अकोला,
Akola News : येथील जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारी 2020 मध्ये झाली होती. त्यावेळीही ओबीसी मतदार संख्येवरून बरेच वादंग माजले होते. अनेकांनी न्यायालयाचाही रस्ता धरला होता. दरम्यान आता येत्या 16 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्याही निवडणुका लवकरात लवकर घ्याव्या लागणार आहेत.पण न्यायालयीन बाबीमुळे जि.प.च्या निवडणुका होतात अथवा आता मनपा प्रमाणे जि.प.वरही प्रशासकांचे राज्य कायम राहाते हे येत्या काळात दिसून येणार आहे.
जिल्हा परिषदेची मुदत संपण्याआधी शासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला नाही तर 16 जानेवारीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदत संपल्यानंतर त्याठिकाणी प्रशासक राज कायम होणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या संदर्भातला निर्णय अद्याप बाकी आहे.या दरम्यान जिल्हा परिषदेचे सत्ताधारी व विरोधी पक्षाचे सदस्य मुंबईत दाखल झाले असून ते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेवून मुदतवाढीची मागणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
22 रोजी सुनावणी
ओबीसी आरक्षणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 22 जानेवारी 2025 रोजी सुनावणी आहे. त्यानंतरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला जाईल असे दिसून येत आहे. राज्यातील नागपूर, वाशीम, अकोला, धुळे, नंदुरबार, पालघर या जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपणार असून त्यावरही प्रशासकराज येणार का? हे येत्या काळात दिसून येणार आहे.