मुंबई,
Rakhi Sawant मुंबई बॉलिवूडची वादग्रस्त आणि नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. बराच काळ दुबईत वास्तव्य करत असलेली राखी नुकतीच भारतात परतली असून, भारतात आल्यानंतर तिने पहिल्यांदाच मंगळवारी एका रिअॅलिटी शोच्या सेटवर हजेरी लावली. 'पति पत्नी और पंगा' या कार्यक्रमाच्या सेटवर ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गोर आणि तिचा जोडीदार मिलिंद चंदवानी यांच्या विवाह सोहळ्याचा हिस्सा होण्यासाठी राखी पोहोचली होती.
राखी सावंतचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
राखी सावंतच्या Rakhi Sawant या नव्या अवताराने उपस्थित सर्वांनाच थक्क केलं. यावेळी तिने काळ्या रंगाची शिमरी साडी परिधान केली होती. त्यावर भव्य नेकलेस, मोठे झुमके आणि मांगटिकाही तिने घातली होती. तिच्या केसांचा वेगळाच भारी कर्ली लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या नव्या लूकमध्ये राखी अत्यंत सडपातळ आणि आकर्षक दिसत होती. तिचं हे ट्रान्सफॉर्मेशन सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.पॅपराझींना अनेक कॅंडिड पोझ देत, ठुमकेही लावत राखीने कार्यक्रमात रंगत आणली. तिचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या नेहमीच्या फनी अंदाजात राखीने पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा एक अजब विधान करून सर्वांना चकित केलं. ती म्हणाली, “माझ्या आईने मला एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात तिने सांगितलं की, तुझे खरे वडील डोनाल्ड ट्रम्प आहेत.” तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी हसून प्रतिक्रिया दिली.
दुबईत मिळालं ‘गोल्डन वीजा’
राखी सावंत सध्या दुबईत वास्तव्यास असून तिला तेथील ‘गोल्डन वीजा’ मिळाल्याचं तिने सांगितलं. “मी खूप दिवसांनंतर भारतात आले आहे. इथे यायला नेहमीच चांगलं वाटतं. माझ्यावर जी प्रेम आणि इज्जत भारतात मिळते, ती कुठेच मिळत नाही. पण मी आता दुबईची नागरिक झाले आहे आणि तिथे मला खूप आनंद आहे,” असंही तिने नमूद केलं.राखी सावंतने यापूर्वी ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोजमध्ये आपल्या उपस्थितीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. “आज मी जी काही आहे, त्यात या चॅनलचाही मोठा वाटा आहे,” असं म्हणत तिने आपल्या करिअरमध्ये मिळालेल्या संधींबाबत कृतज्ञता व्यक्त केली.राखीचा हा ग्लॅमरस परतावा आणि तिच्या वक्तव्यांनी पुन्हा एकदा ती चर्चेच्या झोतात आली आहे, हे मात्र नक्की.