- देशातील पहिल्या ऑक्सिजन बर्ड पार्कचे थाटात उद्घाटन
- विकएन्ड कल्चरमध्ये सुंदर भर
नागपूर,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे,
पक्षी ही सुस्वरे आळविती !
'Oxygen Bird Park' : तुकाराम महाराजांच्या या अभंगाची अनुभूती देणार्या ‘डेडीकेशन टू द नेशन-ऑक्सिजन बर्ड पार्क’ चे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. महामार्ग भारत सरकार आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तर्फे आयोजित या कार्यक्रमात आ. आशिष जयस्वाल, आ. टेकचंद सावरकर, माजी आ. सुधाकर कोहळे, खा. श्यामकुमार बर्वे, आ. विकास कुंभारे, मिनिस्ट्री ऑफ रोड हायवेचे सचिव अनुराग जैन, चेअरमन संतोषकुमार यादव व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
गडकरी यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेला हा देशातील बर्ड पार्क आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असे म्हणतात, तद्वतच शहरात प्रवेश करताच जामठा क्लोव्हल लिफ येथील हा पार्क मनाला हिरवीगार सुखद प्रचिती देईल. किलबिलणारे, फांद्यांवर झोके घेणारे, आसमंतात विहरणारे किंवा घरटे बांधून राहणारे पक्षी, तलावात कुंजन करणारे जलचर, नयनरम्य कारंजे, झाडांच्या सानिध्यातील वळणवाटा, सायकल व जॉगिंग आकर्षक फूड कोर्ट, उंच मचाण अशा निसर्ग व आधुनिकेतेचे फ्युजन असलेला हा पार्क निवांत शांतता अनुभवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तरुणाईला भावणार्या विकएन्ड कल्चरमध्ये ही सुंदर भर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरण रक्षणाच्या महायज्ञाला राजमार्ग हरित करीत व या पार्कच्या रुपात गडकरी यांनी सक्षम प्रतिसाद दिला.
'Oxygen Bird Park' : नॅशनल हायवे अॅथॉरिटी इंडियाने जागेचे अध्ययन करुन व आर्किटेक्ट हबीब खान, पर्यावरण तज्ज्ञ दिलीप चिंचमलातपुरे आणि कंत्राटदार शरद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात गडकरींचे हे स्वप्न मूर्त रुपात साकारले. गर्द पर्णाचे वड, पिंपळ, बांबू, पक्षीखाद्यासाठी अंजीर, फणस, आवळा, कस्टर सेब, चिंच, औषधी वनस्पती कदम, बेल, बेहडा, अडुळसा, निम तर लुप्त होणारी प्रजाती बीजा, हल्दू, चे येथे रोपण केले आहे. जिथे वार्याला गवसणी घालणारे वृक्ष असतात तिथली हवा शुध्दा व प्राणवायूने परिपूर्ण असते. तलावात फुललेल्या कमळ आणि कौमुदी सृष्टीसौंदर्यात भर घालणार्या आहेत. मियावाकी पध्दतीने लावलेल्या या ९३ हजार झाडांसह पुनर्रोपणाचाही यशस्वी प्रयोग सुरु आहे. रस्त्यांचा कायाकल्प करणार्या गडकरी यांनी या पार्कसोबतच शहराला टिअर १ यादीत आणले आहे. इथली झुळझुळ वाहणारी हवा, नितळ पाणी अनेक स्थलांतरित पक्ष्यांसाठीही आशियाना निर्माण करेल. विकासात, वैभवात भर घालणारा हा उपक्रम आहे, असे गौरवोद्गार आ. जयस्वाल यांनी काढले. टेकचंद सावरकर यांनी गडकरीं यांच्या कार्याचा आढावा घेतला. खा. बर्वे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन आसावरी देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन पी. सिंग यांनी केले.