नागपूर मार्गे धावणार्‍या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी

12 Oct 2025 21:40:46
नागपूर,
crowded-trains-nagpur-railway : येत्या आठ दिवसानंतर लक्ष्मीपूजन असल्याने नागपूर मार्गे धावणार्‍या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे. ही गर्दी आता पुढील महिनाभर कायम राहणार असल्याने सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी मध्यवर्ती स्थानकावर बंदोबस्त वाढविला आहे. शनिवारी धनत्रयोदशी आणि मंगळवारी दिवाळी सण असल्याने आपआपल्या गावांकडे जाणार्‍या प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. पुढील सोमवारी नरक असून मधून ने सण पुढ्यात असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. पुढे दोन आठवडे ही गर्दी वाढतच जाणार असल्याचे ध्यानात घेऊन सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी स्थानकावर मोठा बंदोबस्त वाढविला आहे.
 
NGP
 
बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
 
 
दिवाळी दरम्यानच्या काळात सर्वाधिक गर्दी रेल्वेत असते. मात्र आता बसस्थानक असो किंवा विमानतळ सर्वत्र एकच धावपळ दिसून येते. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढल्याने इतवारी, गांधीबाग, महाल, सीताबर्डी, धंतोली, धरमपेठ, गोकुळपेठ, खामला आदी बाजारपेठेत वाहतूकीची कोंडी दिसून येते. तीन दिवसानंतर १७ ऑक्टोबरला वसूबारसपासून दिवाळी पर्व सुरू होत आहे. मंगळवारी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दिपावली पाडवा आणि त्यानंतर रविवार २६ ऑक्टोबर पर्यंत अनेकांनी दिवाळीच्या सुटया काढल्यामुळे कुटुंबात दिवाळीचा आनंद व्दिगणित होणार आहे.
 
पर्यायी मार्गाने प्रवास
 
 
मध्यवर्ती रेल्वेस्थानकासोबतच विमानतळ, आणि बसस्थानकावर सुध्दा सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सर्वच रेल्वे गाड्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. पुढील किमान १५ दिवस पर्यंत गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागणार आहे. याशिवाय अनेक आरक्षण उपलब्ध न झाल्याने पर्यायी मार्गाने प्रवास करण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
 
भामट्यांपासून सावध राहावे
 
 
रेल्वेस्थानकावरील आरपीएफ तसेच रेल्वे पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्व भागात सुरू केल्या आहे. समाजकंटक तसेच चोर,भामट्यांपासून प्रवाशांनी सावध राहावे, अशा सुचना प्रवाशांना दिल्या जात आहे. कोणत्याही प्रकारच्या चिजवस्तूंपासून धोका होवू नये म्हणून दक्षता घेतल्या जात आहे. मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी, इतवारी रेल्वेस्थानक परिसरात बंदोबस्त लावण्यात आल्याने प्रवाशांना कोणत्याही प्रकारे अडचण जाणार नाही, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आहे.
 
 
संशयीत व्यक्तींची झाडाझडती
 
 
मध्य रेल्वे पोलिसांच्या हिटलिस्टवर असणार्‍या सराईत गुन्हेगारांवर नजर रोखण्यात आली असून, संशयीत व्यक्तींची झाडाझडती घेतल्या जात असल्याची माहिती आरपीएफचे आयुक्त आशुतोष पांडे आणि रेल्वेचे पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांनी दिली आहे. रेल्वेतून फटाके अथवा स्फोटक किंवा ज्वलनशिल पदार्थांची रेल्वे गाड्यांमधून ने-आण केली जाऊ नये म्हणून तपासणी केली जात आहे. रेल्वे स्थानकाच्या आत आणि बाहेर गस्तही वाढविण्यात आली असून गुन्हेगारांवर वेळीच कारवाई केल्या जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे स्थानक परिसरासत बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला तैनात करण्यात आले आहे.तसेच श्वान पथकाकडून स्फोटकांची, अंमली पदार्थाची वाहतूक होऊ नये म्हणून तपासणी करवून घेतली जात आहे.
Powered By Sangraha 9.0