स्वाती काळे (कोलारकर)
Ancient heritage of Maharashtra काही मंदिरे दूर वेशीवर गूढस्थ उभी असतात. इतिहासाचा जीर्ण महापुरुष त्यांना वाचू शकत नाही. बघू शकत नाही. समजू शकत नाही. पण ती मंदिरे मात्र त्यांच्या अढळ अविचल गूढ अस्तित्वाने आजूबाजूच्या वृक्षवेलींनासुद्धा मोहवून टाकतात. अशा मंदिरांच्या अस्तित्वाने बाजूला शांत वाहणारी नदी उचंबळून येते. सूर्याची किरणे परतीची वाट धरताना अडखळतात. अशा मंदिरांची शिखरे विसावतात क्षितिजावर, पण प्रतिबिंब मात्र आवारातल्या विहिरीतच पाहतात. लहानपणी आजीचा पदर धरून मंदिरात जायचे आणि मागच्या पायर्यांच्या बाजूला मंदिराला बिलगून उभी असणारी विहीर निरखताना कधी संध्याकाळ व्हायची कळायचं नाही. मंदिराचे गोविंद पुजारी सांगायचे की, विहिरीत लक्ष्मी राहते. पाण्यामधून हळूच डुबुक आवाज करीत कासव वरती तोंड काढायचं आणि गोविंद पुजारी हात जोडायला सांगायचे.

Ancient heritage of Maharashtra महाराष्ट्रात मध्ययुगीन यादव कालखंडात मंदिरांची उभारणी मोठ्या प्रमाणात झाली. इ. स. ९ वे शतक ते १२ वे शतक भक्तिरसाने चिंब भिजलेला कालखंड आहे. या शतकांमध्ये अनेक मंदिरांची उभारणी झाली; त्याचबरोबर गावांची गरज म्हणून विहिरीही खोदल्या गेल्या. प्राचीन बारवांच्या जन्मकहाण्या अभ्यास करण्यासारख्या आहेत. बारवांसोबतच कुंड, कल्लोळ, तीर्थ या त्यांच्या भावंडांनाही समजून घेणे गरजेचे आहे. हे सर्व बारवांचेच लहान-मोठे भाऊ आहेत. आपल्या संस्कृतीचे हे प्राचीन अवशेष थेट आपल्या पूर्वजांशी नाते सांगतात.
गोदावरी, चंद्रभागा, तापी नद्यांच्या काठी मंदिरे वसली आणि सुंदर घाट बांधले गेले. याच ठिकाणांवर मोठमोठी तीर्थक्षेत्रे आली. त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, माहूर, तुळजापूर, कोल्हापूर या ठिकाणी कुंडे, कल्लोळ आणि विहिरींची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली. त्या कायम स्वच्छ राहाव्यात, त्यांचे पावित्र्य टिकावे, त्यांचा नेहमी वापर व्हावा या दृष्टीने कुंडांच्या बाबतीत पाप-पुण्याच्या संकल्पनाही जोडण्यात आल्या. कुंडात स्नान केल्याने असाध्य रोग बरे होतात अशा अनेक समजुती रूढ दृढ झाल्या.
पंचोपचार पूजा, अष्टभोग यासाठी लागणार्या अनेक गोष्टींमध्ये मंदिरातील बारव महत्त्वाचा भाग होती. शिवमंदिरात अखंड जलाभिषेक असतो. त्यासाठी बारव निर्मिती झाली. अंबरनाथ, त्र्यंबकेश्वर या प्राचीन शिवमंदिरांमध्ये तर गर्भगृहातच जलाभिषेकासाठी प्रणाल बांधून स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मंदिर वास्तूच्या पावित्र्यासाठीही मंदिरालगतची लहान आड निर्माण करण्यात आली. देवदेवतांसाठी अंगभोग आणि रंगभोग मानले जातात. अंगभोगात जलस्नान महत्त्वाचे आहे. रंगभोगात सभामंडपातील रंगशिळेवर गावातील कलावंतांचे नृत्यगायन व्हायचे. पुजारी, नृत्यांगना, आचारी, पाणके, गवळी, माळी अशी एक छोटी वसाहतच मंदिराच्या परिसरात राहायची. वसाहतीसाठी पाणी आवश्यक असतेच. त्यामुळे बारवांचा विकास मंदिरांसोबत आपोआपच झाला.
Ancient heritage of Maharashtra लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले. येथेही अनेक विहिरी खणल्या गेल्या. तेथील लिंबी बारवेला म्हणतात. असे म्हणतात की, चित्रसेन राजाची कन्या नंदा श्वानमुखी होती. तिला गतजन्माच्या पापापासून मुक्ती मिळविण्यासाठी येथे तप करावे लागले. येथेच सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि तिला मुक्ती मिळाली. तेथील ‘सासू-सुनेची’ विहीरही फार प्रसिद्ध आहे. तिच्यात गोडे आणि खारे पाणी दोन्हीचे साठे आहेत. लोणारची पाण्याची पातळी खाली गेल्यावर ही सासू-सुनेची विहीर वाशीममध्ये ‘वत्सगुल्म माहात्म्य’ यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण बारवांचे आणि तीर्थांचे उल्लेख येतात. पद्मतीर्थ ही अष्टकोनी पोखरण तसेच दारिद्र्यहरण तीर्थ, तारातीर्थ, लक्ष्मणतीर्थ, कोटीतीर्थ या पावन तीर्थांची वर्णने वाचताना आपण प्राचीन काळात हरवून जातो.
