वेध. . .
विजय कुळकर्णी
wild animals वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहे. मात्र, आज पुन्हा या समस्येकडे वन विभागाचे लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे गेल्या महिनाभरापासून वानरांच्या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाच्या कारणावरून तुंबळ युद्ध सुरू आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचे विश्व देखील अजब असते. हे प्राणी एकाच जंगलात वास्तव्यास असले तरीही त्यांचा परिसर ठरलेला असतो. एकाच जातीच्या दोन प्राण्यांना दुसरा आपल्या परिसरात आलेला आवडत नाही. असेच या वानरांचे देखील असते, असे एका वन्यजीव अभ्यासकाने त्यांचे निरीक्षण नोंदविले आहे. हे सध्या जानेफळकर अनुभवत आहेत. या वानरांच्या टोळ्या एकमेकांचा पाठलाग करताना घरांच्या छतावर, टिनांवर उड्या मारतात.
त्यामुळे एखादे टिन पडते की काय, अशी भीती वाटते. महिला सध्या वाळवण टाकत असल्याने त्यांच्यावर वानरांचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा, या वानरांचा वन विभागाने बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. तर, अशाचप्रकारे शेतात हरिण, रानडुक्कर, रोही इत्यादी वन्यप्राणी प्रचंड नासधूस करून पिकांचे नुकसान करतात. पिकांच्या अंकुराच्या अवस्थेत वन्यप्राणी पूर्ण पीकच खाऊन नष्ट करतात. त्याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. एवढेच नव्हे तर, शेतात कामाला गेलेल्या शेतकरी, शेतमजुरांवर रानडुक्कर व इतर वन्यप्राणी हल्ला करतात. त्यात अनेकदा शेतकरी गंभीर जखमी होतात. काही जणांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत.
पूर्व विदर्भातील वाघाने हल्ला केल्याने जखमी किंवा जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत. कायद्याने या वन्यप्राण्यांची शिकार करण्यावर बंदी आहे. एखाद्या प्राण्याचा नैसर्गिक मृत्यू झाला व त्याचा मृतदेह एखाद्याच्या शेतात पडून असेल तर, त्या शेतकऱ्याला वन्य जीव संरक्षण विभागाला त्याबाबत माहिती द्यावी लागते. त्यानंतर वन्य जीव विभागाचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन पुढील कारवाई करतात. शिकारीवर बंदी असल्याने या प्राण्यांच्या संख्येत आता मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हे प्राणी त्यांच्यासाठी संरक्षित असलेल्या अभयारण्यातून बाहेर पडून नागरी वस्तीच्या जवळ असलेल्या शेत शिवारात घुसून हैदोस घालत आहेत. तेव्हा, वन विभाग किंवा वन्य जीव संरक्षण विभागाने अभयारण्याबाहेर असलेल्या प्राण्यांना पकडून अभयारण्यात सोडण्याची मोहीम राबविली पाहिजे. आता शासनाने शेतीभोवती कुंपण भिंत उभारण्यासाठी किंवा कुंपण घालण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे.wild animals पण, त्यासाठी असलेल्या अटींमुळे त्याचा किती आणि कोणाला लाभ मिळेल हे सांगणे कठीण आहे. तसेच, वन विभाग वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत पावलेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या वारसांना मदत निधी देते. पण, त्यापेक्षा वन्यप्राण्यांना पकडून अभयारण्यात नेऊन सोडले पाहिजे. कारण, अभयारण्यात शेतकरी किंवा कोणी नागरिक जात नाहीत. जंगल सफारी करणारे पर्यटक, वन्यजीवप्रेमी जातात. मात्र, वन्यप्राणी शेतात किंवा गावात आल्यास शेतकरी, नागरिक काहीच करू शकत नाहीत. केवळ वन विभागाला प्राणी गावात किंवा शेतात आल्याची माहिती देऊन त्यांची प्रतीक्षा करीत त्या प्राण्यावर लक्ष ठेवून बसणे, एवढेच त्यांच्या हाती असते. प्राण्यांमुळे जंगलतोड होत नाही. जंगल वाढल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो. त्यासाठी वन्यप्राणी जगणे महत्त्वाचे आहे. पण, वन्यप्राण्यांमुळे मानवी जीवन धोक्यात येत असेल तर, काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढे करूनही वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारे प्राण्यांची चोरून शिकार करतात. त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तेव्हा, शासन आणि वन विभागाने नागरी वस्ती आणि शेत शिवारात घुसून वास्तव्य करणाèया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
8806006149