वर्धा,
Farewell to Adishakti : गेले ८ दिवस वर्धेत भती, आनंद आणि उत्साहाची मैफल होती. सारे शहर विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. शेवटच्या चार दिवसात पावसाने उसंत देताच देवीच्या दर्शनासाठी आलेल्यांमुळे रस्त्यावर पाय ठेवणे कठीण झाले होते. लंगरचे स्टॉल लागले होते. अष्टमीला शहरातील प्रत्येक दुर्गा माता मंडळात होमहवन करण्यात आले. आज बुधवारी सकाळपासुनच देवीच्या निरोपाची तयारी सुरू झाली. सायंकाळी ४ नंतर शहरात ढोल ताशांचा आवाज निनादू लागला. ओठांवर जयघोष आणि डोळ्यात अश्रू साठवत दुर्गा विसर्जनाने वर्धा भावविभोर झाले होते.

गणपती विसर्जन होत नाही तोच वर्धेत दुर्गोत्सवाची तयारी होते. सारे शहर नवरात्रात न्हाऊन निघाले. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. सकाळ-सायंकाळी आरत्या, पूजाअर्चा आणि देवीच्या चरणी अर्पण झालेल्या भक्तिभावाचा शेवट आज देवीच्या विसर्जनाने झाला. यावर्षी दुर्गा स्थापनेचा दिवस सोडला तर नवरात्रात जवळपास ६ दिवस जिल्ह्यात पावसाने कहर केला. सायंकाळी येणार्या हमखास पावसाने दर्शनाला येणार्यांचा हिरमोड होत होता. परंतु, काही वेळातच रस्त्यावर गर्दी दिसत होती आणि लंगरचे स्टॉलही लागत होते. देवी भतांचा उत्साह पावसावर मात करून जात होता.
आज सकाळपासुन शहरातील रस्त्यावर ट्रक सजवण्याला सुरुवात झाली. सायंकाळी ४ वाजतानंतर ढोल ताशांचा आवाज निनादू लागला. सुर्य मावळतीला जात असताना शहरातून एका मागे एक दुर्गा विसर्जनाच्या शोभायात्रांना सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुर्गादेवी मंडळांचे स्वागत करण्यात आले. निर्मल बेकरी चौक ते शिवाजी चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लंगरचे स्टॉल लावण्यात आले होते. उदो उदो चा गजर, ढोल ताशांचा निनाद आणि डिजेच्या कर्नकर्कश आवाजात, रंगीबेरंगी लेझर लाईटने रस्ते उजळून निघाले होते. आज देवी दुर्गेचे विसर्जन अतिशय जल्लोष व भावनांनी ओथंबलेल्या वातावरणात पार पडले. नऊ दिवस देवीच्या दर्शनाने तृप्त झालेल्या भाविकांनी मॉ शेरावाली की...च्या गजरात निरोप घेतला. विसर्जन मिरवणुकीत महिला, तरुणाई व लहान मुलेही सहभागी झाली होती.
रात्री १२ वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक शिवाजी चौकापर्यंत पोहोचल्यानंतर ढोल ताशे आणि नाचणे थांबले. पवनार येथील नदीत देवीचे विसर्जन करण्यात आले. दहा दिवस चाललेली भती, आनंद आणि उत्साहाची मैफल आज संपली खरी, पण देवीप्रतीचा उत्कट भाव अंत:करणात अधिक दृढ झाला. हा क्षण वर्धेकरांसाठी केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐयाचे महापर्व ठरले. पोलिसांचा चोखबंदोबस्त होता.