SL-Bhyrappa एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाची वार्ता साहित्यप्रेमींना दु:ख देऊन गेली. त्यांच्या नसण्याने साहित्यविश्वाचे किती मोठे नुकसान झाले आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. लेखनासाठी कादंबरी हा साचा निवडणारे भैरप्पा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि अभ्यासक होते. कुटुंबात घडलेल्या विपरीत प्रसंगांना तोंड देत ते मोठे झाले. लहानपणीच आईचे छत्र हरवले. १५ वर्षांचे असताना रानात नेऊन आपल्या अवघ्या पाच वर्षांच्या लहान भावावर अन्त्यसंस्कार करण्याचा प्रसंगही त्यांच्यावर आला. असे विविध प्रकारचे दु:ख भोगत एका अर्थी जगण्याकडून तत्त्वज्ञानाकडे आणि तत्त्वज्ञानाकडून जगण्याकडे त्यांचा सतत प्रवास होत राहिलेला आपल्याला दिसतो. पुढे शिक्षणामध्येही अनेक अडथळे आले. तरीदेखील त्यांनी शिक्षण केले. पदवी घेतलीच; डॉक्टरेटही घेतली. १९५८ च्या आसपास त्यांनी लेखनाला सुरुवात केली. ‘वंशवृक्ष’ ही त्यांची पहिली कादंबरी. या कादंबरीने कन्नड साहित्यात मोठे वादळ निर्माण केले. त्यावेळचे उदयोन्मुख आणि नामांकित लेखक, नाटककार गिरीश कर्नाड यांनी त्यावर एक चित्रपटही काढला. त्यात स्वत: काम केले. मात्र, पुढील काळात गिरीश कर्नाड, लेखक अनंत यांच्या आणि भैरप्पांच्या विचारसरणीमध्ये अंतर निर्माण होत गेले. यातून त्यांनी एकमेकांवर केलेली टीकाही आपण जाणतो. असा सगळा इतिहास बराच मोठा आहे.
पहिल्या कादंबरीपासून मी भैरप्पांची वाचक आहे. याचे कारण मराठीमध्ये त्यांच्या कादंबर्यांचे भाषांतर करणारी उमा कुलकर्णी ही माझी लहानपणापासूनची मैत्रीण. तिच्यामुळे अनेकदा प्रकाशित होण्यापूर्वीच मला भैरप्पांच्या कादंबर्या वाचायला मिळाल्या त्यांना प्रत्यक्ष भेटीचा योग काही आला नाही. त्यामुळे व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय नाही. मात्र लेखक म्हणून ते चांगलेच परिचित आहेत. आधी उल्लेख केल्याप्रमाणे अखेरपर्यंत त्यांनी कादंबरी हाच लेखनाचा साचा कायम ठेवला. त्यांना अनेक पुरस्कार मिळाल्याचे आपण जाणतो. त्यांच्या गाजलेल्या कादंबर्यांमध्ये ‘दुभंग’चा उल्लेख करावा लागेल. यात त्यांनी सोसलेले दारिद्र्य दिसते. ‘वंशवृक्ष’ या कादंबरीने मराठी वाचकांना चांगलेच बांधून ठेवले. बर्याच कादंबर्यांची मराठीत भाषांतर झाल्यामुळे तेदेखील, मी कन्नडपेक्षा मराठी वाचकांना अधिक परिचित आहे, असे म्हणत असत. महाराष्ट्रात त्यांचे सतत जाणे-येणे होते. काही दिवस ते मुंबईमध्ये राहायला होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात सयाजीराव गायकवाड यांच्या कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम केले होते. त्यामुळेच त्यांच्या निधनाने वाचकांनाही मोठा धक्का बसलेला आपण पाहिला.
