गडचिरोलीच्या विकासाला फडणवीसांचे पंख

    दिनांक :23-Jan-2025
Total Views |
अग्रलेख...
Devendra Fadnavis : काँग्रेसच्या कार्यकाळात विदर्भाच्या मागासलेपणाबद्दल सातत्याने चर्चा व्हायची. विदर्भाचा औद्योगिक, शैक्षणिक, कृषी आणि पायाभूत सुविधांचा अनुशेष मोठा असल्याचे नागपूर कराराचे दाखले देऊन स्वतंत्र विदर्भाची मागणी तसेच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी करण्याचा आणि या मागणीला सर्वपक्षीय पाठिंबा मिळण्याचा तो काळ होता. राजकीय प्रतिनिधित्व पुरेशा प्रमाणात नसल्याचेही बोलले जायचे. पण आताशी त्याबद्दल फारसे बोलले जात नाही; त्याला कारणेही आहेत. विदर्भातील अनेक मंत्र्यांना राज्य मंत्रिमंडळात मानाच्या पदावर सामावून घेतले गेले आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील कच्चा माल थेट मुंबईपर्यंत पोहोचविण्याची सोय झाली आहे. सोबतच सिंदी ड्रायपोर्टमुळे विदर्भातील उत्पादने थेट भारतातील विविध शहरात वायुवेगाने मार्गही मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाच्या झंझावातामुळे मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातही सर्वत्र विकासाची गंगा वाहताना दिसत आहे. फडणवीसांनी कमाल केल्यामुळे गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याचे भाग्य उजळले आहे. येथे नक्षलमुक्तीसोबतच औद्योगिक परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत.
 
 
Devendra Fadnavis
 
महाराष्ट्राच्या सुदूर टोकावर असलेल्या गडचिरोलीसारख्या मागास आणि नक्षलग्रस्त पालकमंत्रिपद स्वीकारून त्यांनी भविष्यात राज्याचे धोरण ग्रामीण आणि वनवासीबहुल भागाच्या विकासाचे राहणार असल्याचे दाखवून दिले आहे. विदर्भातील सर्वात मागास राज्यातील या शेवटच्या जिल्ह्यात विकासाची गंगा कधी पोहोचलीच नाही. नादुरुस्त रस्ते, आजारी उद्योग, बेरोजगारी, शैक्षणिक पीछेहाट, विविध क्षेत्रात संधींचा अभाव या पाचवीलाच पुजलेल्या येथील समस्या होत्या. आता मात्र गडचिरोली जिल्ह्यातील पदरात मुख्यमंत्र्यांच्या दावोस भेटीच्या निमित्ताने मोठी गुंतवणूक पडली आहे. जागतिक आर्थिक फोरम परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसाठी मोठी गुंतवणूक खेचून आणली आहेे. या जिल्ह्यात जेएसडब्ल्यू ३ लाख कोटींची तर कल्याणी समूह ५२५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. गडचिरोलीमध्ये गुंतवणुकीबाबत झालेले हे करार ही तर सुरुवात आहे. येत्या काळात आणखी उद्योग या मागास जिल्ह्याच्या मातीत रुजलेले दिसतील, असे मत व्यक्त होत आहे. कल्याणी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यादरम्यान स्टील आणि संरक्षण क्षेत्राबाबतचे करार झाले आहेत. त्यानुसार पोलाद उद्योगासाठी ५२५० कोटी रुपयांची गुंतवणूक जिल्ह्यात होत असून त्यातून तब्बल चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतील. अर्थात एका कुटुंबातील किमान चार म्हणजे हजार लोकांच्या जीवनाला प्रगतीचे पंख फुटणार आहेत. यातून गडचिरोलीच्या आर्थिक समृद्धीतही भर पडल्याशिवाय राहणार नाही.
 
 
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या योजना आणि धोरणांमुळे केवळ पायाभूत सुविधाच नव्हे तर कृषी, शिक्षण, उद्योग, पर्यटन, दूरसंचार, सिंचन आणि परदेशी गुंतवणुकीलाही चालना मिळाली आहे. त्यांच्याच नेतृत्वात कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, समुद्री बोगदा, अटल सेतू असे प्रकल्प मार्गी लागल्याने महाराष्ट्राची गतकाळात प्रगतीत झालेली पीछेहाट दूर झाली. त्यांचे नेतृत्व राज्याचे कल्याण करणारे असल्याची खात्री पटल्यानेच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनतेने त्यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर केला. शपथविधीनंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याकडे आपले लक्ष केले. नववर्षाच्या प्रारंभी त्यांनी गडचिरोली गाठली आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन येथील जनतेला दिले. या नक्षलग्रस्त भागात उद्योग आणण्याची घोषणा करून, त्यांनी पंतप्रधानांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही प्रशस्ती मिळविली. जिल्ह्यासाठी दावोसहून मोठी गुंतवणूक आणून त्यांनी हा जिल्हा शेवटचा नव्हे तर पहिला असल्याचे जनतेला दाखवून दिले आहे. गडचिरोलीच्या कात दखल माध्यमांनाही घ्यावी लागली. एरवी गडचिरोलीच्या नावाने नाक मुरडणार्‍या माध्यमांना या जिल्ह्यात आलेल्या गुंतवणुकीची नोंद घेऊन त्यावर भाष्य करणे भाग पडले. येत्या काळात विकासाचे वारे वाहू लागल्याने हा जिल्हा संपूर्ण कात टाकेल, याची ग्वाहीच जणू या करारांमधून मिळाली आहे. रस्ते, पूल, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या बदलांमुळे गडचिरोलीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनमानात मोठा बदल घडणार एवढे निश्चित.
 
