वर्धा
Sunaina Dongre अखिल भारतीय ७४ वी पोलिस रेसलिंग लस्टर स्पर्धा नुकतीच मधुबन, हरियाणा येथे पार पडली. या स्पर्धेत वर्धा जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदार सुनैना डोंगरे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलिस दल, नागपूर परिक्षेत्र तसेच वर्धा जिल्ह्याचा मान अधिक उंचावला आहे.
२९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक कार्यालयात महाराष्ट्र पोलिस दलाचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकप्राप्त कामगिरी करणार्या पोलिस अधिकारी, अंमलदार, खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सुनैना डोंगरे हिचा देखील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, प्रशिक्षक राजू उमरे यांनी सुनैना डोंगरे हिच्या यशाबद्दल अभिनंदन करून सत्कार केला.
सुनैना डोंगरे हिने याआधी अमेरिकेत झालेल्या जागतिक पोलिस स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताचे आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले होते. तिच्या या कामगिरीत तिची मेहनत, शिस्त आणि समर्पणभाव स्पष्ट दिसून येतो.