तभा वृत्तसेवा यवतमाळ,
government hospital येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नुकत्याच दोन अत्यंत जटिल शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या असून यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.येथील 28 वर्षीय हरीश रायफळे या रुग्णावर ‘लेफ्ट हेप्टिक लोबेक्टॉमी’ ही अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीचा त्रास होता. तपासणीत त्याच्या यकृतामध्ये कुत्र्याच्या किंवा शेळ्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे होणाèया ‘हायब्रिड सिस्ट’ नावाच्या दुर्मिळ आजाराच्या दोन मोठ्या गाठी असल्याचे निदान झाले.
त्यामुळे रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्साशास्त्र विभागात दाखल करण्यात आले. संपूर्ण तपासण्या करून सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल देशपांडे यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान यकृताचा डावा भाग संपूर्ण गाठीने व्यापल्या गेल्यामुळे रुग्णाचे यकृत नियमित काम करत नव्हते असे निदर्शनास आले.
तसे रुग्णाच्या नातेवाईकांशी बोलून तो भाग काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विभागातील अत्याधुनिक अशी ऑर्गन कौटरी वापरून डॉ. अमोल देशपांडे व त्यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.दरम्यान, सुनीता राठोड या महिला रुग्णाला डाव्या बाजूच्या कमरेत तीव्र वेदना होत असल्यामुळे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तपासणीसाठी करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये तिच्या डाव्या मूत्रपिंडामध्ये कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर तिच्यावर दुर्बिणीद्वारे कमी टाक्याची अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण दुसèयाच दिवसापासून चालू-फिरू लागली असून रुग्णाची प्रकृती सुधारत आहे.
या दोन्ही शस्त्रक्रियांत विभागातील डॉ. स्वप्निल मदनकर, डॉ. वल्लभ जाने, डॉ. अभिषेक, डॉ. शिवराज, डॉ. पूजा, डॉ. जेबॅस्टिन, डॉ. शुभम, डॉ. ऋतुजा, डॉ. अथर्व, डॉ. आदित्य, डॉ. देवश्री तसेच बधिरीकरणशास्त्र विभागातील डॉ. नंदनवनकर, डॉ. बोडके, डॉ. अंबारे व डॉ. धकाते, डॉ. शेंडे, डॉ. पवार, डॉ. दातार यांनी सक्रिय योगदान दिले. तसेच ओटी परिचारिका दयालवाल व यांचे सहकार्य लाभले.
या शस्त्रक्रियांनंतर दोन्ही रुग्ण ठणठणीत असून सरकारी रुग्णालयातील डॉक्टर म्हणजे आमच्यासाठी देवदूत आहेत, अशी भावना रुग्ण अणि त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. या दोन्ही मोठ्या शस्त्रक्रियांच्या यशामध्ये विभागप्रमुख डॉ. विजय पोटे व अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात अशा उच्चस्तरीय व जटिल शस्त्रक्रिया होत असून गोरगरीब रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आता जिल्हा व ग्रामीण भागातील रुग्णालयांत उपलब्ध असून, गरीब व गरजू रुग्णांसाठी हा एक मोठा दिलासा ठरत आहे.