 
विकासाच्या या वाटचालीत महाराष्ट्राचे युवा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांनी या दुर्गम भागाच्या पायाभूत सुविधांपासून ते स्थानिक नागरिकांच्या जीवनशैलीपर्यंत सर्वांगीण प्रगतीसाठी प्रभावी योजना राबवल्या. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात परिवर्तनाचे आणि विकासाचे नवे पर्व दिसू जेएसडब्ल्यू गडचिरोलीत ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यातूनही हजारो रोजगारांची निर्मिती स्थानिक वनवासींसह कौशल्यप्राप्त गरजू युवकांसाठी होणार आहे. रिकाम्या हातांना काम मिळाल्याने युवकांच्या टिवल्याबावल्या आपसूकच बंद पडतील. ऊठसूट पानटपरीकडे धाव घेण्याची युवकांची सवय मोडून पडेल. नोकरीची जबाबदारी आल्याने चकाट्या पिटण्याच्या सवयी बाजूला पडतील. बेरोजगारीमुळे वाढणारे गुन्हे आणि वृत्तीकडे धाव घेण्याच्या प्रवृत्तीलाही आळा बसेल. या सार्‍या बाबी जिल्ह्यात होणार्‍या मोठ्या गुंतवणुकीमुळे साध्य होणार आहेत. त्यासाठी आया-बहिणींचे आशीर्वाद निश्चितच देवाभाऊंच्या पारड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. हीच आशीर्वादरूपी जनतेची थाप त्यांना येत्या काळात प्रगतीच्या आणखी वाटांवर यश मिळवून देणारी ठरल्यास आश्चर्य वाटू नये.
 
 
Devendra Fadnavis : चालू वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवाभाऊंनी गडचिरोलीमध्ये अनेक भूमिपूजन केले. आता या जिल्ह्याची स्टील सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉयड मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या पोलाद कारखान्यासह विविध प्रकल्पांची पायाभरणी यापूर्वीच केली आहे. लॉयड काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटल, विद्यानिकेतन सीबीएसई शाळा, वन्या क्लोविंग कंपनी, कौशल्य विकास केंद्र, फॅमिली क्वार्टर्स, पोलिस ऑफिसर्स फॅमिली क्वार्टर्स, जिमखाना, बालोद्यान, मदत केंद्राच्या विकास यात्रेलाही त्यांनीच हिरवी झेंडी दाखविली आहे. देवेंद्रजींनी राज्याच्या विकासाला चालना देताना शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन दिलेले आहे. वंचित घटकातील लोकांना शासकीय वसतिगृहे आणि निवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. विविध समाजाच्या उत्थानासाठी निरनिराळ्या महामंडळांची घोषणा करून त्यांना त्या त्या समाजाच्या महापुरुषांची दिलेली नावे, कल्पक नवी ऊर्जा निर्माण करणारी ठरली. महामंडळांची निव्वळ घोषणा करून ते थांबले नाहीत, तर त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करून काही योजनांना अंतिम रूपही दिले. कृषी क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या जलयुक्त शिवार आणि शेततळे योजना अतिशय सफल झाल्या. त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या या प्रकल्पांचे पुरस्कर्ते आजही त्यांना कृषी क्षेत्रातील या क्रांतीसाठी धन्यवाद त्यांच्या पुढाकारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वनवासी युवकांच्या नक्षल चळवळीत सामील होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली, हे कुणीच नाकारू शकणार नाही. गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहेत. इथला नक्षलवाद आणि त्यांना सैद्धांतिक पाठिंबा देणारी अर्बन नक्षल्यांची शक्ती नामशेष करून सामान्य माणसांना राष्ट्रीय प्रवाहाशी जोडण्याची गरज आहे. काही वर्षांत गडचिरोलीतील युवक नक्षलवाद्यांच्या संघटनांमध्ये सहभागी झाल्याची नोंद नाही. उलट अनेक नक्षली आत्मसमर्पण करून सन्मानाने जगण्याचा मार्ग निवडत आहेत. गडचिरोलीच्या विकासाला फडणवीसांनी लावलेल्या पंखांमुळेच हे सारे शक्य झाले आहे.