आरशात पाहा, मग शेतकऱ्यांसोबत मोर्चे काढा

11 Oct 2025 13:50:38
औरंगाबाद
Devendra Fadnavis  "उद्धव ठाकरे यांनी आरशात स्वतः पाहावं आणि मगच शेतकऱ्यांसोबत मोर्चे काढावेत," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. औरंगाबाद येथील विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या विभागीय बैठकीसाठी फडणवीस औरंगाबाद दौऱ्यावर आले होते.
 
 

Devendra Fadnavis  
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना २० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली होती. पण आम्ही त्यापूर्वीच २० हजार कोटींची कर्जमाफी केली होती. त्यामुळे त्यांनी काही वेगळं किंवा ऐतिहासिक केलं, असं नाही. त्याशिवाय त्यांनी चालू खात्याच्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात एक फुटकी कवडीही दिली नाही."फडणवीस यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने सध्या ३१ हजार कोटी रुपयांचे मदतपॅकेज जाहीर केले असून, त्यातील २१ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. "आम्ही १६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे दिले आहेत. याशिवाय ६ हजार रुपये राज्य सरकारचे आणि ६ हजार रुपये केंद्र सरकारचे असे १२ हजार रुपये देण्यात येत आहेत. पीकविम्याचेही पैसे देण्यात येत आहेत," अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
 
ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतरच्या मदतीच्या तुलनेत आमच्या सरकारने अधिक प्रभावी आणि थेट मदत दिल्याचा दावा फडणवीसांनी केला. "त्यांनी त्यांच्या कार्यकाळात किती मदत केली, याची तुलना केली, तर त्यांना मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकारच नाही. मात्र ते मोर्चे काढतात, कारण त्यांना आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे," अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.दरम्यान, औरंगाबाद येथे पार पडलेल्या भाजपाच्या विभागीय बैठकीविषयी माहिती देताना फडणवीस म्हणाले की, आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
 
 
 
राज्याच्या राजकारणात शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0