मोदी सत्तेची 24 वर्षे आणि जेन झी

11 Oct 2025 05:30:02
 
 
modis and gen z 7 ऑक्टोबर 2001. गुजरातमध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला. नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या वेळी ‘हा माणूस किती काळ टिकेल’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. गंमत म्हणजे ही चर्चा करणाऱ्यांना आज लोक ओळखत नाहीत. लोक ओळखतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. 7 ऑक्टोबर 2025 रोजी या घटनेला तब्बल 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 24 वर्षांत मोदी सातत्याने सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. प्रथम गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून. हा प्रवास एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते राष्ट्रीय नेत्यापर्यंतचा आहे. एका प्रेरणादायी अशा चित्रपटाच्या रोमांचक कथेसारखा आहे. नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगर येथे एका सामान्य कुटुंबात झाला. 1960 च्या दशकात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. 1970 च्या दशकात आणिबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून संघर्ष केला. नरेंद्र मोदींची राजकारणातील सुरुवात प्रचारक म्हणून झाली, असे म्हणावे लागेल.
 
 

GEN  Z  
 
 
त्यांनी भाजपासाठी जमिनीवर काम केले, रस्त्यांवर फिरले, सामान्य माणसाच्या घरात जाऊन संवाद साधला. हीच त्यांची खरी ताकद होती. अगदी नवतरुण असताना त्यांनी संघाचा स्वयंसेवक ते प्रचारक म्हणून काम केले असल्याने त्यांना रस्त्यावरची परिस्थिती ठावूक आहे. 2001 मध्ये गुजरातमध्ये भूकंपानंतर राजकीय अस्थिरतेत मोदींना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी गुजरातला विकासाच्या मार्गावर नेले. वायब्रंट गुजरात समिट्सद्वारे परदेशी गुंतवणूक आणली. कृषी आणि उद्योग क्षेत्रात क्रांती घडवली. ही क्रांती इतकी अद्भुत होती की, गुजरात मॉडेलची चर्चा विरोधकांमध्येही होऊ लागली. 2002 च्या दंगलींनंतर आलेल्या वादळांना सामोरे जात, त्यांनी 2002, 2007 आणि 2012 च्या निवडणुकांत विजय मिळविला. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रीय नेतृत्व स्वीकारले आणि भारतीय जनता पक्षाला एकहाती बहुमत मिळवून दिले. त्यानंतर 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांतही ते विजयी झाले. या प्रवासात मोदींच्या डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान यांसारख्या योजनांनी देशाला नवी दिशा दिली.
सध्या जिकडे तिकडे ‘जेन झी’चे वारे सुटलेले आहे. या पृष्ठभूमीवर नरेंद्र मोदींनी राजकीय सत्तेचे 24 वर्षे पूर्ण करीत 25 व्या वर्षात पाऊल ठेवले आहे. जेन झी म्हणजे 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली पिढी. म्हणजे आज 13 ते 28 वर्षांतील तरुण मुलं. श्रीलंका, बांगलादेश आणि विशेषत: नेपाळमध्ये हिंसक, अमानवी, भारतीय दृष्टिकोनातून संविधान विरोधी क्रांती झाली. त्यामागे जेन झी होती, असे म्हटले जाते. भारतातील डाव्या हिंसक विचारांच्या लोकांना भारतातही अशी क्रांती हवी आहे. संवैधानिक सत्ता तरुणांनी लाथाडून हिंसक मार्गाने मोदींना पायउतार करायला लावणे हे स्वयंघोषित पुरोगाम्यांचे दिवास्वप्न आहे. पण पुरोगाम्यांचा आणि जेन झीचा संबंध तुटल्यामुळे, मुळात तो कधीच नसल्यामुळे भारतातील जेन झीला काय हवे आहे, हे तथाकथिक पुरोगाम्यांना माहीत नाही. यासाठी इतर जेन झी पुरोगाम्यांच्या कामी येणारी नाही. मात्र, ‘भटके हुए जिहादी नौजवान’ हे त्यांच्या कामी येऊ शकतात. असो. आता 2024 मध्ये निवडणूक झाली तेव्हा भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या, तरी एनडीएला बहुमत गाठता आले आहे. याचा अर्थ बहुसंख्य जेन झी ही मोदींच्या मागे खंबीरपणे उभी आहे. कारण मोदी त्यांच्यासाठी विकासाचे प्रतीक आहे. मोदी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देतात. दुसरी गोष्ट ज्याप्रकारे ‘चाय पे चर्चा’ या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांशी संवाद साधला. त्याचप्रकारे ‘परीक्षा पे चर्चा’ या माध्यमातून त्यांनी जेन झी पिढीशी संवाद साधला आहे. आता ते जेन अल्फा पिढीशी संवाद साधत आहेत.
