तभा वृत्तसेवा दारव्हा,
Dr. Satpal Sovale राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव शनिवार, 11 आक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता निधी मंगल कार्यालयाच्या मैदानावर झाला. यावेळी संध्याकाळी 5 वाजता शहरातील मुख्य मार्गावरून शेकडो स्वयंसेवकाचे गणवेशात पथसंचलन निघाले. मुख्य उत्सवात स्वयंसेवकांनी याप्रसंगी नियुद्ध, दण्ड, घोष, सामूहिक व्यायामयोगाचे प्रात्यक्षिक केले.
विजयादशमी उत्सवाचे प्रमुख अतिथी प्रतिष्ठित व्यवसायी रामेश्वर कडव, प्रमुख वक्ते भारतीय विचार मंच विदर्भ प्रांतसंयोजक डॉ. सतपाल सोवळे, खंड संघचालक नंदलाल पालीवाल, नगर संघचालक गजानन गाभे उपस्थित होते. त्यानंतर सांघिक गीत विशाल गंडाळे, सुभाषित यश टारपे, अमृतवचन रोहित पांडे, वैयक्तिक गीत कार्तिक दुधे यांनी गायले. आपल्या अतिथी भाषणामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
संघ हिंदू संस्कृती परंपरा जोपासणारे संघटन आहे. संघ आणि संघाचे स्वयंसेवक स्वप्रेरणेने देशाच्या कानाकोपèयातसुद्धा नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वात आधी पोहचतात. हा विजयादशमी उत्सव सर्वांना ऊर्जा देणारा उत्सव आहे, असे रामेश्वर कडव म्हणाले.
उत्सवाचे प्रमुख वक्ते डॉ. सतपाल सोवळे आपल्या उदबोधनात म्हणाले, संघविचार म्हणजे नव्याने सांगितलेले तत्त्वज्ञान नसून वेद उपनिषदांमधील दिव्य ज्ञान आणि महापुरुषांनी आपल्या चिंतनातून त्यात टाकलेली अमूल्य भर याचा देश, काल, परिस्थिती, सुसंगत आविष्कार म्हणजे संघ विचार आहे. संघ संस्थापकांनी व्यक्ती निर्माण आतून समाज परिवर्तन, समाज परिवर्तनातून व्यवस्था परिवर्तन आणि व्यवस्था परिवर्तनातून राष्ट्र निर्माणाचे कार्य केले.आपल्या उद्बोधनात ते पुढे म्हणाले, संघाच्या प्रयत्नातून आज सर्व क्षेत्रांत दिसत असलेली अनुकूलता याची पायाभरणी संघाच्या शंभर वर्षाच्या साधनेतून झालेली असून त्यासाठी संघ प्रचारकांची एक तेजस्वी परंपरा आणि समर्पित गृहस्थी कार्यकर्त्यांनी सत्य, करुणा, शुचिता, तपस या आधारे परिवर्तन याचा दृश्य परिणाम आहे.
संघावरील आक्षेपांचा परामर्श घेतांना डॉ. सोवळे यांनी, संघाचा विकासक्रम, संघाची कार्यपद्धती, संघाची हिंदुत्व संकल्पना, संघाचा स्वातंत्र्ययुद्धातील सहभाग या विषयांना स्पर्श केला. तर व्यवस्था परिवर्तनासाठी पंच परिवर्तनाचे शताब्दी वर्षातील महत्व सांगताना कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण, स्वबोध आणि नागरी कर्तव्य या मुद्यांचा उलगडा केला.सुरवातीला प्रास्ताविक व परिचय आणि शेवटी आभारप्रदर्शन नगर संघचालक गजानन गाभे यांनी केले.