मानोरा,
Samata Ganesh Mandal, तालुक्यातील कारखेडा या गावातील गणेश मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाचे भान जोपासले गेले आणि सार्वजनिक शांततेला प्राधान्य दिल्या गेल्याचे अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने तालुक्यातून गुणानुक्रमे आलेल्या दहा गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांचे मानोरा पोलिस स्टेशन प्रशासना द्वारा वरिष्ठांच्या मार्गदर्शनात प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कारखेडा ह्या गावामध्ये तांड्यातील बंजारा समाज बांधव तथा गावातील धनगर समाज बांधवांच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्याची मागील अनेक वर्षांपासूनची परंपरा यावर्षी सुद्धा मोठ्या चैतन्यमय व उत्साहवर्धक वातावरणात पार पाडली गेली. स्थानिक समता गणेश मंडळाचे अध्यक्ष विवेक श्रीराम पाटील, उपाध्यक्ष सुनील गावंडे तथा पदाधिकारी प्रवीण काजळे, संजय ढोके, नितीन सोनुलकर, हर्षद परांडे, गणेश परांडे यांचा स्थानिक पोलिस स्टेशन मधील निरक्षकांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राज्यातील श्री गणेश महोत्सवाला शासनाने राज्य महोत्सव म्हणून यावर्षी घोषित केलेले आहे. टाळ, मृदंग, ढोल, ताशे आदी पारंपारिक वाद्यांचा वापर गणेशोत्सव दरम्यान करून ध्वनी प्रदूषण विरहित व पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले होते.
कारखेडा येथील गणेशोत्सव मंडळांनी डीजे ह्या अनावश्यक ध्वनी प्रदूषण करणार्या वाद्याचा वापर टाळून पारंपारिक सांस्कृतिक व सामाजिक भान जपत श्री गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल समता गणेश मंडळ आणि शिव गणेश मंडळाचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.