रेल्वेवर जिहादी घातपाताचे संकट

    दिनांक :25-Sep-2024
Total Views |
वेध
- गिरीश शेरेकर
Jihadi attack on train : ब्रिटिश काळात उदयास आलेली भारतीय रेल्वे देशभरातील सामान्य नागरिकांचे आज प्रवासाचे मुख्य साधन आहे. विस्तीर्ण भूभागावर वसलेल्या भारतात रेल्वेचे जाळे खर्‍या अर्थाने विणायला सुरुवात झाली. जशी लोकसंख्या वाढली, त्या आवश्यकतेनुसार रेल्वेचा विस्तार सातत्याने होत आला आहे. सामान्य जनतेला माफक दरात आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी रेल्वेचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या सुविधा प्रवाशांना देण्यात येत आहेत. केंद्र शासनाने गेल्या १० वर्षांपासून रेल्वेचे अत्याधुनिकीकरण सुरू केले आहे. वंदे नावाने अत्याधुनिक रेल्वे गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. आतापर्यंत लांब पल्ल्याच्या ५४ वंदे भारत रेल्वे सुरू झाल्या असून त्यापैकी ११ गाड्या महाराष्ट्राला देण्यात आल्या आहेत. आता तर वंदे भारत मेट्रो सुरू करण्यात आली आहे. रेल्वे स्थानके सोयी-सुविधांनी सुसज्ज होत आहेत. देशाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी भारतीय रेल्वे जगात क्रमांकावर आहे. व्यवस्था कोणती असो, त्यात अडचणी येतातच. रेल्वे त्याला अपवाद नाही.
 
 
railwaytrack
 
Jihadi attack on train : रेल्वेचे अपघात नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. अनेक अपघात आजपर्यंत झाले. बहुतांश अपघात तांत्रिक व मानवी चुकीमुळे झाले आहेत. या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात आले. आता रेल्वेने कवच प्रणाली विकसित केली आहे. २०२७-२८ पर्यंत ३४ किमी रेल्वे मार्गावर ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकीकडे रेल्वे सक्षम होत असून दुसरीकडे जाणीवपूर्वक रेल्वेचे अपघात घडविण्याचे प्रयत्न होत आहेत. जिहादी मानसिकता जोपासणार्‍यांचे हे कृत्य असल्याचे समोर येत आहे. अलिकडच्या काळात अनेक राज्यांत रेल्वे रुळांवर लोखंडी रॉड, बोल्डर, सिलेंडर इत्यादी काही वस्तू ठेवून घातपाताचे प्रयत्न आले आहेत. या महिन्यातल्या उत्तरप्रदेशच्या दोन घटनांसह गेल्या दोन महिन्यांत रेल्वेचा घातपात करण्याचे २० पेक्षा जास्त प्रयत्न समोर आले आहेत. त्यामागे दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच केंद्र सरकारने त्याबाबत कठोर पावले उचलली आहेत. ताज्या घटनांचा तपास पोलिस, गुप्तचर यंत्रणेव्यतिरिक्त एनआयएदेखील करीत आहे. तपासातून मिळालेल्या माहितीनंतर रेल्वेने सतर्कता आहे. गुप्तचर विभागाला इशारा दिला आहे. भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याने हे नवे षडयंत्र रचले जात आहे. भारतविरोधी बाह्य व अंतर्गत शक्ती या घातपातामागे आहे. हे डाव उधळले जात असले तरी मोठ्या दुर्घटना घडण्याच्या पूर्वी अशा विघातक शक्ती शोधून ठेचणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
 
 
Jihadi attack on train : रेल्वे घातपाताचा कट गुन्ह्यांतर्गत आणण्याची तयारी सरकार करीत आहे. त्यासाठी रेल्वे अधिनियमात दुरुस्ती केली जाणार आहे. याविषयीची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यमान स्थितीत रेल्वे अधिनियम-१९८९ च्या कलम १५१ अंतर्गत रेल्वे दुर्घटनेचा कट सिद्ध झाल्यास कमाल १० वर्षांची शिक्षा व दंडाची तरतूद आहे. आता या अधिनियमात उपकलम जोडून त्यास देशद्रोहाच्या श्रेणीत जाईल. रुळावर अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न हा कट आहे. यातून दुर्घटना घडल्यास प्राणहानी होते. अशा आरोपीच्या विरोधात सामूहिक हत्येचे कलम लावण्याचा विचार होत आहे. त्यात जन्मठेपेपासून मृत्युदंडापर्यंतची तरतूद असू शकते. त्यावरून कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. घातपात थांबविण्यासाठी निवडक प्रवासी गाड्यांना संवेदनशील भागातून पाठविण्याआधी पायलट लोको चालवली जाणार आहे. रेल्वे रुळावर पोलिस, गँगमनचे निरीक्षण वाढविण्यावर जोर दिला जात आहे. संवेदनशील भागात रेल्वे प्रशासन कॅमेरे लावणार आहे. रेल्वे इंजिनावर कॅमेरे लावण्याची योजना आहे. यातून चांगली निगराणी होईल आणि घातपाताचे प्रयत्न आधीच रोखता येतील, असे सांगितले जात आहे. केंद्र सरकार योग्य दिशेने प्रामाणिक काम करीत आहे. फक्त हे उपाय तातडीने अंमलबजावणी व्हावी आणि रेल्वेवर घोंगावणारे संकट दूर करावे, अशी माफक अपेक्षा जनतेला आहे. 
 
- ९४२०७२१२२५