दगडफेकींवर नियंत्रण कसे मिळविणार?

    दिनांक :21-Sep-2024
Total Views |
वेध
- विजय कुळकर्णी
Ganesha Visarjan Dagadfek : १७ सप्टेंबरला महाराष्ट्रात श्री गणेश विसर्जन करण्यात आले. यानिमित्त राज्यभरात विसर्जन मिरवणुका काढण्यात या मिरवणुकांवर भिवंडी, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव जामोद व आकोट येथे काही समाजकंटक व उपद्रवखोरांकडून दगडफेक करण्यात आली. तर, संग्रामपूर तालुक्यात सोनाळा येथे घरगुती गणपती वाण नदीत विसर्जित करण्यासाठी नेत असलेल्या सरपंचपुत्राचा काही लोकांनी रस्ता अडवून या रस्त्यावरून गणपती कसे नेत आहात, असे विचारले. त्यामुळे गावात काही काळ तणाव झाला होता. या घटनांमध्ये दगडफेक करणारे कोण आहेत ते विविध वृत्तपत्रांत प्रकाशित झालेल्या झालेल्या बातम्यांमध्ये आले आहे. त्यामुळे त्याचा पुनर्उल्लेख येथे टाळत आहे.
 
 
Ganesha Visarjan Dagadfek
 
वास्तविक शेगाव हे अतिशय शांतताप्रिय तीर्थक्षेत्र आहे. कालपर्यंत गणेशोत्सवादरम्यान या शहरात कोणतीही अप्रिय घटना घडली नव्हती. पण, कालच्या घटनेने या शहराच्या इतिहासाला गालबोट लागले आहे. मात्र, नजीकच असलेले खामगाव हे शहर पोलिस दप्तरी संवेदनशील म्हणून नमूद आहे. तेथे काही वर्षांपूर्वी अशाच घडलेल्या घटनेनंतर लागलेल्या संचारबंदीचे चटके समाजकंटकांना बसले आहेत. त्यामुळे या शहराचा संवेदनशील असा उल्लेख होणे काही वर्षांपासून टाळला जात आहे. मात्र, ज्या शहरात कधीच हिंदू-मुस्लिम वाद झाला नव्हता अशा शेगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट एक मंडळ हमरस्त्याने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जात असताना या घटनेतील एक फिर्यादी शे. महेबूब शे. अहेमद यांनीच पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी अ. हमीद चौकात थांबलेल्या मंडळाला तेथे गुलाल उधळण्यास मज्जाव केला. वास्तविक यातील घटनास्थळ हा हमरस्ता आहे. तेथे कोणतीही मशीद नाही. त्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना संबंध नव्हता. ज्यांना गुलाल अंगावर पडण्याची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी हिंदूंच्या गणपती, दुर्गा देवी मिरवणुकीच्या मार्गावर जाऊच नये. त्यामुळे त्यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना गुलाल उधळण्यास हरकत घेणे कितपत योग्य आहे? गुलाल अंगावर पडला म्हणून दगडफेक करणे न्यायसंगत वाटत नाही. त्यावरून या घटनेचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
 
 
Ganesha Visarjan Dagadfek जळगाव जा. येथे वेसमधून मिरवणूक पुढे गेल्यावर श्री रूपलाल महाराज मंडळावर दगडफेक करण्यात आली. यात मंडळाचे काही लोक जखमी झाले. या घटनेतील दगडफेकीचे कारण समजू शकले नाही. पोलिस त्याचा शोध घेतीलच. पण, या दोन घटनांवरून स्पष्ट होते की, आता दगडफेक करणार्‍यांनी त्यांचा पवित्रा बदलला आहे. याआधी एखाद्या मशीद परिसरात दगडफेक होत होती. एक एकट्या मंडळांना गाठून त्यावर दगडफेक केली जात आहे. आकोट येथेदेखील एकाच मंडळावर दगडफेक करण्यात आली. या घटनांमध्ये दगडफेक करणार्‍यांवर आजपर्यंत कारवाई झालेली नव्हती. यथावकाश ती होईल. पण, भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने अधिक सजग राहणे गरजेचे आहे. गणपती, नवरात्र व हिंदू सणांना शासन-प्रशासनाकडून सार्वजनिक मंडळांवर निर्बंध लावले जातात. मिरवणुकीत गुलाल उधळू नका, डीजे लावू नका, बँड पथकात मोजकेच वादक असले पाहिजेत, असे अनेक निर्बंध लावले जातात. पण, हमरस्त्याने जाणार्‍या मंडळाला गुलाल उधळण्यास मज्जाव करणार्‍यावर काय कारवाई होणार आहे, ते आता बघावे लागेल. तेव्हा, शासन व प्रशासनाने दोन्ही बाजूंच्या लोकांवर निर्बंध लावले पाहिजेत.
 
 
घटना घडल्यावर करणारे तर पळून जातात. मग, पोलिसांचा मार मंडळाच्या कार्यकर्त्यांनाच खावा लागतो. या घटनेतही तसा प्रकार घडला. जळगाव जा. येथे दगडफेक केल्याची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवरच एसआरपीने लाठीचार्ज केला. याला काय म्हणावे? दंगल करणारे स्वत:हून पोलिस ठाण्यात येतील का? याचा विचार तरी पोलिसांनी करायला हवा होता. तसे न करता गणेशभक्तांवरच पोलिसांच्या लाठ्या बरसल्या. तेव्हा, या घटनांचा विचार करताना भविष्यात असे प्रकार घडू नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली पाहिजे. कालचा हा प्रकार खूप मोठा नसला, तरी खूप गंभीर मात्र आहे. भविष्याचा वेध या घटनेतून मिळत आहे. त्यादृष्टीने पोलिस विभागाने गोपनीय विभाग अधिक सजग करून अधिक सतर्कता या दगडफेकीच्या घटनांवर नियंत्रण मिळवावे, असे या निमित्ताने सांगावेसे वाटते. 
 
- ८८०६००६१४९