नवी दिल्ली
RSS centenary coin release राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने जारी केलेल्या शंभर रुपयांच्या विशेष नाण्याचे आणि एक विशेष टपाल तिकिटाचे भव्य समारंभात अनावरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. या नाण्याचे संपूर्ण उत्पादन कोलकाता येथील भारत सरकारच्या अलीपूर टकसालात करण्यात आले आहे.
या विशेष नाण्यावर भारतमातेची प्रतिमा कोरलेली असून, हे देशाच्या चलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. नाण्याच्या एका बाजूस भारत सरकारची अधिकृत राजमुद्रा असून, दुसऱ्या बाजूस सिंहासमवेत वरदमुद्रेत उभी असलेली भारतमातेची प्रतिमा कोरली गेली आहे. नाण्यावर “राष्ट्राय स्वाहा, इदम राष्ट्राय, इदम न मम” हा संदेशही कोरलेला असून, त्याचा अर्थ “सर्वकाही राष्ट्राला समर्पित आहे, सर्व काही राष्ट्राचे आहे, माझे काहीही नाही” असा आहे. हे नाणे उच्च प्रतीच्या धातूंनी बनवले असून, केवळ चलन म्हणूनच नव्हे, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्य असलेले एक महत्त्वाचे दस्तऐवज ठरणार आहे.
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा आढावा घेताना, “संघाची स्थापना ही विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर झाली होती आणि आज शताब्दी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला हे ऐतिहासिक नाणे आणि टपाल तिकिट राष्ट्राला अर्पण करण्यात येत आहे, ही एक अत्यंत अर्थपूर्ण गोष्ट आहे,” असे नमूद केले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “संघाने राष्ट्रप्रथम ही विचारसरणी अंगिकारून कार्य केले असून, ब्रिटिश राजवट आणि निजामांच्या कारकिर्दीतही अनेकदा त्रास सहन करूनही संघाच्या स्वयंसेवकांनी देशासाठी योगदान दिले आहे.” त्यांनी डॉ. के. बी. हेडगेवार यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाचीही आठवण करून दिली.या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी देशवासीयांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या, विशेषतः महानवमीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, देवी सिद्धिदात्रीच्या पूजनाच्या या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय योगदानाचा हा सन्मान अधिकच अर्थपूर्ण वाटतो.
कुठे तयार झाले नाणे
कोलकाता टकसाल, जिथे हे नाणे तयार करण्यात आले आहे, तिची स्थापना १७५७ साली झाली असून, सध्या ती भारत प्रतिभूति मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड (SPMCIL)च्या अखत्यारीत कार्यरत आहे. १९५२ मध्ये तत्कालीन वित्तमंत्री सी. डी. देशमुख यांच्या हस्ते अलीपूर येथील या टकसालाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. येथे केवळ नाण्यांचेच नव्हे, तर भारतरत्न, पद्म पुरस्कार, परमवीर चक्र, अशोक चक्र यांसारख्या अनेक पदकांचे उत्पादनही केले जाते.शंभर रुपयांचे हे विशेष नाणे संघाच्या शताब्दीनिमित्त देशासाठी एक ऐतिहासिक आठवण ठरणार असून, याच्या माध्यमातून केंद्र सरकारने प्रथमच अधिकृत स्तरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानाला मान्यता दिली आहे. त्यामुळे हे नाणे केवळ आर्थिक व्यवहारात वापरले जाणारे माध्यम न राहता, राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणून स्मरणात राहणार आहे.