महाराष्ट्रात विहिरींचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळतात. एक दार असलेली वापी म्हणजेच विहीर. एका बाजूनेच जिच्यामध्ये प्रवेश करता ती पायविहीर. या पायविहिरीचेही बरेच प्रकार महाराष्ट्रात आढळतात. वर्तुळाकार, चौरस, अष्टकोनी विहीर असे अनेक प्रकार आहेत. नांदेडमधील कंधार तालुक्यात एक फार जुनी चौरस विहीर आहे. तिला ‘खासबावडी’ म्हणतात. राष्ट्रकुल राजा कृष्ण तिसरा याच्या काळातील शिलालेख या विहिरीजवळ सापडला होता.
लहानपणापासून नेहमी कुतूहल वाटायचं की, ‘इकडे आड तिकडे विहीर’चा अर्थ असेल. ढोबळ मानाने दोन्हींकडून सारखीच संकटे असा या म्हणीचा अर्थ असावा. पण आड आणि विहीर या दोन्हींमध्ये फरक आहेच. विहिरीला एका बाजूने प्रवेशमार्ग असतो. आडाला प्रवेशमार्ग नसतो.
Ancient heritage of Maharashtra आकाराने बारव जर लहान असेल तर तिला ‘कल्लोळ’ म्हणतात. कुंडासारखाच पण थोड्या मोठ्या स्वरूपात असणारा कल्लोळ मंदिराच्या समोरच असतो. ‘पोखरणी’ म्हणजे चारी बांधलेले तळे किंवा जलाशय. कमी खोलीवर प्रशस्त भाग तळाशी ठेवून पोखरणीचे बांधकाम होते. पोखरणीला कमी उंची असते. तिला पूर्वीच्या काळी ‘पुष्करणी’ म्हणायचे. मुंबईत वाळकेश्वर मंदिराच्या समोर ‘बाणगंगा’ नावाचा जलाशय आहे. असं म्हणतात की, परशुरामाने येथे बाण मारून गंगा निर्माण केली. एक आख्यायिका अशीही आहे की, प्रभू रामचंद्र वनवासात असताना तहान लागली तेव्हा त्यांनी बाण मारून येथे गंगा उत्पन्न केली. म्हणून या तलावाला ‘बाणगंगा’ म्हणतात. बाणगंगा तलावाला पोखरणी किंवा पुष्करणी असे आपण म्हणू शकतो.
रामटेक येथील ‘सिंदूरवावी’ प्रेक्षणीय आहे. पुष्करणीच्या आकाराची ही प्रशस्त बारव आहे. तिच्या एका बाजूला थोरला मंडप आणि खाली उतरण्यासाठी लगतच पायर्या आहेत. ‘कापूरवावी’ ही पण आकाराची पुष्करणी आहे. हिच्या तिन्ही बाजूला मंडप बांधला आहे आणि समोरच्या मंडपामध्ये तीन लहान गाभारे तर आहेच; वरती शिखरही दिसते. ‘सिंदूरगिरी’ स्थलमाहात्म्यामध्ये या दोन्ही बारवांची मनोहर वर्णने वाचायला मिळतात. विदर्भाचे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या वाकाटककालीन प्राचीन वसाहती जलाशयांभोवतीच वसलेल्या होत्या.
पोखरणीपेक्षा मोठा जलाशय आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. अशा जलाशयाला म्हणतात. नैसर्गिक वाहून येणारे पाणी अडवून बंधारा बांधायचा. जो तलाव तयार झाला त्याला तडाग म्हणायचं. नांदेडमधला ‘जंगतुंग तलाव’ असाच प्राचीन तडाग आहे. १० व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा यांनी बांधलेला तडाग आजही दुथडी भरून जनसामान्यांना आशीर्वाद देतो आहे. पाण्याभोवती वसाहती वसल्या. पाण्याने मनुष्याला जीवन दिले. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी पवित्र मानले. तीर्थस्वरूप मानले. तीर्थ म्हणजे पवित्र जागा. काही विहिरींनाही तीर्थ समजण्यात येते आणि मोठमोठ्या सरोवरांनाही तीर्थस्वरूप मानून तेथे स्नान केल्यास साता जन्मांची पापे धुवून निघतात. ऋग्वेदात तीर्थाचा अर्थ नदीमधून चालत येण्याचा मार्ग असा होतो. महाभारतात तीर्थाचा संबंध यज्ञविधींशी जोडला आहे. पुष्कर, जम्बुमार्ग, रुद्रकोटी, संकुकर्णेश्वर, कुरुक्षेत्र या तीर्थांवर अश्वमेध झाल्यावर चांगली फळे मिळतात, असे महाभारतात उल्लेख आहेत.
