साप्ताहिक राशिभविष्य

    दिनांक :05-Jan-2025
Total Views |
 साप्ताहिक राशिभविष्य 
 

saptahik 
 
मेष : अकारण अधिक खर्च
Weekly Horoscope : आपला राशिस्वामी मंगळ चतुर्थ स्थानात वक्री असून चंद्र या सप्ताहात लाभ स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. मात्र, लगेच चंद्र व्ययात जाणार असल्याने या आठवड्यात सुरुवातीचा काही काळ काहीसा खर्चिक राहणार आहे. सप्ताहाच्या मध्यापासून चंद्राचे भ्रमण अतिशय उत्तम ठरणार आहे. सुरुवातीला काही खर्च अकारण झालेले असू शकतात. आपणही हौस, मौजेला जरा अधिकच महत्त्व देऊन स्वतःचाच खिसा रिकामा करण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात व्यावसायिक उन्नती व वेगवान प्रगती होईल. या अनुषंगाने एखादी शुभ संधी मिळू शकते. विवाहेच्छू युवांना चांगले योग यावेत.
दिनांक - ८, ९, १०, ११.
 
 
वृषभ : सन्मान वाढविणारे योग
आपला राशिस्वामी शुक्र दशम या कर्म स्थानात असून चंद्रही या सप्ताहात शुक्राच्याच साक्षीने भ्रमण सुरू करीत आहे. यामुळे या आठवड्यात आपली प्रतिष्ठा, हुद्दा आणि सन्मान वाढविणारे योग लाभण्याची शक्यता आहे. आपले कामातील कौशल्य वाखाणले जाईल. आपणास हे सारे खुशी खुबीने बहाल होणार आहे. त्यामुळे जीवनाला एखादे नवे वळण मिळण्याची शक्यता राहील. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्यामुळे आपले महत्त्व वाढेल. दरम्यान, शुक्रासोबतचा शनी व त्यावर मंगळाची अशुभ दृष्टी असल्याने आरोग्याबाबत काही किरकोळ चिंता संभव आहे.
शुभ दिनांक - ५, ६, ७, १०.
 
 
मिथुन :महत्त्वपूर्ण हालचाली घडतील
राशिस्वामी बुध जोडीदाराच्या बळ देत असतानाच आपल्या राशीलाही सुख प्रदान करीत आहे. अशात चंद्र भाग्य स्थानातून या सप्ताहाचे भ्रमण सुरू करीत आहे. यामुळे आता आपणास सर्व चांगल्या योगांचे उत्तम पाठबळ मिळणार आहे. यामुळे आता आपणास कार्यालयीन कामकाजात. व्यवसायात व दैनंदिन जीवनातही बर्‍यापैकी दिलासा मिळू शकेल. या आठवड्यात काही सुखवार्ता कानी पडतील. युवा विवाहाबाबत काही महत्त्वपूर्ण हालचाली घडतील. विवाहाची बोलणी होणे, साक्षगंध-साखरपुडा असे कार्यक्रम घडू शकतात. प्रगतीच्या बातम्या आनंद देतील. युवांना नोकरी- व्यवसायाच्या संदर्भात काही उत्तम संधी लाभतील.
शुभ दिनांक - ५, ६, ८, १०.
 
 
कर्क : वादविवाद वाढवू नका
राशिस्वामी चंद्र सप्ताहाच्या सुरुवातीला अष्टम या संघर्ष व पीडादायक स्थानात असून तो सप्ताहाच्या व्यय स्थानात येणार आहे. चंद्राचे जवळपास हे संपूर्ण भ्रमण काहीसे संघर्षमयच ठरणार आहे. अशातच राशीतील वक्री व उद्विग्न मंगळ आपणास सतत कुठल्या ना कुठल्या वादविवादात, भांडणात गुरफटवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रवर्गात, कार्यक्षेत्रात आपली मते व्यक्त करताना कठोरतम शब्दांचा वापर करू नका. भांडणे-वाद फार काळ लांबणार नाहीत याची दक्षता हवी. या सप्ताहातील ग्रहस्थिती पाहता हे काम जरा जिकरीचेच असणार आहे. मात्र हे पथ्य पाळावयास हवेच. नाहक अट्टाहासाची भूमिका बदलावयास हवी.
शुभ दिनांक - ५, ७, ९, ११.
 
