shrigita श्रीमद्भगवद्गीतेचा 11 वा अध्याय ‘विश्वरूप दर्शन योग’ नावाने संबोधित आहे. 10 व्या अध्यायात भगवंतांनी आपल्या विविध विभूती सांगून आपले विराटत्व अर्जुनाला सांगितले. ते ऐकून अर्जुनाला भगवंताचे विराट रूप पाहण्याचा मोह झाला आणि त्याने भगवंताला आपले विराट स्वरूप दाखविण्याची विनंती केली. भगवंतांनी दिव्य दृष्टी देऊन आपले विराट असे विश्वरूप अर्जुनाला दाखविले. म्हणून या अध्यायाला ‘विश्वरूप दर्शन योग’ म्हटले आहे. भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगत आहेत की, आपल्या धनशक्तीचा, बुद्धी, शक्ती, पराक्रमाचा, पद, प्रतिष्ठा, विद्येचा अहंकार बाळगू नका. कारण ते सर्व विश्वरूप परमात्मा घडवतोय; आपण फक्त निमित्तमात्र आहोत. या अध्यायात श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुन संवाद तर आहेच; शिवाय संजय धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरील घटनाक्रम सांगतात. दिव्य दृष्टी नसल्यामुळे संजयला विश्वरूप दर्शन झाले नाही, परंतु कृष्णार्जुन संवादातून त्याने जे ऐकले ते त्याने धृतराष्ट्राला सांगितले.
अध्यायात सुरुवातीलाच अर्जुन भगवंताला म्हणतात-
‘मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ।।’
भगवंता, तुझे विराट स्वरूप पाहण्याची माझी इच्छा आहे. जर मला पाहणे शक्य असेल तर हे योगेश्वर, मला तुमच्या अव्यय आणि विराट अशा स्वरूपाचे दर्शन द्या. तेव्हा भगवंत अर्जुनाला सांगतात की, चर्मचक्षूंनी ते शक्य नाही म्हणून मी तुला दिव्य चक्षू देतो. ती दिव्य दृष्टी मिळाल्यावर एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे भगवंताचे रूप अर्जुनाने जे दिसले ते हातोहात विशद केले आहे. अर्जुनाला आकाशात कोटीसूर्याचा प्रकाश दिसला आणि तो देहभान विसरून त्या स्वरूपाबद्दल भगवंतालाच सांगू लागला-
‘अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप ।।’
हे भगवंता, मला तुमचे अनेक हात, उदर आणि अनंत मुखे आणि अगणित रूपे दिसत आहेत. त्रिलोक तूच व्याप्त केल्याचे दिसत आहे.
‘अनादिमध्यान्तमनन्तवीर्यमनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रंस्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ।।’
हे भगवंता, तुझे विश्वरूप आदि-मध्य-अन्त्यरहित असून तुला असंख्य बाहू आहेत. सूर्य आणि चंद्र तुझे डोळे, मुख प्रज्वलित अग्नीप्रमाणे तेजस्वी आहे. तूच विश्वरूप झालेला आहेस.
‘दंष्ट्राकरालानि च ते मुखानिदृष्टैव कालानलसन्निभानि ।
दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ।।’
हे महाबाहो भगवंता, विक्राळ दाढांचे महाभयंकर रूप पाहून माझी अवस्था भयभीत झाली आहे. तुझा भला मोठा जबडा, जबड्यातून बाहेर पडणारा प्रलयाग्नी हृदयाचा थरकाप उडवत आहे. माझी मती नष्ट होऊन मला भ्रमिष्ट झाल्यासारखे वाटत आहे. हे जगन्निवासा, मला शांती प्रदान करा! हे पाहताना पुढे अर्जुनाला जे दृश्य दिसले ते महत्त्वाचे आहे.
‘यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगाविशन्ति नाशाय समृद्धवेगा: ।
तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगा: ।।’
हे भगवंता, ही सर्व कौरव सेना सर्व योद्ध्यांसह तुझ्या मुखात जात असल्याचे मला दिसत आहे. त्यांची मस्तके तुझ्या दातांच्या फटीत अडकलेली दिसत आहेत. ज्याप्रमाणे पतंग अग्नीकडे वेगाने धाव घेतो तसेच हे योद्धे वेगाने तुझ्या मुखात प्रवेशून त्या सर्वांचा सर्वनाश होताना दिसतोय. मला असेही दिसत आहे भगवंता की, धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आपण सर्व जिवांना गिळंकृत करीत आहात... त्याचे विस्मयकारी शब्द ऐकल्यावर भगवंत अर्जुनाला सांगतात की, हे अर्जुना!
‘द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् ।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठायुध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ।।’
लक्षात ठेव, शत्रुसेनेतील सर्वांचा विनाश ‘तू युद्ध नाही केले तरी’ अटळ आहे. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, जयद्रथादी सर्वांना मी आधीच मारले आहे.
‘तस्मात्त्वमुक्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ।।’
तू फक्त निमित्त आहेस म्हणून ऊठ आणि युद्ध कर! तेव्हा अर्जुन म्हणतात की, भगवंता, माझ्या ध्यानात आले आहे की, ‘तुम्हीच कर्ता आणि करविता’ आहात. आपणच ब्रह्मदेवाचेही आदिकर्ते आहात.
