भीषण दहशतवादी हल्ला : ७ पोलिस शहीद, ६ दहशतवाद्यांचा खात्मा

11 Oct 2025 18:41:47
इस्लामाबाद
Dera Ismail Khan terrorist attack पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवारी रात्री डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील रट्टा कुलाची परिसरातील पोलिस ट्रेनिंग सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान ७ पोलिस शहीद झाले असून, तब्बल १३ पोलिस जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हा हल्ला सुमारे ६ तास सुरू होता.
 
 

Dera Ismail Khan terrorist attack  
हा पोलिस प्रशिक्षण केंद्र दक्षिण वजीरिस्तानच्या सीमेपासून फार दूर नसल्याने या भागात सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होते. त्यांनी सर्वप्रथम स्फोटकांनी भरलेला ट्रक प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर आदळवून मोठा स्फोट घडवून आणला. या स्फोटात भिंतीचा एक भाग उद्ध्वस्त झाला आणि एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांची वर्दी परिधान करून केंद्राच्या आवारात घुसखोरी केली आणि स्वयंचलित शस्त्रांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्यांनी ग्रेनेड्स फेकले आणि सुरक्षादलांवर जबरदस्त हल्ला चढवला. या हल्ल्याच्या वेळी प्रशिक्षण केंद्रात सुमारे २०० पोलीस प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक उपस्थित होते.हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस आणि निमलष्करी दलांनी केंद्राचा ताबा घेऊन दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. तब्बल सहा तास सुरू असलेल्या या चकमकीत सुरक्षा दलांनी ६ दहशतवाद्यांना ठार मारले. घटनास्थळी सापडलेल्या दहशतवाद्यांकडून आत्मघातकी जैकेट, स्फोटके, बंदुका आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे.पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे कौतुक केले आहे. सुरुवातीला या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या बंदीघातलेल्या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. मात्र काही वेळातच त्यांनी दुसरे विधान जारी करत या हल्ल्याशी संबंध नसल्याचा दावा केला.
 
 
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली की, २०२१ नंतर देशात विशेषतः अफगाणिस्तान सीमेलगतच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यांनी सांगितले की, यावर्षी १५ सप्टेंबरपर्यंत देशभरात १०,००० पेक्षा अधिक दहशतवादविरोधी कारवाया राबवण्यात आल्या असून, त्यात ९७० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र या कारवायांमध्ये ३११ सैनिक आणि ७३ पोलिसांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.
 
 
या हल्ल्यामुळे पाकिस्तानातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, देशातील दहशतवादी कारवायांविरोधातील लढ्याला आणखी बळ देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
Powered By Sangraha 9.0