 
सिंह : स्वभावात उग्रपणा संभव
राशिस्वामी रवी धनेश बुधासोबत पंचम या शुभ स्थानात असून चंद्र सप्तम या जोडीदाराला सहायक ठरणार्‍या स्थानातून भ्रमण सुरू आहे. हा आठवडा आपणास संमिश्र स्वरूपाचा जाणार असे दिसते. सुरुवातीच्या दोन तीन दिवसात काहीशी विपरीत ग्रहस्थिती वाट्याला येत असल्याने आपल्या व्यवहारात, वागण्यात बराचसा बदल होण्याची शक्यता राहील. स्वभावात उग्रपणा निर्माण होऊ शकतो. यामुळे नसते वाद उद्भवण्याची शक्यता राहील. कुटुंबात त्याचे पडसाद उमटू शकतात. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने चांगल्या घडामोडी घडतील. आर्थिक होईल. आवक वाढेल. गंगाजळी वाढेल.
शुभ दिनांक - ७, ८, ९, १०.
 
 
कन्या : प्रयत्नांना संमिश्र यश
Weekly Horoscope  :राशिस्वामी बुधाने रवीसोबत सुखस्थानात बस्तान मांडले असतानाच आपल्या राशीत केतू ठाण मांडून बसला आहे. चंद्र सहाव्या कर्म स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. ही ग्रहस्थिती पाहता आपल्या निर्णयांना, प्रयत्नांना संमिश्र स्वरूपाचे बळ मिळणार असे आपण अगोदर केलेली गुंतवणूक, आखलेल्या योजना या सार्‍यांना सप्ताहाच्या उत्तरार्धात चांगली फले लाभू शकतील. नोकरीत उत्तम संधी चालून येतील. आपण घेतलेले परिश्रम, केलेल्या कामांची अधिकारी वर्गाकडून योग्य नोंद घेतली जाऊन त्याचे नोकरीत चीज होताना दिसेल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकेल.
शुभ दिनांक - ७, ८, ९, ११.
 
 
तुळ : कार्यक्षेत्रात उत्तम
राशिस्वामी शुक्र पंचम या शुभ स्थानात योगकारक शनीच्या सोबतीने कार्यरत असून चंद्रही त्यांच्याच सहवासाचा लाभ घेत या सप्ताहाचे भ्रमण सुरू करणार आहे. मुख्य ग्रहांच्या या सहयोगामुळे कर्मचारी तसेच व्यावसायिक वर्गाला या आठवड्यात विशेष संधी लाभण्याचे योग संभवतात. काहींना व्यवसायाचा विस्तार करता येईल. नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी संधी लाभू शकतील. विदेशात जाण्याच्या योजना आखता येतील. विशेषतः शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने अशी संधी लाभू शकेल. युवांना नोकरीच्या संधी लाभतील. विवाह व संततीचे योग लाभावेत.
शुभ दिनांक - ८, ९, १०, ११.
 
 
वृश्चिक : सुरुवातीला आकस्मिक खर्च
आपला राशिस्वामी मंगळ भाग्य स्थानात असला तरी तो वक्री असून स्वतःच्या नीच राशीत निर्बल ठरत आहे. अशात सुखस्थानातून शनी-शुक्राच्या साक्षीने या सप्ताहाचे भ्रमण सुरू करीत आहे. यामुळे हा आठवडा आपणास काहीसा संमिश्र स्वरूपाचा ठरू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला काही आकस्मिक खर्चांना आपणास तोंड द्यावे लागू शकते. उत्तरार्धात काहींना नोकरीत सन्मान, पदोन्नती, एखादी मोठी व महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणे, अधिकार्‍यांची मर्जी लाभणे असा अनुभव येऊ शकतो. स्पर्धा व चढाओढीत आपली सरशी होऊ शकेल. आपले प्रयत्न व मेहनत कमी पडू देऊ नये.
शुभ दिनांक - ८, ९, १०, ११.
 
