मोदी : एक व्यावसायिक कर्मयोगी

01 Oct 2025 05:30:00
pm narendra modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्रमुग्ध करणारे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या संघटनात्मक नेतृत्वकौशल्याबद्दल अनेकांनी भरभरून स्तुती केलेली आहे. मात्र त्यांच्या कामातील कठोर व्यावसायिक शिस्तीबद्दल कुणाला फारशी माहिती नाही किंवा लोकांना ती फारशी समजली नाही. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून गेल्या सुमारे अडीच दशकांच्या आपल्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी स्वत:साठी व्यावसायिक शिस्तबद्धतेच्या मूल्यांची प्रचीती देणारी कार्यशैली घडवली आहे. कल्पनांची भव्य दृष्यात्मक मांडणी करण्याच्या कौशल्यापलीकडेही, त्यांच्या संकल्पाला चिरस्थाही व्यवस्थेच्या स्वरूपात परावर्तित करणारी कामातील शिस्त हेच त्यांच्यातले वेगळेपण आहे. भारतीय परिभाषेत सांगायचे तर, ते एक कर्मयोगी आहेत. ते प्रत्यक्ष केलेल्या कामांतून घडून आलेल्या बदलांच्या आधारे मूल्यमापन केल्या जाणाऱ्या कर्तव्यनिष्ठ कृतीचे पाईक आहेत.
 
 

मोदी  
 
 
महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या याच कार्यशैलीतूनच त्यांनी यावर्षी लाल किल्ल्यावरून केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची रचना झाली. आपल्या या भाषणातून त्यांनी केवळ यशांची यादी मांडली नाही, तर त्याउलट सहभागाच्या आधारे करायच्या कामांचीच सनद मांडली होती. या भाषणातून त्यांनी विकसित भारताची गाथा रचण्यात स्वत:चे योगदान देण्यासाठी नागरिक, शास्त्रज्ञ, स्टार्टअप्स आणि राज्यांना आमंत्रित केले होते. डीप टेक्नोलॉजी, स्वच्छ अर्थात कार्बनमुक्त प्रगती आणि लवचीक पुरवठा साखळीतील महत्त्वाकांक्षा त्यांनी फक्त पोकळ शब्दांत मांडल्या नाहीत. तर या सगळ्याला जन भागीदारी, तसेच व्यासपीठ निर्मितीत योगदान देणाऱ्या राज्यांसोबत आणि उद्योजकांसोबत भागीदारी करत प्रत्यक्षात साकारण्याच्या कार्यपद्धतीचा आधार देत, त्यांनी या महत्त्वाकांक्षांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी, त्याला कृती कार्यक्रमांचा आकार येईल अशी मांडणी केली.
वस्तू आणि सेवा कर रचनेचे अलिकडेच झालेले सुलभीकरण हे त्यांच्या याच कार्यपद्धतीचे प्रतिबिंब आहे. करांचे स्तर कमी करून आणि अडथळे निर्माण होतील अशा तरतुदी काढून टाकत, वस्तू आणि सेवा कर परिषदेने आता लहान उद्योगांकरिता अनुपालनाच्या खर्चात मोठी कपात केली आहे. त्याचप्रमाणे या कपातीचा हा लाभ थेट घराघरांपर्यंत पोहचावा यासाठी प्रक्रियेची गतीही वाढवली आहे. खरे तर पंतप्रधानांचा भर हा महसुलाच्या चढ-उतार करणाऱ्या आलेखांवर नाही, तर त्यापेक्षाही जास्त तर सामान्य नागरिकांसह, छोट्या व्यापाèयांना या बदलांमधून मिळणाऱ्या लाभांचा लवकरात लवकर अनुभव घेता यावा याला त्यांच्या लेखी सर्वाधिक महत्त्व आहे. त्यांच्या या आत्मभानातून सहकाराच्या तत्त्वावर आधारलेल्या संघराज्यवादाची प्रचीती येते. त्यांचे हेच तत्त्व वस्तू आणि सेवा कर परिषदेसाठीही मार्गदर्शक ठरले. खरे तर राज्ये आणि केंद्र सरकारांमध्ये वादविवाद होत आले आहेत, पण हे सर्व जण स्थितप्रज्ञ राहण्याऐवजी या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या एका प्रभावी व्यवस्थेत काम करत असल्याचे आपल्याला समजून घ्यावे लागेल.
