आता घटनास्थळीच गुन्ह्याचे चित्रण

30 Jan 2025 21:46:37
नागपूर,
Mobile Forensic Van : पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या उपस्थितीत अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन शहरातील पाचही परिमंडळाच्या पोलिस उपायुक्तांच्या सुपूर्द करण्यात आली. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक कॅमेरे असल्याने आता घटनास्थळी गुन्ह्याचे चित्रण करून नमूने गोळा करता येईल. गुन्हा केल्यानंतर पुरावे नष्ट करणाèयांसाठी ही फॉरेन्सिक व्हॅन कर्दनकाळ ठरणार आहे. कारण फॉरेन्सिक पुरावे न्यायालयात ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.
 
 
mob
 
फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्यासाठी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक समन्वयक डॉ. विजय ठाकरे यांनी अथक परिश्रम घेतले. या व्हॅनमध्ये एकूण 16 किट तयार देण्यात आल्या आहेत. प्रत्येक व्हॅन ही वातानुकूलित असून त्यामध्ये संगणक तसेच प्रिंटर्स, फ्रिज, केमिकल अ‍ॅनालिसीस देण्यात आले आहे. तसेच सायबर गुन्हे किंवा विस्फोटक पदार्थासंबधी गुन्हे घडल्यास त्यावर तत्काळ परीक्षण करण्यासाठी संपूर्ण सामग्री उपलब्ध आहे. प्रत्येक वाहनांमध्ये क्राईम सिन कव्हर करण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच एक फॉरेन्सिक लॅबोरेटरी अधिकारी, सहायक तथा अटेंडस, पोलिस कर्मचारी आणि वाहन चालक उपलब्ध राहणार आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञ हे घटनास्थळाहून गोळा केलेले नमूने संबधीत तपास अधिकारी यांना क्राईम सिन अहवालासह तयार करून देतील.
 
 
याप्रसंगी अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलिस उपायुक्त राहूल माकणिकर, श्वेता खेडकर, लोहित मतानी, राहूल मदने, अर्चित चांडक, महक स्वामी, रश्मिता राव, अश्वीनी पाटील यांच्यासह प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोग शाळेचे उपसंचालक डॉ. विजय ठाकरे, डॉ. सुनीता पाटील व पोलिस अधिकारी, अमंलदार उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0