'छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं'

12 Oct 2025 17:19:10
मुंबई,
Dhirendra Krishna Shastri प्रसिद्ध संत आणि वक्ता बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मुंबईतील सिद्धी विनायक मंदिरात पूजा अर्चना करून देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी प्रार्थना केली. या वेळी त्यांनी विविध सामाजिक आणि धार्मिक विषयांवर आपली मते व्यक्त करत ‘आय लव्ह मोहम्मद’ व ‘आय लव्ह महादेव’ या वादग्रस्त विषयांवर आपले स्पष्ट मत मांडले. तसेच त्यांनी देशात ‘सर तन से जुदा’ अशी मानसिकता थांबवण्याचे आवाहन केले.
 
 
Dhirendra Krishna Shastri
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, ते भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी ७ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दिल्ली ते वृंदावन अशी पदयात्रा करणार आहेत. या पदयात्रेद्वारे हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. त्यांनी म्हटले, “देश हिंदू राष्ट्र व्हावे, यासाठी आज सिद्धी विनायकाच्या चरणी प्रार्थना केली आहे. भगवंत सर्व हिंदूंना सद्बुद्धी देवो, अशी मनोमन प्रार्थना करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू राष्ट्राची स्थापना होणार आहे.”
शास्त्री यांनी पश्चिम बंगालमध्येही लवकरच धार्मिक कथा सांगण्यासाठी जाण्याची घोषणा केली. त्यांनी राज्यघटनेत दिलेल्या अधिकारांचा उल्लेख करत सांगितले की, “भारतीय नागरिकांना कोणत्याही राज्यात मुक्तपणे जाण्याची परवानगी आहे. या अधिकाराचा उपयोग करत आपण लवकरच पश्चिम बंगालमध्ये धर्मप्रसार करू.”
 
 
‘आय लव्ह मोहम्मद’ या चर्चेवर ते म्हणाले, “आय लव्ह मोहम्मद किंवा आय लव्ह महादेव यावर कोणताही आक्षेप नाही. पण ‘सर तन से जुदा’ सारख्या मानसिकतेला समाज किंवा संविधान दोन्ही सहन करत नाहीत. अशी कोणतीही वक्तव्ये झाल्यास ती देशातील एकात्मतेला धक्का देणारी आहेत. त्यामुळे त्याला मनाई करणे गरजेचे आहे.” त्यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावरही कठोर भूमिका घेतली आणि या प्रकाराला बंद करण्याची मागणी केली.धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी लंडनमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानच्या एका नेत्याला भेट दिल्याचीही माहिती दिली. “लंडनमधील कार्यक्रमात मला ‘खान’ नावाच्या एका पाकिस्तानातल्या माजी महापौराशी बोलायला मिळाले. तो सनातनी झाला आहे आणि गीता वाचली आहे, पण त्याने आपले नाव बदललेले नाही. त्याने मला विचारले की, ‘नाव बदलावे का?’ त्याला मी सांगितले की इंजिन बदलले तरी चेसिस नंबर तोच राहतो, नावाने फरक पडत नाही,” असे त्यांनी सांगितले.
 
 
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा धार्मिक आणि सामाजिक विषयांवर चर्चांना वेग मिळाला आहे. त्यांच्या पदयात्रेची आणि पुढील कार्यक्रमांची नागरिक आणि वाचकवर्ग उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
Powered By Sangraha 9.0