आपल्या कार्यशैलीतील याच व्यावसायिक तत्त्वांमुळेच तर ते रात्री उशिरा अमेरिकेतून 15 तासांचा आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्यानंतर, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ते थेट निर्माणाधीन असलेल्या नवीन संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले होते. अलिकडेच मी पंतप्रधानांची पंधरा मिनिटांची भेटीची वेळ मागितली होती. या भेटीत त्यांनी आमच्या चर्चेत झालेल्या विषयावर परस्परांशी जोडलेल्या आणि बहुआयामी मुद्यांवर अत्यंत तपशीलवार पण तरीही एकसूत्री वाटणारी मांडणी केली. त्यांच्या या मांडणीने माझ्यावर विलक्षण प्रभाव टाकला आणि आमची केवळ पंधरा मिनिटांची भेट तब्बल पंचेचाळीस मिनिटे चालली. मात्र या भेटीनंतर माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी पंतप्रधानांनी त्यांच्याकडे असलेल्या नोंदी, माहिती आणि वाद-युक्तिवाद वाचून दोन तासांहून अधिक वेळ तयारी केली होती. खरे तर त्यांची तयारीची ही पद्धत काही अपवाद नाही, तर तो त्यांनी स्वत:साठी आखलेला आणि व्यवस्थेकडूनही अपेक्षा केलेला कामांसाठीचा नियम आहे. भारताने अलिकडच्या काळात साधलेली बहुतांश प्रगती ही पायाभूत सुविधा आणि व्यवस्थेवर आधारलेली आहे आणि या व्यवस्थेची रचना ही आपल्या नागरिकांना सन्मान मिळेल या अनुषंगानेच केली गेली आहे. डिजिटल ओळख, सार्वत्रिक बँक खाती आणि प्रत्यक्ष वास्तविक वेळेत देयके अदा करण्याच्या त्रिसूत्रीने सर्वसमावेशनाचे पायाभूत सुविधेत रूपांतर केले असल्याचेही आपल्याला समजून घ्यावे लागेल. त्यामुळेच तर आज लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचतात. या रचनेमुळे त्यातील गळतीचे प्रमाणच कमी होते, छोट्या व्यवसायांना देखील अंदाज बांधता येईल अशा रीतीने उलाढालीसाठीच्या रोख पतपुरवठ्याची सुविधा मिळते आणि धोरणांना हवेतील गोष्टींचा नाही तर प्रत्यक्ष माहितीसाठ्याचा आधार असतो. यामुळेच तर अंत्योदय - अखेरच्या स्थानावरच्या नागरिकाचा उदय - ही केवळ घोषणा न राहता एक मापदंड बनू शकली आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान कार्यालयात येणाèया प्रत्येक योजनेची, कार्यक्रमाची आणि फाईलची खरी अग्निपरीक्षाही याच निकषावर होत आली आहे.
आसाममधील नुमालीगढ येथे, भारताच्या पहिल्या बांबू आधारित 2 जी इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटनादरम्यान मला याचा पुन्हा एकदा अनुभव घेण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी पंतप्रधान अभियंते, शेतकरी आणि तांत्रिक तज्ज्ञांसोबत उभे राहून, शेतकèयांचे पेमेंट त्याच दिवशी कसे जमा होईल, जनुकीय अभियांत्रिकीच्या उपयोगाने जलद वाढ होणारे आणि नोड्समधील बांबूच्या खोडाची लांबी वाढवू शकेल, अशी बांबूची जात तयार करता येऊ शकते का, अत्यावश्यक एन्झाईम्स स्वदेशी पद्धतीने बनवता येतील का, देठ, पान, अवशेष अशा बांबूच्या प्रत्येक घटकाचा इथेनॉलपासून फरफ्युरल आणि हिरव्या अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडपर्यंत आर्थिक उपयोग केला जात आहे का? अशा थेट मुद्यांवर बोलत होते. त्यांची ही चर्चा केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित नव्हती, तर त्या चर्चा रसद, पुरवठा साखळीची लवचीकता आणि जागतिक कार्बन फूटप्रिंटपर्यंतच्या मुद्यांनी व्यापलेली होती. आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये भाग घेतलेला माणूस म्हणून, मला या पद्धतीचा त्वरित अंदाज बांधता आला. माहितीची स्पष्टता, तपशिलातील अचूकता आणि साखळीतील अंतिम व्यक्ती ही पहिली लाभार्थी असावी यावर त्यांचा भर होता.
