संत प्रबोधन
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
Saint Tukaram : जीवन जगताना प्रत्येकाला कोणते ना कोणते कर्म करावे लागते. कर्माचे विविध प्रकार असले, तरी सर्व कर्मांमधून व्यक्तीने जे कर्म विहित असेल तेच करावे, असा उपदेश भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये पार्थाला हेतुरहित कर्म सांगताना केला आहे. हा कर्मयोग सर्वांसाठी अनुकरणीय आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये रामनाम उच्चारास अतिशय महत्त्व आहे. त्याचप्रमाणे जीवनामध्ये उचित वापरणे व योग्य कर्म करणे आवश्यक आहे.
Saint Tukaram संत तुकारामांनी पुढील अभंगातून सांगितले आहे की, आपला आचार, विचार व व्यवहार योग्य असल्याशिवाय आपण समाधानी व शांत जीवन जगू शकत नाही. आपल्या दैनंदिन व्यवहारातही नैतिकता, सचोटी व परोपकारी वृत्ती असेल, अंतःकरणामध्ये भूतदया असेल तर आपण परमपदाचा जो मोक्ष आहे त्या पदाला वैराग्याचे आत्मबळ प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य अशा सात्त्विक, नैतिक व परोपकारी आचारामध्ये आहे. समाजामध्ये जीवन जगताना कोणती आचारसंहिता पाळावी, यासंबंधी संत तुकाराम सांगतात -
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे | उदास विचारे वेच करी ॥
उत्तमची गती तो एक पावेल | उत्तम भोगील जीव खाणी ॥
परउपकारी नेणे परनिंदा | सदा बहिणी माय ॥
भूतदया गाई पशूंचे पालन | तान्हेल्या जीवन वनामाजी ॥
शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट | वाढवी महत्त्व वडिलांचे ॥
तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ | परमपद बळ वैराग्याचे ॥
(तु. गा. २८५४)
योग्य वेळी योग्यच गोष्ट करावी. आहार, विहार, निद्रा योग्य प्रमाणात असल्यास जीवनामध्ये चैतन्य निर्माण चित्तशुद्धीसाठी कर्ममार्गाचे आचरण साधकाला करावेच लागत असल्याने निषिद्ध कर्म त्यागून विहित कर्माचे सदासर्वकाळ आचरण करावे. जसे कर्म तसेच फळ निश्चित मिळेल. आरशात जसे पाहावे तसे प्रतिबिंब दिसते. प्रत्येक कर्माचेही फळ तसेच मिळते. समाजशिक्षणाचे व्रत घेतलेल्या कीर्तनकार लोकशिक्षकांनाही त्यांचे आचरण कसे असावयास पाहिजे यासंबंधीची काटेकोर आचारसंहिता संत तुकाराम विशद करतात. अशी-
जेथे कीर्तन करावे | तेथे अन्न न सेवावें ॥
बुका लावू नये भाळा | माळ घालू नये गळा ॥
तटावृषभासी दाणा | तृण मागू नये जाणा ॥
तुका म्हणे द्रव्य घेती | देती ते ही नरका जाती ॥
(तु. गा. ३०७४)
Saint Tukaram : जमिनीवर पाऊस सर्वत्र जवळपास सारखाच पडतो. परंतु, फळाची निर्मिती होते. त्यामुळेच निष्काम बुद्धीने कर्म करावे. त्यातूनच उपासनेचा प्रारंभ होतो. सूर्योदय झाल्यावर अनेक मार्ग आपल्याला दिसतील. परंतु, आपल्याला ज्या गावी, ज्या स्थळी जायचे आहे त्या गावाच्या मार्गाने गेल्यास त्याच गावी पोहोचता येते. या गुणधर्मानुसार उपासनेचे, विविध धर्मांचे वेगवेगळे मार्ग असले, तरी सर्वांचा देव, सर्वांभूती परमेश्वर एकच आहे. एकाच परमेश्वराच्या ठायी अभेद दृष्टीने निष्ठा ठेवावी व आचार मात्र जो उचित आणि सर्वमान्य असेल तोच आचरावा. कर्मे जी हेतुरहित आणि समाजमान्य आहेत तीच करावीत.
आता तरी पुढे हाचि उपदेश| नका करू नाश आयुष्याचा ॥
सकळांच्या पाया माझे दंडवत | आपुलाले चित्त शुद्ध करा ॥
हित तें करावें देवाचे | करूनिया मन एकविध ॥
तुका म्हणे लाभ होय तोे व्यापार |
करा काय फार शिकवावे ॥ (तु. गा. १०१)
संत ज्ञानेश्वर प्रस्तुत ओवीतून तेच सांगतात.
