गोंदिया जिपचे अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध

24 Jan 2025 19:52:46
गोंदिया, 
Gondia Zilla Parishad : गोंदिया जिपचा अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीला घेऊन अनेक चर्चा जिल्ह्यात रंगल्या असताना आज, शुक्रवारी २४ जानेवारी रोजी या चर्चांना पुर्णविराम लागले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज, जिपच्या सभागृहात घेण्यात आलेल्या निवडणूकीत भाजपचे जिप गटनेते लायकराम भेंडारकर यांची अध्यक्षपदी तर राकाँचे सुरेश हर्षे यांची उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
 
 
 
klkl
 
 
 
गोंदिया जिल्हा परिषदेत एकूण ५३ सदस्य संख्या असून २८ सदस्यांसह भाजपकडे बहूमत आहे. असे असताना राकाँच्या ८ सदस्यांसह चाबी संघटनेच्या ४ सदस्यांचेही सत्तेत सहभाग आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या सत्ता स्थापनेत अध्यक्ष पद भाजपकडे तर उपाध्यक्ष व एक सभापती राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आले होते. तेव्हा आताही तोच फॉर्म्यूला लागू होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. अशावेळी निवडणूकीच्या काळात कसलाही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपकडून सर्व सदस्यांना पर्यटनाला पाठविण्यात आले असताना राकाँचे सदस्यही कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होते.
 
 
दरम्यान, चोरखमारा येथे झालेल्या भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकीत अध्यक्षपदाकरीता जिप गटनेते लायकराम भेंडारकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दुसरीकडे राकाँतर्फे घेण्यात आलेल्या बैठकीत सुरेश हर्षे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यानुसार शुक्रवारी पार पडलेल्या निवडणूकीत अध्यक्ष पदासाठी भाजपकडून लायकराम भेंडारकर तर उपाध्यक्ष पदासाठी राकाँतर्फे सुरेश हर्षे यांनी नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज सादर करण्यात आल्याने दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
 
 
आता लक्ष विषय समितीकडे...
 
 
गोंदिया जिल्हा परिषदेत पक्षीय बलाबल पाहता भाजप २६, काँग्रेस १३, राकाँ ८, आ. विनोद अग्रवाल यांची चाबी संघटना ४ व अपक्ष दोन अशी संख्या आहे. यात दोन्ही अपक्ष व चाबी संघटनेचे ४ सदस्य भाजपमध्येच असून मित्र पक्ष म्हणून राकाँही सत्तेत सहभागी आहे. त्यात गेल्या वेळी एक सभापती पद राकाँकडे तर एक पद अपक्षाला देण्यात आले होते. तर चाबी संघटनेच्या सदस्यांसह एका अपक्षाला भोपळा देण्यात आला होता. तेव्हा आता राकाँचे सभापतीपद चाबीकडे व एक पद अपक्षाकडे जाणार असल्याच्या चर्चा जिप वर्तळात सुरू होत्या. तर भाजप सदस्यांपैकी कोण भाग्यवान ठरणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0