाच पण उबाठाच्या हातीही धुपाटणेच आले. महाविकास आघाडीच्या बैठका म्हणजे निव्वळ कोरडे चिपाड आहेत, ना चव... ना रस... ना गोडवा. मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेपायी ठाकरेंनी दिल्लीचे उंबरे झिजवले, पण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर होणार असून, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री, असे सांगून ठाकरे यांची निराशा केली, असे ते म्हणाले.
 
 
Keshav Upadhyay
 
ज्या अमित शाहांची तुलना ठाकरे यांनी अब्दालीशी केली, तेच अमित शाह भाजपाचे अध्यक्ष असतानाही मातोश्रीवर चर्चेसाठी आले होते. २०१९ मध्ये तुमचा सन्मान राखत १२५ जागा दिल्या होत्या, आता तुम्हाला १०० जागा मिळवण्यासाठी काँग्रेसच्या दिल्ली तख्तापुढे झुकावे लागत आहे. जागावाटपात १०० जागाही तुम्हाला मिळणार नाहीत; मग तुमच्या दिल्ली दौर्‍यातून नेमके पदरी तरी काय पडले, असा खोचक सवाल उपाध्ये यांनी केला. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायापुढे न ठेवण्याच्या बाता मारणारे ठाकरे हे गांधींना भेटले, असे सांगत असले तरी त्यांची भेट खरंच घडली का, याबाबत मनात शंकाच आहे. कारण या भेटीचे फोटो कुठे दिसले नाहीत. असा टोलाही Keshav Upadhyay उपाध्ये यांनी लगावला.
 
 
महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत असताना, उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन मविआच्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. ती देखील धुळीस मिळाली. ठाकरे हे केवळ स्वत:च्या राजकीय हव्यासापोटी दिल्लीला गेले होते. त्यांना महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही, अशी टीका Keshav Upadhyay उपाध्ये यांनी केली.