अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

01 Oct 2025 10:54:13
तुळजापूर,
Farmer's suicide धाराशिव तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एका शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीतून निर्माण झालेल्या आर्थिक ताणामुळे जीवन संपवले, अशी हृदयद्रावक घटना घडली आहे. उमेश सूर्यकांत ढेपे (वय ४५) यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गावभर शोककळा पसरली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत घटनास्थळी पोहोचून नोंद घेतली. शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलण्याच्या अगोदरच्या दिवशी आपल्या भावाला भेटून मनातील खदखद व्यक्त केली होती.
 
 
Farmer
 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, उमेश ढेपे यांना एका खासगी व्यक्तीकडे कर्ज फेडायचे होते. त्यांनी विहिरीसाठी आणि पाईपलाईनसाठी कर्ज घेतले होते, जे आता परतफेडीच्या दबावामुळे त्यांना मानसिक तणावात टाकणारे ठरले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे उमेश यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. Farmer's suicide हाताशी आलेला आहारही टिकवता न आल्याने ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक चिंतेत होते. या नैराश्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नळदुर्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
उमेश ढेपे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुला-बाळांचे भवितव्य आता अंधारात सापडले आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Powered By Sangraha 9.0