गतवर्षीच्या 366 पैकी 293 दिवस प्रदूषित, तर 73 चांगले!

    दिनांक :03-Jan-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
Chandrapur Pollution News : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारे दररोज घेण्यात येणार्‍या हवा गुणवत्ता निरीक्षणाची 2024 या मागील वर्षातील आकडेवारी पाहता, 366 दिवसात चंद्रपूरमध्ये केवळ 73 दिवस प्रदूषणमुक्तीचे होते. उरलेले 140 दिवस सामाधानकारक प्रदूषण, 137 दिवस माफक प्रदूषणाचे, तर 16 दिवस आरोग्यासाठी धोकादायक होते. सुदैवाने, हानिकारक प्रदूषणाचा एकही दिवस नव्हता.
 
 
 
CHAND
 
 
 
2023 च्या तुलनेत 2024 मध्ये प्रदूषण थोडे कमी झाले, ही समाधानाची बाब असली तरी सुक्ष्म धुलीकणाचे प्रमाण आणि जमिनीवरील ओझोनचे प्रमाण वाढले आणि हे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षनाच्या आधारे ही वार्षिक आकडेवारी ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी दिली.
 
 
चंद्रपूर जिल्ह्यासोबतच शहरात आणि औद्योगिक क्षेत्र खुटाळा येथे वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे वायू प्रदूषणाची नोंद घेतल्या जाते. ही आकडेवारी शहरातील बसस्थानक जवळ असलेल्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या केंद्रातील आहे. घुग्घूस औद्योगिक क्षेत्रात यापेक्षाही जास्त प्रदूषण पाहायला मिळते. चंद्रपूर शहर हे राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम अंतर्गत येते आणि त्यात वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी अनुदान आणि सहाय्य मिळते. 2 जानेवारी 2025 रोजी चंद्रपूर महापालिकेत झालेल्या बैठकीमध्ये हा मुद्दा चर्चेला गेला असून, विविध विभागांना कृती कार्यक्रम राबविण्यासाठी सांगितल्या गेले आहे.
 
 
हिवाळा अतिशय प्रदूषित
 
 
खरे तर हिवाळा हा ऋतू अतिशय आरोग्यदायी असतो. परंतु, अलीकडे सर्व शहरे ही प्रदूषित झाल्यामुळे हा ऋतूसुद्धा प्रदूषणामुळे आरोग्यासाठी अतिशय हाणीकारक ठरू लागला आहे. भौगोलिकदृष्ट्या संथ हवा आणि कमी तापमान हे जास्त प्रदूषणास कारणीभूत ठरतात. या ऋतूतील गतवर्षीऑक्टोबर महिन्यातील 31 दिवसापैकी 23 दिवस प्रदूषित, नोव्हेंबर महिन्यातील 30 दिवसापैकी 30 दिवस, डिसेंबर महिन्यातील 31 पैकी 29 दिवस, तर जानेवारीमध्ये एकूण 31 दिवसापैकी 31 दिवस प्रदूषण आढळले. हिव्वाळ्यातील एकूण 123 दिवसापैकी 113 दिवस प्रदूषण होते.
 
वर्षात जास्त प्रदुषके कोणती?
 
 
गेल्या वर्षातील 366 दिवसात सर्वाधिक सूक्ष्म धुलीकन 2.5 चे प्रमाण जास्त म्हणजे 160 दिवस आढळले. 10 मायक्रोमीटरची प्रदुषके 144 दिवस आढळले, 54 दिवस पावसाळ्यात जमिनीवरील ओझोनचे धोकादायक प्रदूषण आढळले. तर 2 दिवस कार्बन मोनोक्साइडचे प्रदूषण आढळले.