छोटा राजनचा साथीदार डीके राव अटकेत

11 Oct 2025 13:38:07
मुंबई
DK Rao arrested, अंडरवर्ल्डमधील कुख्यात नाव असलेल्या डीके राव याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शुक्रवारी अटक केली. खंडणी व धमकीप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या दोन साथीदार अनिल सिंग आणि मिमित भुटा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दक्षिण मुंबईतील सत्र न्यायालयाच्या परिसरातून तिघांना अटक करण्यात आली. एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावत 1.25 कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा हा प्रकार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
 
 

DK Rao arrested 
शुक्रवारी संध्याकाळी डीके राव आणि त्याचे दोन्ही साथीदार न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. त्याचवेळी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत तिघांनाही न्यायालयाच्या आवारातच बेड्या ठोकल्या. या प्रकरणात तक्रारदाराने पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, एका बांधकाम व्यवहारात 1.25 कोटी रुपये दिल्यानंतर ते परत मिळाले नाहीत. पैसे मागितल्यावर आरोपींनी धमक्या देण्यास सुरुवात केली. यानंतर तक्रारदाराने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 308 (4), 61(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.डीके राववर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. याच वर्षी जानेवारीमध्ये त्याला सहा साथीदारांसह एका हॉटेल व्यावसायिकाला 2.5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यावेळीही पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा खंडणी आणि धमकीच्या प्रकरणात त्याचं नाव समोर आलं आहे.
 
 
 
डीके राव हे नाव मुंबईतील गुन्हेगारी विश्वात 1990 च्या दशकात गाजलं. छोटा राजनच्या गँगमधील तो एक अत्यंत विश्वासू आणि प्रभावी साथीदार म्हणून ओळखला जात होता. तुरुंगात असतानाही त्याने अनेक गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप आहेत. 2002 मध्ये छोटा राजन आणि त्याचा आणखी एक सहकारी ओपी सिंग यांच्यात मतभेद झाल्यानंतर, ओपी सिंगच्या खुनात डीके रावचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. तुरुंगातूनच हा कट रचल्याची माहिती तेव्हा मिळाली होती.डीके राववर पोलिसांनी पूर्वीही चकमकीदरम्यान कारवाई केली होती. त्यावेळी त्याचे चार साथीदार ठार झाले, मात्र त्याने मृत्यूचं नाटक करून स्वतःचा जीव वाचवल्याची माहिती पुढे आली होती. एवढंच नव्हे, तर दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीने त्याला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले होते. छोटा राजन परदेशात असतानाही डीके रावने मुंबईतील गुन्हेगारी वर्तुळात आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं होतं.
 
 
 
शनिवारी डीके राव आणि त्याचे दोन्ही साथीदार न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू असून, खंडणीप्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. डीके रावच्या अटकेनं मुंबईतील गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Powered By Sangraha 9.0