म्हणोनी जें जें उचित | आणि अवसरें करोनी प्राप्त |
ते कर्म हेतुरहित | आचर तूं | (ज्ञानेश्वरी ३/७८)
संत तुकारामांनी आचारसंहिता मांडली ती अशी -
१) विरक्त व कर्मत्याग केलेल्या पुरुषांकरिता ज्ञानयोग सांगितला आहे.
२) अविरक्त प्रापंचिक लोकांसाठी कर्मयोग मांडलेला आहे.
३) ज्यांच्याकडे विषयाचा त्याग करण्याची हिंमत नाही, अशा सामान्य माणसांकरिता उपासना किंवा भक्तियोग प्रतिपादन केलेला आहे. लोकांनी कर्मकांड न करता परमेश्वरप्राप्तीकरिता काय केले पाहिजे, ते संत तुकाराम सांगतात -
साधकाची उदास असावी |
उपाधि नसावी अंतर्बाही ॥
लोलुपता काय निद्रेतें जिणावें |
भोजन करावे परमित ॥
एकांती लोकांती स्त्रियांशी वचन |
प्राण गेल्या जाण बोलो नये ॥
तुका म्हणे ऐसा साधनी जो राहे |
तो चि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥
(तु. गा. २८३६)
संत एकनाथांनीही अशीच साधकाची आचारसंहिता त्यांच्या मांडली आहे.
माझी पावावया स्वरूपसिद्धी | मळिणाचिये चित्त शुद्धी |
वेदू स्वधर्म प्रतिपादी | त्यागवी निषेधी विषयाते ॥
तेथ अग्निहोत्रादी पविधान | यज्ञांत कर्माचरण |
ते चित्त शुद्धीचे कारण | वैराग्य दाउन उपजावी ॥
दाउन वैराग्य उत्पत्ती | इहामूत्र विषय निवृत्ती |
तेव्हा साधकासी माझी प्राप्ती | सहजस्थिती स्वभावे
एवं कर्मकांडाचिये स्थिती | विधिनिषेध वेदोक्ती |
साधका माझी प्राप्ती | जाण निश्चिती हेतु ॥
(ए. भा. २१/४६०-४६३)
Saint Tukaram : विहित कर्माचे जो स्वतः आचरण करतो त्याला मोक्षाच्या आधीची स्थिती वैराग्य प्राप्त होते. आपल्या आयुष्यात निषिद्ध कर्माचा लवलेशही येऊ न दिल्यामुळे मनुष्य भयापासून मुक्त होतो व आत्मजागृतीचा ठेवा मिळवतो. वैराग्य म्हणजे सूर्याचा उदय होय. विहित कर्म हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे. त्या मार्गानेच जीवनात मार्गक्रमण करणे हेच त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे गमक आहे. यापेक्षा श्रेष्ठ त्याची सेवा नाही. स्वधर्माचे आचरण हाच मुख्य धर्म होय. ज्याचे जे विहित कर्म नियोजिलेले आहे, ते त्याने मनोभावे करणे, हेच भगवंताचे स्मरण आहे. अशा कर्मयोगाचे आचरण केल्यास त्याची प्राप्ती झाल्यावाचून राहत नाही. स्वधर्माचरण केल्याने ते कर्म ईश्वरार्पण होते. रज तमाचा लोप होऊन शुद्ध, सात्त्विक गुणांची वृद्धी झाल्यावर आत्मस्वरूपाचे ज्ञान होते. संकल्प व फलाशाविरहित निष्कर्मता प्राप्त होते. फलाशा व अहंकार सोडून निर्विकल्प स्वधर्माचरण हेच माझे भजन. त्यायोगे मी प्रसन्न होऊन भक्तांना विवेक, वैराग्य, ज्ञान देतो. त्या ज्ञानाने मन शुद्ध होऊन त्याला माझी परमभक्ती लाभते. त्या परमभक्तीने माझी प्राप्ती होते, असे भगवंत उद्धवाला म्हणाले. स्वधर्मानुसार कर्माचरण केल्याने वैराग्य वाढते. त्यायोगे ईश्वराच्या सर्वात्मकपणाचे ज्ञान, ज्ञानाने भक्ती, भक्तीने सुख वाढत जाऊन अंती ईश्वरप्राप्ती होते. निष्काम कर्माने वासनांचा लय होतो. वासना निमाल्या म्हणजे हेच वैराग्य होय. वैराग्याने ईश्वराचे ज्ञान, ज्ञानाने होऊन भक्तीची पराकाष्ठा झाल्यावर आत्मप्राप्तीचा लाभ होतो.
