दंतेवाडात ठार केलेल्या नक्षलवाद्यांवर ५९ लाखांचे बक्षीस

    दिनांक :04-Sep-2024
Total Views |
- रणधीर होता २५ लाखांचा इनामी
 
दंतेवाडा, 
Naxalites from Dantewada : छत्तीसगडच्या दंतेवाडात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मंगळवारी मृत्युमुखी पडलेल्या नऊ नक्षलवाद्यांच्या शिरावर एकूण ५९ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली. त्यापैकी दंडकारण्य विशेष झोनल कमिटीचा नक्षलवादी रणधीरवर तब्बल २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. या वर्षी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला तो या समितीचा दुसरा नक्षलवादी आहे. दंतेवाडा-बिजापूरसीमेवर मंगळवारी पोलिसांनी कारवाई करीत गणवेशातील नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यात सहा महिलांचा समावेश होता.
 
 
Naxalites
 
Naxalites from Dantewada : या कारवाईमुळे माओवाद्यांच्या पश्चिम बस्तर दर्भा विभागांना मोठा झटका बसला. या भागात नक्षलवाद्यांचे वर्चस्व मानले जायचे, असे बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. पावसाळ्यामुळे भौगोलिक परिस्थिती आव्हानात्मक असताना सुरक्षा दलांनी यशस्वी कारवाई करीत माओवाद्यांना त्यांच्या गडात जबर धक्का दिला, असे ते म्हणाले. जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर्स आणि सीआरपीएफची १११ व २३० बटालियन या चकमकीत सहभागी झाली होती.या चकमकीत ठार झालेल्या इतर नक्षलवाद्यांमध्ये कुमारी शांती, सुशीला मडकम, गांगी मुचाकी, कोसा मडावी, ललिता, कविता यांचा समावेश होता. त्यांच्या शिरावर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. हिडमे मडकम आणि कमलेशवर दोन लाख रुपयांचे बक्षीस होते.
 
 
मोठा शस्त्रसाठा जप्त
घटनास्थळावरून एसएलआर, .३०३ रायफल, मिमी व्यासाची रायफल, बॅरेल ग्रेनेड लाँचर आणि स्फोटके तसेच नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले, असे सुंदरराज पी.यांनी सांगितले.