म्हणे, संयुक्त निवेदनात काश्मिरचा उल्लेख का केला?

12 Oct 2025 20:19:42
नवी दिल्ली,
india-afghan-friendship : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर, अफगाणी परराष्ट्र मंत्री अमिर खान मुत्तकी यांच्या दीर्घ भारतभेटीने पाकिस्तानला ठसका लागला आहे. मुत्तकी सात दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, त्यांचा हा दौरा भारत आणि अफगाणिस्तानच्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. यादरम्यान, दोन्ही देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनावर पाकिस्तानने आक्षेप नोंदवित विखारी प्रतिक्रीया दिली आहे.
 
 

IND-AFG-PAK 
 
 
 
भारत आणि अफगाणिस्तानच्या वतीने 10 ऑक्टोबर रोजी एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले होते. या निवेदनात पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा करण्यात आली. या हल्ल्यात धर्म विचारून 26 भारतीयांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, दोन्ही देशांनी दहशतवादी हल्ल्यांची निंदा केली आणि आशियात शांतता, स्थैर्य आणि परस्पर विश्वास वाढविण्यावर भर दिला.
 
 
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुत्तकी यांनी, दहशतवाद ही पाकिस्तानची अंतर्गत समस्या असल्याचे म्हटले आहे. आमच्या मते, पाकिस्तानने चूक केली आहे. आम्ही चर्चेसाठी दारं उघडी ठेवली आहेत. चार दशकांनंतर अफगाणिस्तानात शांती आणि स्थैर्य आले आहे. पाकिस्तानने स्वत:च्या समस्या स्वत:च सोडवायला हव्यात, असा सल्लाही मुत्तकी यांनी दिला. त्यावर भडकलेल्या पाकिस्तानने आज अधिकृत निवेदन जारी केले आहे.
 
 
काश्मिर भारताचा भाग असल्याचे अफगाणिस्तान-भारत संयुक्त निवेदनात म्हटले आहे. मात्र, असे विधान करणे हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे उल्लंघन असल्याचे सांगून पाकने नाराजी व्यक्त केली आहे. हे संयुक्त निवेदन काश्मिरी लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाप्रती अतिशय असंवेदनशील असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0