मंगरूळनाथ,
Radha Jadhav : तीर्थक्षेत्र शेगाव येथे ३ ते ५ जानेवारीला संपन्न झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत तालुक्यातील जोगलदरी येथील ग्रामीण भागातील अतिशय गरीब कुटुंबातील व शिक्षणाचे वातावरण नसलेल्या परिस्थितीला तोंड देत राधा ज्ञानेश्वर जाधव या वर्ग अकरावी मध्ये शिकणार्या मुलीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ब्रांझ मेडल मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.
राधा ज्ञानेश्वर जाधव हिचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा जोगलदरी येथे झाले आहे तर उच्च प्राथमिक शिक्षणासाठी तिने संतोष राठोड आणि मुख्याध्यापक किशोर खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली न. प. उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. दोन येथे वर्ग सहा ते आठ चे शिक्षण पूर्ण केले. इयत्ता नववी मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी तिने मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळा आणि ज्युनिअर कॉलेज येथे प्रवेशीत आहे.
खेळाप्रती असणारी राधाची आवड आणि परिस्थितीची असणारी जाण, चिकाटी जिद्द व मेहनत करण्याच्या बळावर राधाने वर्ग दहावी मध्ये आपल्या संघाला राज्यस्तरावर विजय प्राप्त करून दिले. वर्ग ११ वी साठी राधाची निवड राष्ट्रीय संघात झाली आणि ३ ते ५ जानेवारी रोजी शेगाव जि. बुलढाणा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत एकूण २२ राज्यांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रशिक्षक सागर गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्या सुनीता पवार, निरंजन राठोड, रवी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघाचे कर्णधार शिंदे धाराशिव यांच्या नेतृत्वाखाली पाच जानेवारीला झालेल्या अंतिम सामन्यात केरळ सोबत पराभव पत्करून महाराष्ट्र संघाला ब्रॉन्झ मेडल मिळाले. यामध्ये राधा जाधव ने मोलाची कामगिरी केली होती.
तिच्या यशाबद्दल पंचक्रोशी मध्ये कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. राधाला आपल्या कुटुंबासाठी चांगले नाव लौकीक मिळवणे आणि शासकीय रोजगाराची संधी मिळाल्यास आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे राधाने बोलून दाखवले. तिच्या यशामध्ये संपूर्ण जाधव कुटुंब यांनी केलेली मेहनत, त्याग, समर्पण आणि वेळोवेळी मिळालेले योग्य मार्गदर्शन दिसून येते.