उडान योजना किंवा आत्मनिर्भर भारत अभियानातून लाखो तरुण उद्योजक उदयास आले. सोशल मीडियावर ‘मोदी है तो मुमकिन है’सारखे ट्रेंड्स जेन झीच चालवते. जेन झीला मोदी का आवडतात? कारण मोदी त्यांच्यासारखेच ‘डिजिटल’ आहेत. ट्विटर, इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत. 2014 ला मोदी निवडून आल्यानंतर भाजपाच्या आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना त्यांनी सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचे आदेश सोडले होते.modis and gen z मोदींमुळे ‘रांग संस्कृती’ संपुष्टात येत आहे. पूर्वी भारतात काही करायचे असेल तर रांग लावावी लागायची. ही पद्धत वेळखाऊ आणि कंटाळवाणी होती. मोदींनी ऑनलाईन पद्धतीचा प्रचंड प्रचार आणि प्रसार केला. पूर्वी ऑनलाईन व्यवहार नव्हते असे नव्हे; पण मोदींनी त्रुटी शोधून उपाय केले. डिजिटल पेमेंटची किती लोकांनी थट्टा केली होती आठवतंय का? पण पाश्चात्त्य देशांना मागे टाकून भारत डिजिटल पेमेंटमध्ये आघाडीवर आहे. फुले विकणारी अडाणी आज्जीसुद्धा डिजिटल पेमेंट स्वीकारते, ही खरी क्रांती आहे. सर्वसामान्य जनतेला नाटकांच्या दुनियेबद्दल फारसे माहीत नाही म्हणून हे उदाहरण देतोय. पूर्वी नाटकाचे सेन्सॉर करायला प्रत्यक्ष जावे लागायचे. ती प्रक्रिया कंटाळवाणी होती. आता नाटकाचे सेन्सॉर ऑनलाईन होत आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातील, गावातील लेखक त्याची संहिता मोबाईलच्या माध्यमातून सेन्सॉर करून घेऊ शकतो. अशा गोष्टी जेन झीला आकर्षक वाटतात. त्याचबरोबर शत्रूशी व्यवहार करताना मोदींची कठोर निर्णयक्षमता, जसे की सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर यामुळे तरुणांच्या आतमध्ये असलेली रग जिरते. पूर्वी चित्रपटांच्या माध्यमातून तरुण आपली रग जिरवू शकत होता. म्हणूनच अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’ खूप गाजला. पाश्चात्त्य राष्ट्रांत बॅटमॅनसारखे कॅरेक्टर म्हणूनच यशस्वी झाले होते. आता भारतात अँग्री यंग मॅनचा शोध या पिढीला चित्रपटांत घ्यायची गरज नाही. त्यांच्या 75 वर्षांच्या पंतप्रधानाच्या निर्णयांमध्येच त्यांना ‘अँग्री यंग मॅन’चा साक्षात्कार होतो. म्हणूनच ‘56 इंच का सीना’ हा डायलॉग खूप गाजला.
मात्र, भारतातील डावे हिंसक संविधानविरोधी लोक जेन झीला मोदींच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरे पाहता, या पिढीने काँग्रेसला नाकारले आहे. ही पिढी डाव्यांच्या मेंदूप्रमाणे सडकी नाही, तर लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणारी आहे. ही पिढी हिंसक क्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्यां डाव्यांना उत्तर देते, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक पद्धतीने. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. विजयादशमीला सुरू झालेल्या या संघटनेने राष्ट्रनिर्माणात योगदान दिले आहे. संघाची ‘जेन झी’सुद्धा सज्ज झाली आहे. शाखांमध्ये सक्रिय, सेवा कार्यात सहभागी होत आहे. ही पिढी राष्ट्रसेवेसाठी पूर्णपणे तयार आहे.modis and gen z ही पिढी डाव्यांच्या हिंसक सत्ता निर्माणाच्या स्वप्नांना धक्का लावत आहे. संघ एक मजबूत किल्ला झाला आहे आणि संघाची जेन झी संघाचे मजबूत खांदे आहेत जणू... डाव्या विचारधारेच्या लोकांना वाटतं की, जेन झी दिशाहीन आहे, पण हे चूक आहे. जेन झी ही शिवधनुष्य उचलणाऱ्यां प्रभू श्रीरामांच्या आदर्शावर चालणारी आहे. म्हणूनच राम मंदिराच्या निर्माणावेळी जेन झीने जल्लोष केला होता. ही पिढी निधर्मी नसून धार्मिक आहे; त्याचबरोबर विज्ञानवादीदेखील आहे. मोदींच्या 24 वर्षांच्या सत्ताकाळात अनेक राजकीय सुधारणा दिसून आल्या. जेन झी ही या प्रवासाची साक्षीदार होत आहे. हीच पिढी भारताला पुढे घेऊन जाणार आहे. मागून जेन अल्फा तयार होत आहे.
जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Powered By Sangraha 9.0