सहकार भारतीच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे सहकार क्षेत्र बळकट करू

-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांचे प्रतिपादन

    दिनांक :06-Jan-2025
Total Views |
नागपूर,
Dr. Pankaj Bhoyar-Nagpur : महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र आता आपल्याला बळकट करायचे आहे, या क्षेत्रात आता उत्तुंग भरारी घेण्याची वेळ आली आहे. या क्षेत्रात अनेक समस्या देखील आहेत. सर्व समस्यांचे निराकरण करून सहकार भारतीच्या मार्गदर्शनात राज्याचे सहकार क्षेत्र बळकट करू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. सहकार भारती नागपूर महानगर व जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री विवेक जुगादे, प्रदेश उपाध्यक्ष सौ नीलिमाताई बावणे, सहकार भारती नागपूर महानगराचे अध्यक्ष घनश्याम कुकरेजा, नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष नंदू कन्हेर प्रामुख्याने उपस्थित होते.

bhoyar
 
आपल्या जोशपूर्ण भाषणात राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सहकाराच्या विविध क्षेत्रावर प्रकाश टाकला. संपूर्ण देशामध्ये सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान अव्वल आहे आणि त्यामुळे हे क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची आहे. या कार्यासाठी महाराष्ट्र शासन आपल्या सोबत आहे. Dr. Pankaj Bhoyar-Nagpur ज्या ज्या चांगल्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी करून घेण्याची क्षमता या सरकारमध्ये आहे आणि हे सर्व साध्य करताना आम्हाला सहकार भारतीचे मार्गदर्शन लागेल. तसेच या क्षेत्रात आता यापुढे सहकार भारती म्हणेल तेच होईल, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकातून सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या कार्याचा गौरव केला. बऱ्याच वर्षांनंतर विदर्भाला सहकार मंत्री पद मिळाले आहे. विदर्भाला सहकाराची उज्वल परंपरा लाभली आहे. मात्र अलीकडच्या काळात सहकार क्षेत्रात विदर्भाला हवी तशी चालना मिळू शकली नाही. मात्र आता पंकज भोयर यांच्या नेतृत्वात या क्षेत्राला नवी दिशा व ओळख मिळेल, असा विश्वास विवेक जुगादे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार भारतीचे कार्य जोमाने सुरू आहे. Dr. Pankaj Bhoyar-Nagpur सहकार भारती व सरकार यांच्या समन्वयातून आपण या क्षेत्राला नवी संजीवनी देऊ शकतो. यासाठी सहकार भारती सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन विवेक जुगादे यांनी मंत्री महोदयांना दिले.
कार्यक्रमाचे संचालन सहकार भारती नागपूर महानगराचे संघटन प्रमुख राहुल कोडमलवार यांनी केले. कार्यक्रमाला सहकार भारतीचे पदाधिकारी विनोद भिमनवार, नाना महल्ले, अंजली मुळे, नागपूर विभाग प्रमुख संजय कुमार रोकडे, नागपूर जिल्हा महामंत्री चंद्रशेखर लांडे, शहर महामंत्री किरण रोकडे, जिल्हा संघटन प्रमुख विनय राजे, झामेश्वर काकडे, शहर संघटन प्रमुख विश्वनाथ कुंभलकर, महिला प्रमुख संगीता ठाकरे, कविता खापरे, नागपूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे यासह सहकार भारतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: अंजली मुळे, संपर्क मित्र