७९ वर्षांच्या ट्रम्प यांचे हृदय मात्र ६५ वर्षांचे!

11 Oct 2025 14:29:57
वॉशिंग्टन,
Trump's heart is only 65 years old अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला आरोग्य अहवाल सर्वांना आश्चर्यचकित करणारा ठरला आहे. वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटर येथे करण्यात आलेल्या सखोल तपासणीनंतर डॉक्टरांनी ट्रम्प यांच्या हृदयाविषयी एक अनपेक्षित निष्कर्ष मांडला आहे. त्यांच्या मते, ट्रम्प यांचे हृदय त्यांच्या सध्याच्या वयापेक्षा तब्बल १४ वर्षे तरुण आणि पूर्णपणे निरोगी आहे. ७९ वर्षीय ट्रम्प यांनी मेरीलँडमधील बेथेस्डा येथे जवळपास तीन तासांची तपासणी केली. त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांनी नेव्ही कॅप्टन शॉन बार्बाबेला सांगितले की, ही एक नियमित वार्षिक आरोग्य तपासणी होती. या तपासणीत ट्रम्प यांचे हृदय, फुफ्फुसे, मज्जासंस्था तसेच इतर सर्व महत्त्वाचे अवयव उत्कृष्ट स्थितीत असल्याचे निष्पन्न झाले.
 
 
 
Trump
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात डॉ. बार्बाबेला यांनी म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प उत्तम आरोग्य स्थितीत आहेत. त्यांच्या शरीरातील सर्व प्रमुख प्रणाली सुरळीत कार्यरत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की ट्रम्प यांच्यावर प्रगत इमेजिंग आणि प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आणि त्यांच्या निकालांनुसार हृदयाचे जैविक वय हे त्यांच्या वास्तविक वयापेक्षा १४ वर्षे कमी असल्याचे दिसून आले. या तपासणीदरम्यान ट्रम्प यांनी वार्षिक फ्लू लस आणि कोविड-१९ बूस्टर डोस देखील घेतला. त्यांच्या चांगल्या आरोग्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी अमेरिकन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे तरुण आणि ऊर्जावान आरोग्यचित्र त्यांच्या समर्थकांसाठी नक्कीच आशादायक ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0