त्यांच्या गाजलेल्या कादंबर्यांपैकी एक म्हणजे ‘पर्व.’ मला स्वत:ला ती खूप आवडली. विशेषत: यातील शेवटचे प्रकरण मला भावले. यात त्यांनी महाभारत युद्धाचा शेवटचा काळ चित्रित केला आहे. हे सगळे वर्णन खरोखर अंगावर काटा आणणारे आहे. महत्त्वाचे म्हणजे यातून आपल्या जीवनाची नश्वरता आणि भीषणता प्रामुख्याने येते. आपण भीष्मांना पितामह म्हणून वंदनीय, पूजनीय मानतो. पण या प्रकरणात त्यांच्या माध्यमातून निसर्गाच्या दरबारात एक माणूस म्हणून शरीराची होणारी विकलांगता लेखकाने अत्यंत परखडपणे मांडली आहे. या प्रकरणात SL-Bhyrappa भैरप्पांनी केलेले महायुद्धाचे वर्णन, नंतरची पडझड आणि विविध पातळीवरील माणसासमोर येणार्या दु:खाचे स्वरूप आपल्यालाही अंतर्मुख करून जाते. राजपदावर असणारी व्यक्ती असो सामान्य शिपाई, सगळ्यांना दु:खाचा सामना करणे ही बाब अपरिहार्य आणि अटळ असते हे यातून अधोरेखित होते. जगाच्या पाठीवर झालेल्या सगळ्या महायुद्धांचा इतिहास पाहिला, वर्णने वाचली तरी हेच जाणवते. दुसर्या महायुद्धाचा काळ, हिटलरने केलेला छळ, विषारी वायूने मारलेले जीव हे सगळेच आपण विविध माध्यमांतून जाणले आहे. समजून घेतले आहे. खरे कथा-कादंबर्यांमधून वा चित्रपटातून दाखवलेल्या या गोष्टी बघून जगातील क्रौर्य कमी व्हायला हवे होते. भैरप्पांसारख्या लेखकांनी आपल्या लेखणीतून जनांना या अर्थाने शहाणे करण्याचा प्रयत्न केला आहे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
भैरप्पा यांची गाजलेली आणखी एक कादंबरी म्हणजे ‘आवरण.’ यामध्ये त्यांनी आधुनिक विश्व चित्रित केले आहे. यावर पुरोगामी लोकांचा आक्षेप येत राहिला. डाव्या-उजव्या बाजूने चर्चा झाली. मात्र भैरप्पांनी माणसाच्या जीवनातील सगळी उलथापालथ प्रत्यक्षातही अनुभवली होती आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून अभ्यासलीही होती. यातून आलेले महत्त्वपूर्ण विचार त्यांच्या लेखणीतून समोर येत होते. एकंदरच त्यांच्या लेखनात इतिहास, समाजशास्त्र, पुराण, मानववंशशास्त्र आणि मानसशास्त्र या सर्वांचे एकत्रीकरण दिसून येते. माझ्या मते, कोणत्याही विषयाचा एकरेषीय करून आपल्याला त्या विषयाचे नेमके भान येत नाही तर आंतरज्ञानशाखीय चिंतन करून केलेली मांडणी असेल तरच जीवनाचे सगळे पैलू उलगडतात. भैरप्पा यांच्या कादंबर्यांमध्ये मला हा घटक महत्त्वाचा वाटतो. अशा विचारातून लेखन होते तेव्हा स्वाभाविकच तो केवळ मनोरंजनाचा भाग राहत नाही तर माणसाला अंतर्मुख करणारा, चिंतनशील बनवणारा भाग ठरतो. जीवनावर विचार करण्याची प्रवृत्ती अशा कादंबर्यांमधून दिसते. भैरप्पांच्या कादंबर्या हे याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणाव्या लागतील.
त्यांच्याच नव्हे, तर दक्षिणेकडील सगळ्याच लेखकांबाबत मला ही बाब जाणवते. मराठीमध्ये मात्र हे गांभीर्य फारसे दिसत नाही. मुळातला, भारतीय माणसाच्या मातीतला विचार म्हणता येईल असे लेखन, भारतीय तत्त्वज्ञानाच्या चिंतनातून आलेले विचार दक्षिणेतील सगळ्या लेखकांनी दिसतात. गिरीश कर्नाडांपर्यंतच्या काळाचा विचार केला तर ही बाब प्रकर्षाने जाणवते. मात्र, असा विचार महाराष्ट्रात केलेला दिसत नाही. इंग्रजोत्तर काळात जणू दुफळी निर्माण झाली आणि लोकजीवन तसेच अभिजन जीवन वेगवेगळे असल्याचे विचार प्रबळ झाले. कदाचित त्याचा हा प्रभाव असावा. म्हणूनच आंतरज्ञानशाखीय चिंतनात्मक मांडणी मला महत्त्वाची वाटते.
SL-Bhyrappa भैरप्पा यांच्या ‘उत्तरकांड’ कादंबरीचा उल्लेख मी आवर्जून करेन. त्यांनी ‘पर्व’मध्ये महाभारतावर लेखन केले तर रामायणावरील त्यांचे लेखन ‘उत्तरकांड’मध्ये दिसते. रामाने सीतेचा त्याग केला. तिची मुले स्वीकारली, त्यांना राज्यावर बसवले पण शीलावरून लोकांनी आक्षेप घेतल्यामुळे रामाने तिला मात्र बाजूला टाकले. त्यानंतर ती परत रामाकडे गेली नाही. रामायणाचा आधार घेत भैरप्पा यांनी या कादंबरीमध्ये या उत्तरकाळाचा वेध घेतला आहे. माझ्या प्रवृत्तीला आणि अभ्यासाला जवळचा असल्यामुळे हा विषय अधिक महत्त्वाचा वाटतो. अलिकडेच लोकपरंपरेतून समजलेली सीता मी ‘सीतायन’मध्ये मांडली आहे आणि ‘उत्तरकांड’मध्ये भेटणारी सीता याला समांतर जाणारी आहे. उमा कुलकर्णीने भैरप्पांशी बोलताना माझ्या या लेखनाची कल्पना दिली होती. तेव्हा त्यांनी ‘सीतायन’चे भाषांतर तू कन्नडमध्ये कर, म्हटले होते. तेव्हा प्रत्यक्षात भेट न होता हे त्यांच्याकडून मिळालेले प्रशस्तिपत्रक आहे, अशीच माझी भावना आहे.
देह नश्वर असतो. निसर्गनियमाप्रमाणे भैरप्पा देहरूपाने आज आपल्यात नाहीत. पण चिंतन, लेखनातून ते पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन देत राहतील यात शंका नाही. त्यांना विनम्र आदरांजली.