Ancient heritage of Maharashtra प्राचीन काळी तीर्थांवर यज्ञविधी करण्यासाठी शेकडो कारागीर तैनात असायचे. आर्थिक दृष्टीने विचार केल्यास यज्ञविधी म्हणजे वर्णव्यवस्थेतील सर्वांचीच पोटाची सोय होती. ज्या नदीकाठी तीर्थे वसायची तेथे सतत वर्दळ असायची. महाभारतातील अंबा सुडाग्नीने होरपळत भीष्मवध करण्याची प्रतिज्ञा करते तेव्हा भीष्माची माता गंगा हिला दुःख होते. ती अंबेला टोचून बोलते की, ‘अंबे, तू नदी होशील, पण तुझ्या काठी वसलेली तीर्थे निर्मनुष्य असतील. म्हणजेच तू कोणाचे पोट भरू शकणार नाही. तुझ्या काठावर कारागिरांचा राबता राहणार नाही.’ पाणी आणि अर्थव्यवस्था यांचं असं हे प्राचीन नातं आहे.
कोणत्याही तीर्थावर गेलं तर तेथे कुंड असतेच. कुंड म्हणजे बांधलेला मोठा हौद. यातही बारवसारख्या पायर्या असतात. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन कुंड उस्मानाबाद जिल्ह्यात तेर येथे आहे. हे कुंड बांधण्यासाठी त्या काळात भाजक्या विटांचा वापर केला गेला होता. विदर्भातही मांढळ येथे सापडलेले चौथ्या शतकातील कुंड विटांचे आहे.
महाराष्ट्रात विहिरीची स्वामिनी म्हणून ओळखली जाणारी ‘पुतळा बारव’ बुलढाण्याच्या दक्षिणेला ६४ किलोमीटर अंतरावर विहिरींच्या शिल्पनिर्मितीची शिरोमणी म्हणजे पुतळा बारव. मधोमध चौरस कुंड आणि त्यानंतर उमलत्या कमळाप्रमाणे तिचे पसरत जाणे सर्वच फार विलोभनीय आहे. संरक्षक भिंत उभारताना एक गजथर उभारून त्यावर मुख्य देवतांसाठी स्वतंत्र असे देवकोष्ट ठेवले आहेत. असे वाटते की देवदेवता, देवांगणा, असुर, देवता परिवार एकाच मंदिरात नांदत आहेत. पायर्यांवरील नक्षी, योद्धे, अप्रतिम कोरले आहेत आणि त्यामुळे पुतळा बारव महाराष्ट्रातील विहिरींची स्वामिनी ठरते.
Ancient heritage of Maharashtra मुंबईजवळच्या वसई जिल्ह्यात अजूनही प्राचीन विहिरी बघायला मिळतात. खालचे झरे बंद होऊ नये म्हणून तळाशी लाकडे ठेवण्यात येतात. विहिरीचे झाकणही लाकडाचेच असते. त्यामुळे विहिरीचा संपूर्ण भार जमिनीवर कधीच येत नाही. विहिरीत खांब टाकले जातात. दोतेरी किंवा टोकेरी रहाटाला व्हील म्हणतात. चाकाला चक्र लावले जाते त्याला ‘दभडा’ म्हणतात. दभड्यावर केळीपासून बनलेला ताग म्हणजेच दोरखंड लावतात आणि त्यावर मातीच्या गाडग्यांची बांडी लावतात. काही विहिरी बांधलेल्या नसत. जलसाठ्यासाठी गड्डे खोदलेले ते ‘बावखले’ असायचे. या बावखल्यांमुळे जमीन बारमाही ओलसर राहायची.
यादवकाळानंतर महाराष्ट्रात राजकीय आक्रमणाबरोबरच सांस्कृतिक आक्रमणदेखील झाले. असंख्य मंदिरे तोफेच्या तोंडी झाली. त्यातील मूर्ती उद्ध्वस्त केल्या गेल्या. पण वार्याच्या झुळकीबरोबर दुपारचे मंद डुलणारे विहिरीतले पाणी मात्र शाश्वत राहिले. काही प्राचीन बारवा भग्न अवस्थेत का होईना, पण अजूनही माणसाची मायेने सोबत करीत गावच्या वेशीवर वाटसरूंची तहान भागवतात. बहिणाबाई चौधरी विहिरीचे रसाळ वर्णन करीत जीवनाचे अद्भुत सार सांगतात-
‘वेहिरीत दोन मोटा, दोन्हीमधी एक,
आडोयालो कना चाक, दोन्हीमध्ये गती एक |’
महाराष्ट्रातील प्राचीन बारवा आपल्या संस्कृतीचे भग्न अवशेष आहेत, पण त्यांची जपणूक करणारे हात कोण जाणे कुठे हरवलेत.