त्यांच्या याच कार्यपद्धतीने भारताच्या आर्थिक धोरणांमध्येही स्पष्टता आणली आहे. या अनुषंगाने बोलायचे तर ऊर्जा क्षेत्रात वैविध्यपूर्ण पुरवठादारांचे भांडार आणि संयमाने पण ठाम निर्धाराने केलेल्या खरेदीमुळे अस्थिर काळातही आपले हितसंबंध सुरक्षित राहिले आहेत. यापासूनच प्रेरणा घेत परदेशात असंख्य वेळा मी देखील साधे सोपे धोरण अंगीकारले, ते म्हणजे पुरवठा सुरक्षित करणे, परवडणारी क्षमता कायम ठेवणे आणि भारतीय ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवणे. आणि नेहमीच या स्पष्टतेचा आदर केला गेला. परिणामी असंख्य वाटाघाटी अधिक सुरळीतपणे पुढे सरकल्या.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यालाही कोणतेही नाट्यमय वळण न देता हाताळले आहे. ठामपणा हा कधीही गोंगाटापेक्षा श्रेष्ठच असतो. यावरच त्यांनी कायम भर दिला आहे. उद्देशातली स्पष्टता, सैन्याला कार्यात्मक स्वातंत्र्य, निर्दोष लोकांचे संरक्षण, दृढनिश्चय आणि संयम या तत्त्वांच्या आधारेच याबाबतीतली कामे पूर्ण करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे.
त्यांच्या या निवडींमागेही एक विशिष्ट कार्यशैली आहे. त्यांच्या चर्चा या कायमच सभ्यतेच्या मर्यादा पाळणाऱ्या पण त्याचवेळी निर्भीडही असतात. ते कायमच आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या मतांचा आदर करतात, पण कधीच भरकटत नाहीत. सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर, ते एखाद्या जाडजूड माहितीपुस्तिकेतून आवश्यक तेवढेच पर्याय निवडल्यासारखे प्रतिसाद देतात. जबाबदारी नेमून देतात आणि यशाच्या मूल्यमापनाचे निकषही मांडतात. उगागच मोठ्या आवाजात मुद्दे मांडत नाहीत, तर त्यांचा युक्तिवादच सर्वोत्तम असतो, पूर्व तयारीचे फळ मिळते, अविरत पाठपुरावा करतात. खरे तर त्यांच्या सहकाऱ्यांसाठी, हे सर्व म्हणजे पूर्वतयारी विषयीचे शिक्षणच आहे आणि व्यवस्थेसाठी ही एक पूर्ततेला गृहीत न धरता तिचे मूल्यमापन करणारी कार्यसंस्कृती आहे.
यामुळेच तर पंतप्रधानांचा वाढदिवस हा विश्वकर्मा जयंतीला, म्हणजेच दैवी वास्तुविशारदाच्या दिवशीच येणे, हा काही मला योगायोग वाटत नाही. इथे आपण हे समजून घेतले पाहिजे, हे साम्य केवळ शाब्दिक अर्थाला अनुसरून नाही, तर ते मार्गदर्शक या अर्थाने देखील साम्य आहे. सार्वजनिक जीवनातील सर्वांत चिरस्थायी स्मारके असलेल्या संस्थांचे, व्यासपीठांचे आणि स्थापित झालेल्या नव्या मापदंडांचे ते मार्गदर्शक आहे.pm narendra modi एखाद्याची चांगली कामगिरी काय, हे जर का नागरिकांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांना त्यांचे लाभ वेळेवर मिळाले, किमती वाजवी राहिल्या; उद्योगांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर धोरणांमध्ये स्पष्टता असली आणि विस्ताराचा विश्वासार्ह मार्ग मिळाला आणि राज्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तणावाच्या परिस्थितीतही टिकून राहणारी आणि वाटचालीगणिक सुधारत जाणारी व्यवस्था असेल, तर ती सर्वोत्तम कामगिरी आहे. याच निकषांच्या आधारावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले पाहिजे, तर आपल्याला लक्षात येईल की ते एक कर्मयोगी आहेत, ज्यांची कामगिरी म्हणजे देखावा नसून, भारताच्या वाटचालीच्या कथेचा नवा अध्याय घडवणारी सेवा आहे.
(लेखक हे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत.)
Powered By Sangraha 9.0