(मराठी संतांचा आध्यात्मिक विचार-डॉ. शंकर चतुरकर, पृ. ७२ वरून)
संत तुकाराम म्हणतात, ज्ञात्याला कर्मफलाची बाधा होत नाही. पद्यपत्र जलात राहूनही त्याला जलाचा संसर्ग बाधत नाही. ज्ञानी पुरुषाचे सर्वच कर्म फलेच्छारहित असल्यामुळे ते निष्काम कर्म होते. त्याची सर्व क्रिया भगवंताकरिताच असते. त्याचा विषयच भगवंत झालेला असतो. निष्काम कर्म केल्याने ब्रह्मस्वरूप झालेल्या भक्तांचे कर्मही ब्रह्मस्वरूपच होते.
(मराठी संतांचा आध्यात्मिक विचार -डॉ. शंकर चतुरकर, पृ. ७४ वरून )
भगवंताच्या नित्य चिंतनाने निष्काम कर्म घडते. भक्तीवाचून निष्काम कर्म होत नाही. आत्मप्राप्तीकरिता परमार्थ साधनेत भक्ती अखंड अनुस्यूत आहे. स्वधर्मकर्माचरणाचे फळ म्हणजे ईश्वरप्राप्तीशिवाय कशाचीही इच्छा धरू नये. जीवन जगावे व विहितच कर्म करावे. जोपर्यंत देह बुद्धीशी एकरूपता किंवा तादात्म्य भावना असेल तोपर्यंत प्रत्येक जीवाकडून कर्म घडणे अपरिहार्य आहे. मग ते कर्म पापात्मक किंवा पुण्यात्मक असू शकते.
Saint Tukaram : कर्म करताना मनुष्य त्याच्या परिणामांची किंवा फळाची पर्वा करीत नसला, त्याची दक्षता घेत नसला तरी जीवाला त्या कर्माची फळे भोगावी परिणाम सहन करावे लागतात. आज जी सुखदुःख प्राप्त झालेली आहेत ती मागच्या बर्यावाईट कर्माची फळे आहेत. आता जी आणि जशी कर्मे आपण आचरणात आणू त्यानुसार पुढे फळ मिळेल. वेदनिषिद्ध कर्माला ‘पाप’ म्हणतात आणि वेदविहित आचरणाला ‘पुण्य’ म्हणतात. म्हणूनच पाप आणि पुण्य हे बुद्धिगम्य नसून शास्त्रगम्य आहे. बुद्धीने चांगले-वाईट ठरविलेल्या मानलेल्या कर्मांना किंवा आचरणाला पाप म्हणता येणार नाही. त्यासाठी वेद काय सांगतात ते आचरावे. वेदविहित कर्मे करावीत. वेदाज्ञेप्रमाणे न वागल्यास नरकयातना भोगाव्या लागतात. पाप करणारा राजा जरी असला, तरी त्याचे आचरण चांगले नसेल तर त्याला एक दिवस रंक व्हावे लागेल. राजा किंवा कोणत्याही जबाबदार व्यक्तीने कसे वागावे त्याचा आचारधर्म असावा, याविषयी तुकाराम महाराज सांगतात-
जया शिरी कारभार | बुद्धी सार तयाची ॥
वर्ते तैसे वर्ते जन | बहुतां गुण तयाचा ॥
(तु. गा. २७२१)
Saint Tukaram : सर्व संतांनी वेदप्रामाण्य, धर्मानुष्ठान, ईश्वरकारणवाद, हरिभक्ती या मूल्यांचा पुरस्कार केला. व्यक्तिगत उत्कर्षाकरिताच नव्हे तर समाजातील नैतिक स्थैर्याकरितादेखील आज सर्व समाज व देशाला या मूल्यांची आहे. कुटुंबप्रमुखाने केलेल्या अनैतिक कार्याचे दुष्परिणाम जसे सर्व कुटुंबाला भोगावे लागतात. तसे समाजप्रमुखाने केलेल्या अनैतिक वर्तनाचे दुष्परिणाम सर्व समाज आणि देशाला भोगावे लागतात. जसे-
एथ वडील जें जें करिती | तया नाम धर्मु ठेविती ॥
तेचिं येर अनुष्ठिती | सामान्य सकळ ॥
हें ऐंसे असे स्वभावें | म्हणोनि कर्म संडावें |
विशेषे आचरावें | लागे संतीं ॥
संतांनी सांगितलेला आचार धर्म हा वर्तमान काळात सुखमय आणि भविष्यकाळाला आनंददायी करणारा आहे. त्यासाठी या आचार धर्ममूल्याची आज समाजामध्ये नितांत आवश्यकता आहे.