‘त्वमादिदेव: पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ।।’
आपणच सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप आहात. आपणच सनातन आहात. तुम्हीच हे विश्व अंतर्बाह्य व्यापून टाकलेले आहे.
‘रुद्रादित्या वसवो ये च साध्याविश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च ।’
गंधर्वयक्षासुरसिद्धसङ्घावीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ।।’
अकरा रुद्र, बारा आदित्य, आठ वसू, अश्विनीकुमार यक्ष, गंधर्व राक्षस, सिद्धगण आश्चर्यचकित अवस्थेत दिसत आहेत. हे भगवंता, आपणच वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजापती आणि ब्रह्मदेवाचे पिताही आपणच आहात. भगवंता, तुमचे स्वरूप मी आता जाणले आहे. मी तुमचा अपराधी आहे. कारण-
‘सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदंमया प्रमादात्प्रणयेन वापि ।।’
हे भगवंता, मी अज्ञानी असल्यामुळे तुम्हाला मी सखा, मित्रा, कृष्णा, यादवा, माधवा अशी एकेरी हाक देत होतो. आता मला माझा मूर्खपणा लक्षात येत आहे. आपण सोबत होतो तेव्हा झोपताना, बसताना, भोजन करताना कधी मी तुमचा अपमान किंवा उपहासही केला असेल. हा प्रमाद अज्ञानातून झाला म्हणून मी तुमची क्षमा मागतो. भगवंता! आपण या चराचर सृष्टीचे पिता आहात. तिन्ही लोकांत तुमच्यासम तुम्हीच आहात. माझे सर्व अपराध क्षमा करा.
‘किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रूपेण चतुर्भुजेनसहस्रबाहो भव विश्वमूर्ते ।।’
पण देवा खरं सांगू, हे विराट रूप पाहून माझे मन भयभीत झाले आहे. देवा, मला आपले शंख-चक्र-गदा-पद्म धारण केलेले चतुर्भुज रूपच आवडते. विश्वरूप सत्य असले, तरी कृपया आपण त्याच चतुर्भुज रूपात प्रकट व्हा. भगवंत त्याला सांगतात-
‘मया प्रसन्नेन तवार्जुनेदंरूपं परं दर्शितमात्मयोगात् ।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यंयन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ।।’
की अर्जुना, मी तुझ्यावर प्रसन्न असल्यामुळे मी माझे विराट रूप तुला दाखविले. हे रूप तुझ्याशिवाय आजवर कोणीही पाहिलेले नाही. हे माझे रूप जप-तप-अनुष्ठानाने कुणालाही प्राप्त होणार नाही. तुझ्यावर माझे आत्यंतिक प्रेम आहे आणि तू माझ्याप्रति अनन्यभाव ठेवतो म्हणून तुला हे विराटरूप दाखविले आहे. हे माझे विश्वरूप पाहून भयभीत होऊ नको. गोंधळून जाऊ नको. चित्त स्थिर कर. तुझ्या इच्छेनुसार आता मी माझ्या चतुर्भुज रूपात येतो.
‘मा ते व्यथा मा च विमूढभावोदृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् ।
व्यतेपभीः प्रीतमनाः पुनस्त्वंतदेव मे रूपमिदं प्रपश्य ।।’
आणि भगवंतांनी सौम्य रूप धारण केले. ते गोड रूप पाहून अर्जुन शांत झाला. त्याने भगवंताजवळ आनंद व्यक्त केला. त्याने भगवंताला शरणागत आणि समर्पित भावाने दंडवत केला. भगवंत त्याला म्हणाले की,
‘मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः ।
निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ।।’
अर्जुना, ज्या रूपाला पाहण्यासाठी देवसुद्धा व्याकुळ असतात असे अतिदुर्लभ रूप मी तुला दाखविले आहे. कोणत्याच अनुष्ठानाने प्राप्त न होणारे माझे विराट रूप केवळ अनन्यभक्तीने साक्षात किंवा तत्त्वत: पाहता येते आणि असा अनन्य शरणागत अंती माझ्याच स्वरूपाला येतो. तू त्या योग्यतेचा आहेस म्हणून विश्वरूप दर्शन तुला मिळाले.
थोडक्यात, भगवंतांने अर्जुनाचा अहंकार नष्ट करण्यासाठी विश्वरूप दाखविले. भगवंताचे विराट स्वरूप पाहिल्यावर अर्जुनाला स्वबोध होऊन आपण फक्त निमित्तमात्र असल्याचे समजले.shrigita आपण फक्त कळसूत्री बाहुली असून बोटे फिरवणारा तोच पूर्णपूर्णावतार योगेश्वर कृष्ण आहे. म्हणून आपण जिवाने त्या परमेश्वराप्रति अनन्यभाव ठेवावा. कारण आपण कोणीच काहीच नसून कर्तूमकर्तूम तोच आहे. विश्वरूप दर्शन म्हणजे त्या परब्रह्म परमात्म्याच्या शक्तीचे, सामर्थ्याचे त्याच्या एकचालकानुवर्तित्वाचे दर्शन होय.
प्रा. दिलीप जोशी
9822262735