- दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या किचन गार्डन प्रकल्पाचा उपक्रम
यवतमाळ,
Paras bag project : एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदय संकल्पना यवतमाळात प्रत्यक्षात आणणार्या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानतर्फे पारधी व शेतकरी विकास प्रकल्प असून त्याअंतर्गत किचनगार्डन प्रकल्प राबविण्यात येतो. यात परसबागेतील भाजी केंद्रावर विक्री केली जाते. ग्रामीण महिलांनी फुलवलेल्या सेंद्रिय परसबागेतील भाजी घ्यायला ग्राहकांनी झुंबड केली होती. एशिया एनिशिएटिव्ह व जे. सी. फ्लॉवर या संस्थांच्या सहकार्याने चालणार्या या प्रकल्पात यवतमाळ जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील १९३ गावांमध्ये ५ हजार ग्रामीण महिला सहभागी झाल्या आहेत. संस्थेच्या २५ फिल्ड वर्कर्सनी सीड किट देऊन सेंद्रिय निविष्ठा तयार करावयाचे प्रशिक्षण दिले आहे. या माध्यमातून मिळालेल्या प्रशिक्षणाद्वारे जिल्ह्यातील ५ हजार महिलांनी आपापल्या अंगणात सेंद्रिय परसबाग फुलविली आहे.
Paras bag project : परसबाग प्रकल्पातील सेंद्रिय भाजीला प्रचंड मागणी आहे. येथील भाजीची विक्री महिला आपापल्या स्थानावरच करतात. त्यापैकी ५० महिलांना भाजीविक्री केंद्र सुरू करण्यासाठी साहित्याची मदत संस्थेने केली. १२० महिलांना अन्नप्रक्रिया प्रशिक्षण दिले आहे. ८० महिलांना मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले. गेल्या १५ ऑगस्टला रानभाजी महोत्सवात महिलांनी १६ स्टॉल्स लावले होते. ग्रामीण महिलांमधील जीवनसत्वाची कमतरता लक्षात घेत प्रकल्प राबवला जात असून आपल्या परसबागेतील भाजी स्वतः वापरावी व उरलेली भाजी विक्री करावी. या माध्यमातून अनेक महिला ६० ते ७० हजार रुपयांची भाजी विक्री करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मंगळवार, ७ जानेवारीला ज्येष्ठ नागरिक भवनात जिल्ह्यातील महिलांनी परसबागेतील सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी आणला. पालक, सांबार, मेथी, आंबटचुका, मुळा, वांगे, टमाटे, मिरची, शेवगा, वालाच्या शेंगा, शेपू, सुरकंद, काशीकोवळे अशा विविध सेंद्रिय भाज्या दिसताच महिला ग्राहकांनी करून खरेदी केली.