संजय कोलते भंडाऱ्याचे नवे जिल्हाधिकारी

03 Sep 2024 09:00:00
भंडारा:
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे स्थानांतरण होऊन भंडाऱ्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी Sanjay Kolte संजय कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वीच जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांचेही बदली झाली होती हे विशेष.
 
 
Sanjay kolte
 
Sanjay Kolte : मागील दोन वर्षांपासून योगेश कुंभेजकर हे जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हाताळीत होते. शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या कुंभेजकर यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदली होणार असे बोलल्या जात होते. दरम्यान आज संध्याकाळी त्यांच्या स्थानांतरणाचे आदेश येऊन त्यांच्या ठिकाणी नवे जिल्हाधिकारी म्हणून संजय कोलते यांची वर्णी लागली आहे. 2010 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या कोलते यांनी नागपूर येथे रोहयो आयुक्त, उस्मानाबाद जिल्हा परिषदेची सीईओ, पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ अशा अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. पोषण आहार अभियानासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक असे दोन्ही अधिकारी नवखे असल्याने आता त्यांच्याकडून जिल्हा वाशियांच्या अपेक्षाही वाढतील.
 
 
 
दोन ओळींचा आदेश
राज्याच्या अप्पर मुख्य सचिव वही. राधा यांच्या स्वाक्षरीने केवळ दोन ओळींचे हे बदली पत्र निघाले आहे. योगेश कुंभेजकर यांच्या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ताबडतोब पदभार स्वीकारावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ एका अधिकाऱ्यासाठी निघालेल्या या बदली पत्रामागे नेमके काय आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र या पत्रात कुंभेजकर यांच्या पदस्थापनेविषयी उल्लेख नाही.
Powered By Sangraha 9.0