गडचिरोली,
Maoist arrest भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करीत असल्लया सुरक्षा दलांविरुद्धच्या हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका माओवाद्यास मंगळवारी, 30 सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलिस दल व सिआरपीएफने अटक केली आहे.
29 सप्टेंबर रोजी सोमवारी भामरागड परिसरामध्ये भामरागड पोलिस पथक, सिआरपीएफ 37 बटालियन एफ कंपनीचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान, भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने सदर माओवादी सुरक्षा दलातील जवानांची रेकी करीत असल्याची गोपनिय माहिती प्राणहिता येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मिळाली. या आधारे भामरागड पोलिस ठाणे व सिआरपीएफच्या जवानांनी सिताफीने ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, तो उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने अधिक सखोल चौकशीसाठी पोलिस उप-मुख्यालय प्राणहिता येथे आणले. चौकशीअंती सदर इसम हा कट्टर नक्षल समर्थक सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी (38) रा. पोयारकोठी, ता. भामरागड येथील असल्याचे उघड झाले. सदर इसमाचा पोलिसांच्या अभिलेखावरील विध्वंसक कारावाया व गुन्ह्यांमध्ये सक्रीय सहभाग असल्याची शक्यता आहे. सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी याचा 27 ऑगस्ट रोजी कोठी पोलिस स्टेशन हद्दीतील कोपर्शी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सक्रीय सहभाग होता. या अनुषंगाने कोठी पोलिसांत दाखल अप क्र. 02/2025 अन्वये 30 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते हे करीत आहेत.
सदरची कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक संदिप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (सिआरपीएफ) अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सिआरपीएफ 37 बटालियनचे कमांडंट दाओ इंजिरकान कींडो, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी,, पोलिस उप-अधीक्षक विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे भामरागड, इंट सेल प्राणहिता व सिआरपीएफचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली.
यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, पुन्हा एकदा माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.