नवी दिल्ली
Deepika Padukone, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने भारताच्या पहिल्या ‘मेंटल हेल्थ अॅम्बेसेडर’ (मानसिक आरोग्य राजदूत) म्हणून नियुक्ती होऊन इतिहास घडवला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही ऐतिहासिक घोषणा जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने केली. यानिमित्त दीपिकाने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आणि देशभरात मानसिक आरोग्याविषयी जनजागृती आणि सुविधा सुधारण्याबाबत आपल्या सहकार्याबाबत चर्चा केली.
दीपिका पदुकोण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या 'लिव, लव्ह, लाफ फाउंडेशन'च्या माध्यमातून मानसिक आरोग्यविषयी जनजागृतीसाठी कार्यरत आहे. तिने स्वतःही डिप्रेशनशी लढा दिला असून, या विषयावर ती नेहमीच स्पष्टपणे बोलत आली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून मिळालेली ही जबाबदारी तिच्या कार्याला अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देणारी ठरणार आहे.
दीपिकाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ही बातमी शेअर करत आपली भावना व्यक्त केली. ती म्हणाली, “जागतिक मानसिक आरोग्य दिनी मला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पहिल्या मानसिक आरोग्य राजदूतपदी नियुक्त करण्यात आल्याचा सन्मान वाटतो.” तिने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मानसिक आरोग्याला सार्वजनिक आरोग्याच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी घेतलेल्या पावलांचे कौतुक केले.
तिने पुढे लिहिले, “माझ्या वैयक्तिक प्रवासातून आणि 'लिव, लव्ह, लाफ' फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दशकात केलेल्या कार्यातून मी हे पाहिलं आहे की, जेव्हा आपण एकत्र येतो, तेव्हा मानसिकदृष्ट्या सशक्त भारत घडवणं शक्य होतं. आता श्री. जे. पी. नड्डा आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली मानसिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी मी कार्य करण्यास उत्सुक आहे.”या घोषणेनंतर दीपिकाच्या पती आणि अभिनेता रणवीर सिंग यानेही तिच्या पोस्टवर अभिमान व्यक्त करत ती इंस्टाग्रामवर शेअर केली. “माझा अभिमान आहे,” अशा शब्दांत त्याने प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर रणवीरच्या या भावनिक पाठिंब्याचं कौतुक केलं जात आहे.
दीपिका पदुकोणची ही भूमिका देशात मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास आणि याबाबत उघडपणे संवाद साधण्यास मोठी चालना देणारी ठरू शकते. मानसिक आरोग्य हे केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावर गांभीर्याने घेतलं पाहिजे, हा संदेश दीपिकाच्या या भूमिकेमुळे अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.