कारंजा (घा.),
mutton-market-migration : शहरातील मटन मार्केट हे राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर बसस्थानकाच्या अगदी जवळ असल्यामुळे प्रवासी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पादचार्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पृष्ठभूमीवर प्रभाग १६ मधील नागरिकांनी नपं मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन एक महिन्याच्या आत मटन मार्केट स्थलांतर करावे, चार दिवसात मोकाट पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. समस्या न सुटल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी स्थानिक विश्रामगृहात आ. दादाराव केचे व मांस विक्रेते यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्याधिकारी, नपंचे स्विकृत सदस्य नितीन दर्यापूरकर, नगरसेवक राजेश लाडके, सामाजिक कार्यकर्ते सुनील वंजारी, संदीप टिपले, सुरेश अग्रवाल व प्रभाग १६ मधील नागरिक उपास्थित होते.
या बैठकीत मुख्याधिकारी यांनी मटन मार्केटसाठी हायवेकडील व चक्रीघाटाजवळ जागा उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. मात्र, या दोन्ही जागेवर मांस विक्रेत्यांनी तिथे व्यवसाय होणार नाही, असे सांगून नाराजी व्यत केली. यापूर्वी मांस विक्रेत्यांना कचरा डेपोजवळ जागा देण्याचे ठरले होते. परंतु, कचरा डेपो नियोजित ठिकाणी स्थलांतरित करायला अजूनही तीन-चार महिने लागणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे मांस विक्रेत्यांना लवकरात लवकर जागा खाली करून नवीन जागेत स्थलांतरित व्हावे, तेथे तुम्हाला लाईट व पाण्याची व्यवस्था करून देणार असल्याचे मुख्याधिकार्यांनी सांगितले.
या संदर्भात नितीन दर्यापूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मुख्याधिकार्यांशी चर्चा झाली असून येत्या ८ तारखेपर्यंत मटन मार्केट स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सांगितले. हे स्थलांतर पूर्ण झाल्यानंतर मोकाट श्वानांचा प्रश्न व नागरिकांना होणारा त्रास निकाली निघेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.