देवळी,
RSS राष्ट्रनिर्माण, समाजजागृती आणि विश्वकल्याण या त्रिसूत्रीवर चालणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आज शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याने ते ईश्वरी कार्य असल्याचे प्रतिपादन ग्रंथालय भारती प्रांत संघटन सचिव राजेश राठोड यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवळीनगराच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वतेम्हणून बोलत होते. इस्कॉनचे प्रमुख अकिनचंद प्रभू, तालुका संघचालक किशोर फुटाणे यांची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले की, हिंदू समाजासाठी विजयादशमी हा शौर्य, धर्म आणि संघटनाचा उत्सव मानला जातो. त्याच दिवशी संघाची स्थापना झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘पंच परिवर्तन’ या विषयावर विचार मांडताना सांगितले की, संघाचे कार्य हे केवळ संघटनापुरते मर्यादित नाही तर ते राष्ट्रनिर्मितीच साधन आहे. संघाचा स्वयंसेवक जिथे उभा राहतो, तिथे समाजात सकारात्मक बदल घडतो. हे कार्य खर्या अर्थाने ईश्वरी कार्य असल्याचे ते म्हणाले. त्यांनी संघाच्या माध्यमातून चालणार्या विश्वशांती आणि मानवकल्याण यात्रेविषयी माहिती दिली. इस्कॉनचे प्रभू यांनी श्रीकृष्णाचे कार्य संघ पुढे नेत असल्याचे सांगुन शताब्दीत गेलेल्या संघाच्या महान कार्याचे कौतुक केले.
उत्सवाची सुरुवात घोषपथकासह निघालेल्या पथसंचलनाने झाली. सुमारे दीड किलोमीटर अंतरावरून स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन करीत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. बाल स्वयंसेवकांच्या प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाला शोभा प्राप्त झाली. कार्यक्रमाला आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्ताविक व परिचय तालुका संघचालक किशोर फुटाणे यांनी केले. विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात देशभक्तीची आणि संघभावनेची लहर होती. महिलांपासून ते लहानग्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
शिस्त, संयम आणि संस्कारांचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम देवळीकरांच्या मनात राष्ट्रीय अभिमान जागवणारा ठरला.