- जनतेला सुख, समृद्धी मिळू दे : मुख्यमंत्र्यांचे साकडे
मुंबई,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे शनिवारी भक्तिमय वातावरणात घरोघरी आगमन झाले. CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी दे, अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री शिंदे, पत्नी लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, गणरायाचे आगमन झाले. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, समाधान, समृद्धी येवो, प्रार्थना. प्रत्येक गणोशोत्सव एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येतो. सर्वत्र मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होते. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचे दर्शन घडते. संपूर्ण जगाचे महाराष्ट्राकडे लक्ष लागले असते. या काळात महाराष्ट्राच्याच नाही तर, देश-विदेशातही मराठी माणसांत उत्साह दिसतो. हे शेतकर्यांचे, कष्टकर्यांचे सरकार आहे. यंदा राज्यात सगळीकडे खूप पाऊस झाला आहे, त्यामुळे शेतकर्यांमध्येही उत्साह आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेेतीचे नुकसान झाले. सरकार पूर्णपणे शेतकर्यांच्या पाठीशी आहे, त्यांना योग्य ती मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. माझे आपणास आवाहन आहे की, श्री गणेशाची मनोभावे सेवा करताना आपण सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवूया. गरजू लोकांपर्यंत पोहचा, त्यांना मदतीचा हात द्या. शिक्षण, आरोग्य तसेच विविध प्रकारच्या सेवा, मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, असे CM Eknath Shinde शिंदे म्हणाले.
पर्यावरणाचे रक्षण आवश्यक
आपण पर्यावरणाची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. सणवार हे निसर्गाला पूरक असे असतात. त्यामुळे निसर्गाचे जतन-संवर्धन होईल, ही बाब लक्षात घेऊन सण साजरे करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.