 
धनु : कार्यक्षेत्रात प्रगती व लाभ
Weekly Horoscope  ; राशिस्वामी गुरू सहाव्या कर्मस्थानात असून आपल्या राशीत रवी-बुधाचे बस्तान आहे. चंद्र पराक्रम स्थानातून शनी-शुक्राच्या साक्षीने या सप्ताहाचे भ्रमण सुरू करीत आहे. ही ग्रहस्थिती पाहता आपणास सप्ताह अनेकविध अनुभव देणारा राहील, असे दिसते. काही चांगल्या घटना घडत असतानाच आठवड्याच्या मध्यात मानसिक चिंता, ताणतणाव निर्माण करणारी घटना अनुभवास येऊ शकते. काही कुटुंबात मतभेद, काही छोट्या-मोठ्या कुरबुरींना या काळात चालना मिळू शकेल. राशिस्वामी गुरू व चंद्राचे या सप्ताहाच्या उत्तरार्धातील शुभ योग आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती व लाभ दर्शवितात.
दिनांक - ८, ९, १०, ११.
 
 
मकर : उत्साह व उन्नतीच्या संधी
राशिस्वामी शनी व योगकारक शुक्र या सप्ताहात धनस्थानात असून ते परस्पर सहवासाने पुलकित आहेत. अशातच चंद्रही त्यांच्याच साक्षीने पराक्रम ते षष्ठ कर्मस्थानापर्यंतचे भ्रमण करणार आहे. त्यामुळे या आठवड्यात एखादा अपवादात्मक पेच वगळता सारा काळ उत्साह, उन्नती व प्रगतीच्या देणारा ठरावा. व्यवसाय व नोकरीत असणार्‍यांना काही जादा कामाचा बोजा सहन कारावा लागू शकतो. मात्र त्यातून लाभ साधता येऊ शकेल. या परिश्रमाचे चीज पुढे होईल. दरम्यान, शनीवर येणार्‍या मंगळाच्या अशुभ दृष्टीमुळे काहींना आरोग्याच्या बाबतीत किरकोळ त्रास उद्भवू शकतात.
शुभ दिनांक - ६, ८, ९, ११.
 
 
कुंभ : मजबूत आर्थिक स्थिती
शनी व योगकारक शुक्र या सप्ताहात आपल्याच राशीत अतिशय बलवान स्थितीत असून चंद्र त्यांच्याच साक्षीने या सप्ताहातील भ्रमण सुरू करणार आहे. या आठवड्यात आपल्या वाट्याला आलेली ही ग्रहस्थिती निश्चितच अतिशय लाभकारक योग निर्माण करणारी ठरावी. व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ संभवतो. त्यामुळे आपले अंदाजपत्रक मजबूत होऊ शकेल. विविध मार्गांनी पैशाची सुरू होऊ शकते. नोकरी-व्यवसायात प्रगती होऊन आवक वाढेल. काहींना नोकरीत पगारवाढ मिळू शकेल. विशेष जबाबदारी सोपविली जाईल. शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात असणार्‍या युवावर्गाला चांगल्या संधी लाभू शकतील.
शुभ दिनांक - ५, ६, ९, ११.
 
 
मीन : आरोग्याची काळजी घ्या
राशिस्वामी गुरू सध्या पराक्रम स्थानी असून आपल्या राशीत राहूने बस्तान जमविले अशात चंद्र व्यय स्थानातून या सप्ताहाचे भ्रमण सुरू करीत आहे. सुरुवातीचा चंद्र व राहूच्या अनिष्टतेमुळे काही किरकोळ अशुभ योगांचे प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः आरोग्याच्या संबंधात हा सप्ताह काळजी घ्यावयास लावणारा ठरू शकतो. कुटुंबात सामंजस्य व सहकार्याचे वातावरण ठेवावे लागेल. काही मंडळींना जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. योजनांना विलंबाने यश मिळेल. संयम बाळगावा लागेल. आर्थिक आघाडीवर जैसे ते स्थिती राहील. आठवडाअखेर मित्रवर्गाकडून सहकार्य मिळावे. एखाद्या मंगलकारक कार्यक्रमात सहभाग घ्यावा.
शुभ दिनांक - ५, ८, ९, १०.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, ८६००१०५७४६