नागपूर,
Nagpur murder case : कारागृहातून सुटका होण्यास चोवीस तासही झाले नव्हते. पाळतीवर असलेल्या आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केली. अमोल कृष्णा वंजारी (31) रा. अंतुजीनगर, भांडेवाडी असे मृताचे नाव आहे. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अजून काही दिवस कारागृहात राहिला असता तर त्याचा जीव वाचला असता, अशी परिसरात चर्चा होती.
अमोलचे वडील कृष्णा वंजारी (50) यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वपोनि बोराडे यांच्या मार्गदर्शनात रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या. जब्बार ऊर्फ यश प्रधान, ऋषिकेश ऊर्फ साजन प्यारेलाल उके (27) रा. भांडेवाडी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याशिवाय इतर पाच अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे.
मृतक अमोल हा केबलचे काम करायचा. तो आई- वडिलांना एकुलता एक होता. काही दिवसांपूर्वी आरोपी जब्बार आणि अमोलचा मित्र यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी अमोलच्या मित्राने जब्बारला गंभीर दुखापत केली होती. त्याचा एक हात निकामी झाला होता. या प्रकरणात अमोलवरही गुन्हा दाखल झाला होता. इतरांसोबत अमोलही कारागृहात होता. आरोपी जब्बार आणि त्याचे साथीदार अमोलसह इतरांची वाट बघत होते.
21 जानेवारी रोजी अमोलची कारागृहातून सुटका झाल्याची माहिती आरोपी जब्बारला मिळाली. त्याने इतरांना सोबत घेऊन अमोलला मारण्याची योजना आखली. दरम्यान अमोल बुधवारी रात्री मित्राच्या घरी गेला. मित्र कारागृहात असल्याने त्याची पत्नी चिंतेत होती. तिला पतीची भेट घ्यायची होती. त्यामुळे अमोल रीतसर माहिती देण्यासाठी गेला होता. हीच संधी साधून आरोपी अमोलवर तुटून पडले. अमोल जीव वाचविण्यासाठी पळाला. आतमधून दार बंद करून त्याने स्वत:ला कोंडून घेतले. दार तोडून आरोपी आत शिरले. अमोलवर धारदार शस्त्राने वार करून पळाले. अमोल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अमोलला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून दडून असलेल्या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली.