हिंदूत्वाचा विचार संघटित शक्तीने व्यक्तीमत्व घडवितो : गार्गी जोशी (पितळे)

12 Oct 2025 20:26:04
बुलढाणा, 
Gargi Joshi : पाश्चात्य संस्कृतीमध्ये स्त्रीयांना उपभोगाची समजतात परंतू भारतीय संस्कृतीत मातृशक्तीने असुराचा नाश करून धर्माचा विजय केला. हिंदू धर्मात आपण जन्म घेतला आहे. भारताची वंशावळ विश्वात वेगळी असून प्रत्येकाचे पूर्वज हिंदू आहे. स्वदेशी भाषा, वेशभूषा, पर्यावरण जागृती, स्वच्छता, नागरिकांचे कर्तव्य, हिंदूत्वाचा विचार आचरणातून संघटित शक्तीने सदाचार संस्कृती टिकवून व्यक्तीमत्व घडविण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेविका समितीच्या शाखा मधून केल्या जाते. असे विचार रा. स्व. संघ वाशिमच्या गार्गी विवेक जोशी (पितळे) यांनी व्यक्त केले.
 
 
 
GARGI JOSHI
 
 
 
राष्ट्रसेविका समिती शाखा बुलढाणाच्या वतीने विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता दि व्हिजन इंग्लीश स्कूल चैतन्यवाडी बुलढाणाच्या प्रागंणावर संपन्न झाला. प्रमुख अतिथी डॉ. स्मिता गजानन जोगळेकर यशवंत अध्यापक विद्यालय बुलढाणा, नगर कार्यवाहिका मिना कुळकर्णी, विभाग कार्यवाहिका निता जोशी, व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रारंभी दिपप्रज्वलन, भारतमाता, शस्त्रपूजन करण्यात आले. समिती सेविकांनी दंड प्रात्याक्षिक सादर झाले. तत्पूर्वी सायंकाळी ४ वाजता संघस्थान येथून सेविकांचे घोषपथकासह शहरातून पथसंचलन निघाले ठिकठिकाणी विविध संघटना बंधू भगिणींनी पुष्प वर्षाव केला. फटाके फोडून स्वागत केले.
 
 
प्रमुख वक्त्या गार्गी जोशी यांनी सांगितले की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या पूर्वजांनी रक्ताचे बलिदान देवून राष्ट्रभक्तीचा जागर केला. लोकमान्य टिळक, अहिल्यादेवी, डॉ. हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदू राष्ट्र निर्मितीचे ज्वाजल्य विचार त्यांच्या प्रेरणा आपल्यासाठी आदर्श आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक लढाईतून हालअपेष्टा सहन केल्या. आज आपण आधुनिक तंत्र यंत्राच्या युगात जगतो आहे. तंत्रज्ञानाचा अभ्यास करून जगाच्या सोबत स्विकार करतांना स्वदेशी भाषा संस्कृत, मराठी भाषा शिवाय वेशभूषांचा स्विकार करून निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरण जनजागृती, स्वच्छता, नागरिकाचे कर्तव्य संघटित शक्तीने अंगीकारले पाहिजे. स्त्री सक्षम, शिक्षीत झाली तर कुटुबांची प्रगती होते. आपण एकत्रित येण्यासाठी सण उत्सव साजरे करतो. आचार विचाराची देवाण घेवाणकरून कुळाचार संस्कृतीशी नाळ जोडली पाहिजे. जगाचा विश्व गुरु होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने राष्ट्र निर्माणाच्या कार्यात त्याग समर्पणाच्या भावनेतून संघटित शक्ती निर्माण होते. असे त्यांनी आवर्जून सांगितले.
 
 
प्रमुख अतिथी डॉ.स्मिता जोगळेकर यांनी सांगितले की१९३६ ला वंदनिय मावशी केळकर यांनी राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून राष्ट्रभक्त सेवा, शिस्त, स्वाभीमान, व्यायाम, संस्कारक्षम मातृशक्तीचे संघटन निर्माण केले. आज ९० वर्षे या सकारात्मक राष्ट्रशक्तीला झाले आहे. मातृशक्तीचे उदाहरण सिता त्यागाचे प्रतिक, सावित्री, अहिल्यादेवी सहनशक्ती राष्ट्र प्रेरणाचा स्त्रोत, संत मिराबाई गाणकोकिळा अशा अनेकांनी समाजाला आदर्श दिला. कुटुंब व्यवस्थेतील प्रमुख नारीशक्तीने इतिहास घडविला असल्याचे त्यांनी सांगितले. संचलन भावना वैद्य, अमृतवचन रुजुला गोडबोले, डॉ. स्मिता जोगळेकर यांचे स्वागत वैशाली शिरसाट, गार्गी जोशी यांचे स्वागत मिना कुळकर्णी तसेच आभार नगर कार्यवाहिका मिना कुळकर्णी यांनी केले. उत्सवाला नगरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिला मंडळ, जेष्ठ नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0