नवी दिल्ली
Google Doodle Idli, गूगलने ११ ऑक्टोबर २०२५ रोजी एक खास डूडल सादर करत दक्षिण भारतातील पारंपरिक आणि लोकप्रिय नाश्ता इडलीला मानाचा मुजरा केला. या खास डूडलमध्ये इडलीसह मेदू वडा, सांबार आणि चटणीसारख्या अन्य पारंपरिक पदार्थांचाही समावेश करून, इडलीच्या सांस्कृतिक आणि पाककला वारशाचा उत्सव साजरा करण्यात आला आहे.
जरी ‘वर्ल्ड इडली डे’ हा अधिकृतरीत्या ३० मार्च रोजी साजरा केला जात असला, तरी गूगलने ११ ऑक्टोबर रोजी सादर केलेले हे डूडल एक वेगळा, जागतिक स्तरावरील इडलीच्या लोकप्रियतेचा उत्सव ठरला. या अनपेक्षित पण उत्साहवर्धक सन्मानामुळे इडलीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.इडली ही केवळ नाश्त्याची डिश नसून, भारताच्या विविध भागांतील खाद्यसंस्कृतीचे Google Doodle Idli प्रतीक आहे. विशेषतः दक्षिण भारतात इडली ही आरोग्यदायी, सुपाच्य आणि फर्मेंटेड अन्न म्हणून गेली कित्येक शतके वापरली जात आहे. मात्र तिचा उगम भारताबाहेर, विशेषतः इंडोनेशियात*झाल्याचे अन्न इतिहासतज्ज्ञ सांगतात.
काय इतिहास
खाद्यपारख करणारे आणि अन्न इतिहासाचे अभ्यासक के.टी. आचार्य यांच्या संशोधनानुसार, आधुनिक इडलीसारखी डिश इंडोनेशियामध्ये ७व्या ते १२व्या शतकात ‘केदली’ किंवा ‘केदरी’ या नावाने प्रचलित होती. तिथल्या फर्मेंटेड अन्नांच्या परंपरेतून ही पद्धत दक्षिण भारतात आली असावी. अशा पद्धतीचे अन्न स्थानिक लोकांच्या आहारात सहज मिसळले आणि पुढे त्याचा इडली या स्वरूपात विकास झाला.
इडलीचा पहिला लिखित उल्लेख इ.स. ९२० च्या सुमारास कन्नड ग्रंथांमध्ये आढळतो. शिवकोटियाचार्य यांनी त्यांच्या ग्रंथात उडदाच्या डाळीपासून बनवलेल्या एका पदार्थाचा उल्लेख केला आहे, जो नंतर तांदळासह मिसळून हलकी, फुलकी आणि स्पंजसदृश इडलीमध्ये परिवर्तित झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा अन्नधान्याचे रेशनिंग सुरु झाले, तेव्हा रवा (सुजी) इडलीचा जन्म झाला, जो आजही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.आज इडली फक्त एक खाद्यपदार्थ नाही, तर आरोग्यदायी आहाराचा एक आदर्श पर्याय म्हणून जगभरात ओळखला जातो. फर्मेंटेशनमुळे त्यामध्ये निर्माण होणारे प्रोटिन्स आणि पोषणमूल्ये यामुळे इडली ही ग्लोबल हेल्दी ब्रेकफास्टचा भाग बनली आहे.
गूगलच्या या डूडलमुळे इडलीच्या लोकप्रियतेला अधिक व्यापक स्वरूप मिळाले आहे. डूडलमधील सौंदर्यपूर्ण रचना, त्यामध्ये इडलीच्या परिघात सांबार, वडा आणि चटणी यांचा अंतर्भाव – हे केवळ एक अन्नप्रेमींसाठी दृश्य नाही, तर भारतीय खाद्यपरंपरेचा जागतिक गौरव ठरला आहे.गूगलचा हा उपक्रम एक वेगळा सांस्कृतिक सन्मान ठरत असून, इडलीसारख्या साध्या पण वैश्विकतेच्या दिशेने झेपावलेल्या खाद्यपदार्थाला मिळालेल्या या जागतिक सन्मानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.